आनंदघन : (इ. स. १७ वे शतक).गुजरातमधील जैन साधू. मूळ नाव लाभानंद. तपगच्छात दीक्षा घेतली असण्याचा संभव. मृत्यू मेडता (राजस्थान) येथे. त्यांच्या आनंदघन-चोवीसी या राजस्थानीमिश्रित गुजराती भाषेत रचलेल्या कृतीला जैनपरंपरेत त्याला गौरवपूर्ण स्थान आहे. या रचनेचे वैशिष्ट्य हे की, त्यात केवळ तीर्थंकाराचे माहिमागान, रूढ तत्त्वमीमांसा याऐवजी आपल्या आत्मसाधनेचा विकास योगमय अनुभवरूप लाघवयुक्त वाणीतून प्रकट झालेला आहे. ज्ञानसार यांनी आनंदघन यांना टंकशाळी म्हणजे रोकडे सत्य प्रगट करणारे असे सार्थ नामाभिधान दिले आहे. त्यांच्या आनंदघन-बहोंतरी या रचनेतही सांप्रदायिक निरूपणाऐवजी कबीर, नरसिंह, मीरा इ. साधकांच्या आनंदमय अनुभवाला कवित्वरूप दिले आहे. त्यामुळे आनंदघन यांची स्तवने, पदे ही केवळ सांप्रदायिक राहत नाहीत, तर प्रत्येक आत्मज्ञानी माणसाला पथप्रदर्शक होतात व मध्यकालीन ज्ञानमार्गी कवितापरंपरेत स्वत:चे वेगळे, मौलिक स्थान प्राप्त करतात. त्याशिवाय होरी-स्तवन, अध्यात्मगीत, चोवीस तीर्थंकरनुं स्तवन यांसारख्या त्यांच्या रचनाही प्रकाशित आहेत, त्यांच्या काही संस्कृत भाषेतील कृतीही प्राप्त आहेत.
संदर्भ :
- देसाई, कुमारपाळ, आनंदघन एक अध्ययन (स्तवनबावीसीने अनुलक्षीने), १९८०.