अभ्यंकर, वासुदेवशास्त्री महादेवभट्ट : (४ ऑगस्ट १८६३ – १४ ऑक्टोबर १९४२). महाराष्ट्रातील विख्यात संस्कृत वैयाकरणी व शास्त्रसंपन्न पंडित. व्याकरणमहाभाष्य ह्या ग्रंथाचे मराठी भाषांतरकार म्हणून ते विशेषतः ओळखले जातात. त्यांचा जन्म सातारा येथे विद्यासंपन्न कुटुंबात झाला. अभ्यंकर घराणे मूळचे कोकणातले.वासुदेवशास्त्री यांचे वडिल महादेवभट्ट यांचे निधन लवकरच झाल्याने त्यांचे आजोबा भास्करशास्त्री यांनी त्यांचा सांभाळ केला. वासुदेवशास्त्रींनी शालेय शिक्षण घेतले नाही; परंतु घरीच संस्कृत शास्त्रांचे अध्ययन केले आणि सोबत गणित, भूगोल, इतिहास व भाषा या विषयांचा अभ्यासही केला. महर्षी रामशास्त्री गोडबोले हे व्रतस्थ विद्वान त्यांना अध्यापक म्हणून लाभले.
रामशास्त्री यांच्याकडे शिक्षण घेता घेताच आपल्या गुरूंवरील शिकविण्याचा अतिरिक्त भार हलका करावा ह्यासाठी त्यांनी लहान व बरोबरीच्या विद्यार्थ्यांना शास्त्रे शिकवायला तसेच अवघड वाटणाऱ्या विषयांतील वेचक भागांवर स्वत: टीका व टाचणे लिहायला सुरुवात केली.वयाची वीस वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी परिभाषेन्दुशेखर व लघुशब्देन्दुशेखर या ग्रंथांवर अनुक्रमे तत्त्वादर्श व गूढार्थ प्रकाश हे टीकाग्रंथ लिहिले.वासुदेवाशास्त्री यांचा विवाह १८८४ साली उमाबाई ह्यांच्याशी झाला. राष्ट्रीय संस्कृत पंडित काशीनाथशास्त्री व गंगाधरपंत हे त्यांचे दोन पुत्र. १८९० च्या सुमारास रामाशास्त्र्यांची परवानगी घेऊन ते पुण्यात आले. पुण्यात स्वत: न्यायमूर्ती रानड्यांनी त्यांना आश्रय दिला. तेथे संस्कृत पाठशाळेत त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरु केले. संस्कृत पाठशाळेत सतत ५२ वर्षे व फर्ग्युसन महाविद्यालयात ३६ वर्षे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले.
वासुदेवशास्त्री यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. त्यांनी अनेक ग्रंथांवर टीका लिहिल्या. काही ग्रंथांचे स्वतंत्र लेखन, संपादन व भाषांतरही केले आहे. त्यांची काही उल्लेखनीय ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : संस्कृत टीकाग्रंथ – श्रीभाष्य चतु:सूत्रीवर समासोक्ति, माधवाचार्यकृत सर्वदर्शन संग्रहावर दर्शनांकुर, सिद्धान्तबिंदूवर बिन्दुप्रपात, यतीन्द्रमतदीपिकावर प्रकाश टीका, मीमांसान्यायप्रकाशवर प्रभा ही टीका, कुणर्कटीका, भगवद्गीता अध्याय 1 व 2 अद्वैतांकुर टीका; स्वतंत्र ग्रंथलेखन : अद्वैतामोद, कायमोद, धर्मतत्त्वनिर्णय, धर्मतत्त्वनिर्णयपरिशिष्टम, सूत्रान्तपरिग्रहविचार ; मराठी भाषांतर : ब्रह्मसूत्रशांकरभाष्य, पातंजल व्याकरणमहाभाष्य. न्यायकोश या ग्रंथाची सुधारून वाढविलेली तिसरी आवृत्ती हे त्यांचे उल्लेखनीय लेखनकार्य होय.१९२८ साली वासुदेवशास्त्री फर्ग्युसन महाविद्यालयातून निवृत्त झाले.त्यानंतरही त्यांचे लिखाण व अध्यापनाचे कार्य सुरूच राहिले. १९२९-१९४२ ह्या कालखंडात शास्त्रीजींनी भाषांतर, टीका, टिप्पणी, उपोद्घात, इ. प्रकारचे ६००० पृष्ठांचे लिखाणही केले. त्यांतील टीका चिकित्सक मार्मिक व सुबोध आहेत. त्यांच्या हयातीत या टीकाग्रंथांचे दोन खंड छापून झाले. त्यांचा मुलगा काशिनाथ शास्त्री यांनी प्रस्तावना खंड लिहून उर्वरित सर्व खंड प्रकाशित केले.मूलतः वैयाकरणी असूनही व्याकरणासह वेदान्त, पूर्वमीमांसा, न्याय, योग इ. विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले. कायारिशुद्धि हा त्यांचा शेवटचा ग्रंथ.
ब्रिटिश सरकारने वासुदेवशास्त्रींना त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महामहोपाध्याय ही पदवी प्रदान केली (१९२१). भारतात ही पदवी शास्त्रीय ग्रंथ निर्माण करणाऱ्या, त्यांचे अध्यापन करणाऱ्या किंवा उभयविध कामगिरी करणाऱ्या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या पंडिताला आचार्य पीठाकडून किंवा राज्यकर्त्यांकडून दिली जाते. शास्रीजींकडे अनेक प्राध्यापकही अनेक आकारग्रंथांचे अध्ययन करण्यासाठी येत असत.एका सत्कार समारंभात फर्ग्युसन महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य रँ. ग. स. महाजनी यांनी ‘म. म. वासुदेवशास्त्री हे प्राध्यापकांचे प्राध्यापक आहेत’ असे गौरवोद्गार काढले होते. शास्त्रीजींनी व्याकरण, वेदान्त, न्याय, मीमांसा, साहित्य, न्यायवर्क, ज्योतिष, धर्म इ. विषयांचे अध्ययन करून शेकडो विद्यार्थी तयार केले.वासुदेवशास्त्री पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे सन्मान्य सभासद होते. ते ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष होते. पुणे येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या संस्कृत साहित्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.आनंदाश्रम व भांडारकर या संस्थांमधून प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथांच्या संपादनकार्यातही शास्त्रीजी कार्यरत होते.
संदर्भ :
- अभ्यंकर, म. म. काशीनाथशास्त्री, व्याकरणमहाभाष्य, पुणे,१९२८.
- सहस्रबुद्धे, स. वि; साठे म. दा.,महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचे चरित्र व कार्य, पुणे,१९८५.
समीक्षक – ग. उ. थिटे