हर्षवर्धन, सम्राट : (इ.स. कार. ६०६ ‒ ६४७). इ.स. ४६७ साली गुप्त घराण्यातील एक कर्तृत्ववान राजा स्कंदगुप्त मरण पावला. त्यानंतर गुप्त घराण्यात कोणताच शक्तिमान राजा सिंहासनावर आला नाही. यथावकाश गुप्त साम्राजाचा ऱ्हास होऊन इ.स. ५२५ मध्ये गुप्त साम्राज्य लयास गेले. त्यानंतर उत्तर भारतात एक प्रकारचा शिथिलपणा आला. छोट्या-छोट्या राजांनी आपली छोटी राज्ये अल्प काळासाठी स्थापन केली. हूण राजांच्या स्वारीनंतर पुश्यभूती घराण्याचे एक छोटे राज्य दिल्लीच्या उत्तरेला ठाणेसर (ठाणेश्वर) येथे अस्तित्वात आले होते. त्या घराण्याचा संस्थापक प्रभाकरवर्धन. इ.स. ६०६ मध्ये तो मृत्यू पावला आणि त्याचा मुलगा राज्यवर्धन गादीवर बसला. परंतु राज्यवर्धनला राज्यकारभाराचा आणि सैन्यनेतृत्वाचा अनुभव नव्हता. त्यामुळे प्रभाकरवर्धनच्या मंत्रिगणांनी राज्यवर्धनला पदच्युत करून हर्षवर्धन याला सिंहासनावर बसण्याची विनंती केली. हर्षवर्धन त्यासाठी राजी नव्हता. परंतु थोड्याच काळात देवगुप्त नावाच्या माळवा प्रांताच्या राजाशी झालेल्या लढाईत राज्यवर्धन कपटाने मृत्यू पावला आणि नाईलाजाने हर्षवर्धनला राज्यपद स्वीकारावे लागले. हर्षवर्धन इ.स. ६०६ मध्ये सिंहासनस्थ झाला. सर्वप्रथम शशांक नावाच्या बंगालच्या राजाशी आणि माळवा प्रांताच्या देवगुप्ताशी लढाई करून शशांकने बळकावलेला कनौज प्रांत हर्षवर्धनाने सोडवून आपल्या ठाणेश्वरच्या राज्यात समाविष्ट करून घेतला. तसेच त्याने पंजाब, काश्मीर, नेपाळ आणि वल्लभी राज्ये जिंकून आपल्या राज्यात समाविष्ट केली. त्यानंतर माळवा राज्य जिंकून त्याने आपल्या राज्याच्या सीमा नर्मदा नदीला तटवल्या. त्याचबरोबर कलिंग राज्य जिंकून आपले साम्राज्य त्याने बंगालच्या उपसागरापर्यंत पसरवले. परंतु दक्षिण भारतात आपल्या राज्याचा विस्तार करण्याच्या हर्षवर्धनाच्या प्रयत्नांना मात्र यश लाभले नाही; कारण दक्षिणेतील चालुक्य घराण्यातील पुलकेशी (दुसरा) याने नर्मदातीरीच्या युद्धात हर्षवर्धनाच्या गजसैन्याचा धुव्वा उडवून त्याला पराजित केले. उत्तर भारत मात्र हर्षवर्धनाच्या साम्राज्याने बऱ्याच अंशी व्यापले होते. हुएनत्संग नावाचा चीन देशाचा वकील हर्षवर्धनाच्या दरबारात राहिला होता. त्याच्या लिखाणानुसार हर्षवर्धनाच्या सैन्यात एक लाख घोडदळ आणि साठ हजार हत्ती होते. त्याच्या सैन्यासाठी पायदळ मुख्यत्वेकरून त्याचे मांडलिक राजे आणि इतर टोळ्यांचे प्रमुख पुरवत असत.
हर्षवर्धन हा न्यायी राजा, कसलेला शासक आणि प्रतिभावंत व्यासंगी म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या दरबारात बाणभट्ट, मयूर आदी अनेक विद्वान आणि कलाकारांना मानाचे स्थान दिले होते. त्याच्याच काळात संस्कृत व्याकरणाची विस्तृत निर्मिती झाली. गुप्त घराण्याप्रमाणेच हर्षवर्धनाच्या काळात चातुर्वर्ण्यप्रणाली आणखीनच प्रगत झाली आणि समाज जातीआधारित बनला. हर्षवर्धनाला प्राचीन भारतातील शेवटच्या सामर्थ्यवान राजाचा सन्मान दिला जातो. त्याच्या मृत्यूनंतर त्याला पुत्रसंतती नसल्यामुळे त्याची गादी अर्जुननामक मंत्र्याने बळकाविली. हर्षवर्धनाने स्वत: रत्नावली व प्रियदर्शिका या नाटिका आणि नागनंद हे नाटक लिहिले, अशी माहिती इत्सिंग सांगतो. नाटकाच्या प्रयोगाविषयीही तो लिहितो. त्यानंतर भारतामधील मध्ययुगीन काळाचा आरंभ झाला.
संदर्भ :
- Majumdar, R. C. Ed. The History and Culture of the Indian People, vols. 2, Bombay, 1997.
- Reddy, Krishna, Indian History, New Delhi, 2017.
- Thaper, Romila, History of India, vol.1, New Delhi, 1966.
समीक्षक – सु. र. देशपांडे