गोंधळ विधिनाट्यात वाजविले जाणारे प्रमुख वाद्य .कुळधर्म कुलाचार म्हणून कुलदेवीच्या नावाने ‘गोंधळ’ घालण्याची प्रथा संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलीत आहे आणि याच ‘गोंधळ’ विधिनाट्यात हे वाद्य वाजविले जाते. यास ‘जोड समेळ’ असेही म्हणतात. भरतमुनींच्या वर्गीकरणानुसार अवनद्ध आणि कुर्ट सॅक्स या अभ्यासकाच्या वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपितपटल या प्रकारात येणारे हे वाद्य आहे. गोंधळ या विधिनाट्यातील संबळ हे मुख्य बलस्थान आहे, कारण जेंव्हा संबळ वादक संबळ वाजवून रंगभूमी आणि आजूबाजूचा परिसर नाट्यमय, भक्तिमय करतो तेंव्हा मुख्य नायक सादरीकरणाला सुरुवात करतो असा वादनसंकेत आहे. गोंधळात ‘संबळ’ हे परंपरेने ठरलेले आणि प्राचीन असे वाद्य आहे. संबळ या वाद्याच्या उत्पती विषयी गोंधळात सांगितली जाणारी पुराणकथा- महिषासुराचे दोन शिष्य म्हणजे चंड आणि मुंड द्यैत्य. ज्यावेळी महिषासुराचा देवीने वध केला त्यावेळी महिषासुराचे दोन शिष्य चंड आणि मुंड म्हणाले हे देवी तू आम्हाला मारण्याआधी तुझ्या कामी आमचा देह वाजावा अशी आमची इच्छा आहे म्हणून चंड मुंड द्यैत्यांच्या शिर आणि कातड्यापासून संबळ तयार केल गेल आणि हे संबळ वाजवून देवीला शांत केल.
संबळ या वाद्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण केलेली असते. संबळ हे तबल्याप्रमाणे दोन वाद्याची जोडी असून दोन्ही वाद्य दोरीच्या सहाय्याने एकमेकांना जोडलेली असतात. तबल्याप्रमाणे एक लहान, एक मोठे अशी जोडी असते. दोन्ही एकसाथ वाजवली जातात त्याला जोडसमेळ असेही म्हणतात. संबळाची दोन्ही खोडे लाकडी असतात.एका खोडलामादी समेळ(चाटी)(चाप) असे म्हणतात त्याचा व्यास साधारण साडेसहा इंच असतो, तर दुसऱ्या खोडला नर समेळ (बाया)(धूमा) असे म्हणतात. नर समेळाचा व्यास साधारण साडेसात इंच असतो, धुम्याचा घमारा येण्यासाठी राळ आणि मेथीदाणे एरंडेल तेलात मळून तयार केलेला लगदा पानाच्या आतील बाजूने लावतात त्याला मेणी अथवा मसाला असेही म्हणतात. मादी समेळ तबल्याचे बोल पुरवितो तर नर समेळ डग्ग्याचे बोल पुरवितो. दोन्ही खोडांचा आकार पंचपात्राप्रमाणे असतो. बायाचा घेर चाटीच्या घेरापेक्षा थोडा मोठा असतो .दोन्ही खोडावर गोल लोखंडी रिंगात मढवलेले बकर्याचे कातडे असते आणि हे सुताच्या दोरीने आवळलेले असते. चाटी वाजविण्यासाठी सात इंच वेताची काडी असते तर बाया वाजविण्यासाठी आराटीची मुळी, गोड्या बाभळीची मुळी अथवा वेताची काठी असते हि काठी तापवून छत्रीच्या दांड्या प्रमाणे किंवा प्रश्नचीन्हासारखा आकार दिला जातो या काठीला कुडाप्न असेही म्हणतात. या दोन्ही काठ्यांची लांबी एक ते सव्वा फुट असते परंतु वादक आपल्या हिशोबाने कमी जस करून घेतो. बाया वाजविण्याची काठी हातातून निसटू नये म्हणून वादक हातात धरून वाजविण्याच्या बाजूला सुती कापड गुंडाळतो. मादी चाटीचा भाग हा उच्च स्वरात चढवलेला असतो त्यामुळे त्याचा आवाज कडक असतो. संबळ हा उभ्याने गळ्यात घालून वाजविण्याचे वाद्य आहे.संबळाच्या बायाकडील बाजू कधीकधी दोन्ही पायात धरून वाजवितात त्यामुळे त्याचा नाद घुमतो. संबळ वाजविणारी व्यक्ती कधीकधी झील(कोरस) धरू लागतो. संबळाच्या समोरच्या बाजूला एक रंगीत कापड बांधलेले असते.
लोकरंगभूमी वरील सर्व लोकवाद्यामध्ये संबळाला एक वेगळेच अस्तित्व प्राप्त झाल्याचे दिसून येते. गोंधळात जसे संबळ वाजवितात तसे आता महाराष्ट्रातील काही शाहीर मंडळी आपल्या पोवाड्याच्या सादरीकरणात विररसाचे पोवाडे गाताना संबळ या लोकवाद्याचा उपयोग करू लागले आहेत.संबळाचे वादन कडक आणि ताल पुरविणारे असते. सादरीकरणात रंग भरण्याचे काम उठाव देण्याचे काम संबळ हे लोकवाद्य करीत असते. त्यामुळे गोंधळ सादरीकरणातील संबळ हे मुख्य घटक आहे. संबळ हे गोंधळातील साथसंगतीचे वाद्य असले तरी अलीकडील काळात स्व. केशवराव बडगे, विजय चव्हाण, पांडुरंग घोटकर या सुप्रसिध्द वादकांनी संबळ वादनाची स्वतंत्र शैली विकसित केली आहे. पांडुरंग घोटकर यांनी जपान येथील आंतरराष्ट्रीय लोककला महोस्तवात संबळ वादन केले होते त्या वादनाने प्रभावित होऊन तेथील लोकांनी तो संबळ जपानच्या म्युझीअम मध्ये ठेवला आहे. गोंधळमहर्षी राजाराम बापू कदम यांच्या घराण्यातही संबळ वादनाची वेगळी परंपरा पहावयास मिळते ज्ञानेश्वरी सारखी मुलगी देखील संबळ उत्तमरीत्या वाजविते.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.