अंबर हे स्फटिक (Crystal) किंवा खनिज (Mineral) नसून जैविक घटकांपासून तयार झालेले जीवाश्म (Fossil) आहे. ते जीवाश्माच्या रूपाने आढळणाऱ्या शंकुमंत (सूचिपर्णी) वृक्षांच्या राळेचे नाव आहे. परंतु पुरातन काळापासून मानवाने त्याचा उपयोग नैसर्गिक स्फटिक घटकाप्रमाणे सजावटीसाठी, शोभा आणण्यासाठी, तसेच अलंकार आभूषण म्हणून आणि प्रसंगी हाडांसाठी वेदनाशामक औषध म्हणून उपयोग केल्यामुळे, त्याचा अभ्यास खनिजाच्या रत्ने (Gems) या घटकातून केला जातो.
तृतीय कल्पातील (Tertiary Period) गाळांच्या काही खडकांत अंबराच्या अनियमित आकाराच्या लहानमोठ्या गुठळ्या व कांड्या सापडतात. अंबराचे लहानसे साठे सर्व खंडांत आढळतात. त्याचे मोठे साठे बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या खडकांत असून त्यांच्यातील अंबर खणून काढले जाते. तसेच त्याचे खडक बाल्टिकाच्या पाण्याखालीही आहेत. समुद्राच्या तळावरील गाळ खरवडून त्याच्यातील किंवा तळात नळासारखी भोके खणून, खोल जागेतील खडकांतले अंबर काढले जाते. वादळाच्या वेळी खवळलेल्या पाण्याने तळाशी असलेल्या खडकांतील उपसून निघालेले अंबर कधीकधी किनाऱ्यावर आणून टाकले जाते. अंबराचे सर्वात अधिक उत्पादन बाल्टिकलगतच्या प्रदेशांत होते. म्यानमार सिसिली व रुमानियातही थोडे उत्पादन होते. म्यानमारातले अंबर गडद लाल व बाल्टिकच्या अंबरपेक्षा किंचित कठिण असते. न्यूझीलंडमधील गोंडवन (Gondwana) क्षेत्रातील जमिनीत वृक्षाच्या मूळातून बाहेर पडणाऱ्या डिंकासारख्या द्रवात आकस्मिकपणे अडकलेल्या त्याकाळातील (गतकालीन) कीटकांचे जीवाश्म अंबरात आढळतात. ख्रिस्तपूर्व सुमारे नऊ हजार वर्षांपूर्वीपासून मणी, दागिने व शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी अंबराचा उपयोग आलेला आहे. त्याच्या वस्तू अद्यापही बऱ्याच प्रमाणात वापरल्या जातात. अंबर साधारण २००० सें.ला जाळल्यानंतर त्याची जी राख बनते त्यातून काळे टिकाऊ व्हार्निश बनविले जाते.
पाइन प्रजातीच्या वृक्षाद्वारे पाझरणाऱ्या रस – सार अथवा सत्वापासून (juice/liquid/ooze) अंबरचे उत्पादन होते. यामध्ये चेरीपासून निघालेल्या डिंकासारख्या आणि इतर सामान्य पाइन वृक्षातून राळेसारखा पदार्थ, जो मुळात द्रवीय असून तो वातावरणाच्या सानिध्यात आल्यानंतर कालांतराने घट्ट तथा पारदर्शी होऊ लागतो. पूर्वी आपल्या पूर्वजांचेही मत तो झाडाचा रस आहे असेच होते आणि त्याला “सक्सिनम “(succinum – latin word) या नावाने ओळखत होते.
अंबर रचना ही बहुजिनसी असते, यातील राळेसारखे घटक कमीजास्त प्रमाणात अल्कोहॉल, ईथर आणि क्लोरोफॉर्ममध्ये विरघळणारे असतात, परंतु त्यामध्ये विद्राव्य बिटुमिनस पदार्थ ही असतात. अंबर हे लॅबडॅन (Labdane) कुटुंबातील बहुवारिकीकरणातून (polymerization) तयार झालेले स्थूलरेणू (macro molecule) असतात.त्याच्या याच गुणधर्मांमुळे नूतन कल्पातील (Recent) कोळश्याच्या खाणींमध्ये त्यांचे जीवाश्म अवशेष स्तर रूपाने जगभर पाहावयास मिळतात.
गुजरात राज्यातील कॅम्बे शेलमध्ये (Cambay Shale) लिग्नाइट (lignite) कोळश्याच्या खाणीत (वस्तान आणि ताडकेश्वर या गावातील खाणी) फार मोठ्या प्रमाणावर अंबरचे साठे मिळाले आहेत. त्यामध्ये बहुसंख्येने मिळालेल्या त्याकाळातील, (सुमारे ५०० लाख वर्षांपूर्वी), या चिकट रसात अडकलेल्या आणि कोणत्याही विघटनाशिवाय त्यामध्ये तसेच मूळस्थितीत राहिलेल्या, विविध मुंग्या, कीटक, किडे यांच्या जीवाश्मांच्या अभ्यासातून, काही लाख (सुमारे ५००) वर्षांपूर्वीपासून म्हणजे, भारतीय उपखंडाचे गोंडवन खंडातून तुटून, आशिया खंडाला धडकून, हिमालय पर्वतरांगा निर्माण व महाराष्ट्रामध्ये अग्निजन्य खडकांच्या (Igneous rocks) प्रकारातील ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकी (volcanic fissure eruption) प्रकारातून लाव्हा रसापासून तयार झालेल्या, बेसाल्ट खडकांचे पठार तयार होणे; इत्यादी विविध भूशास्त्रीय घडामोडींबद्दल, भारतीय उपखंडांमध्ये काय आणि कसे बदल झाले ? याबद्दल सखोल संशोधनास मदत होत आहे.
गुणधर्म : अस्फटिकी, रंग पिवळा, नारंगी, तपकिरी, क्वचित निळा किंवा हिरवा. पारदर्शक ते पारभासी. स्वच्छ किंवा आत हवेचे सूक्ष्म बुडबुडे असल्यामुळे गढूळ झालेले. स्वच्छ पारदर्शक किंवा दुधी काचेप्रमाणे पारभासी असलेल्या अंबरालाच किंमत येते. चमक राळेसाठी. कठिनता २−२·५. वि.गु. १·०−१·१. भंजन शंखाभ (Minerology) काही नमुने प्रतिदीप्तिमान असतात. घासले असता घर्षण-विद्युत् निर्माण होण्याचा गुण अंबरात विशेषत्वाने आढळतो. निरनिराळ्या प्रदेशांतील अंबराच्या रासायनिक संघटनांत थोडा फरक असतो. तो एक ऑक्सिजनीकृत हायड्रोकार्बनी पदार्थ असून त्याचे C: H: O हे गुणोत्तर सु. ४०: ६४: ४ असते. बाल्टिक अंबराला ‘सक्सिनाइट’ असेही म्हणतात. त्याच्यात थोडे सक्सिनिल आम्ल असते व कोरड्या ऊर्ध्वपातनाने ते काढता येते. इतर अंबरांत ते बहुधा नसते.
समीक्षक : डॉ.श्रीनिवास वडगबाळकर