वाक्यातील कर्ता,कर्म,क्रियापद विशेषण इत्यादी वाक्य घटकांमध्ये वाक्याच्या अर्थान्वयानाच्या दृष्टीने असणारा संबंध. सुसंवाद हा शब्द तसा दैनंदिन भाषिक व्यवहारात वारंवार कानी पडणारा. ‘त्या दोघांमध्ये सुसंवाद नाही’ असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा लौकिकार्थाने त्या दोघांचे संबंध चांगले नाहीत किंवा त्यांचे काहीतरी बिनसले असा अर्थ ध्वनित होतो.व्याकरणिक संज्ञा म्हणून सुसंवाद ह्या संज्ञेचा विचार करताना संबंध पाहायचा आहे तो वाक्यातील घटकांमधला. मराठीचे ‘सुधीर सकाळी व्यायाम करतो.’ हे वाक्य पाहा. हे वाक्य रचनेच्या दृष्टीने बरोबर आहे, हे विधान वाक्यरचनेचे नियम सांगता आले नाहीत तरी मराठी भाषक करू शकेल. या उलट ‘सुधीर सकाळी व्यायाम करते.’ ह्यात काहीतरी चूक आहे असे मराठी भाषक म्हणेल. ही वाक्यरचना अव्याकरणिक का ठरते, म्हणजेच अव्याकरणिकता कोठे आहे, हे पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय आढळून येते? तर ‘सुधीर’ आणि ‘करतो’ या घटकांचा मेळ बसत नाही असे आपण म्हणू. म्हणजेच त्या दोन घटकांमधे ‘सुसंवाद ’ नाही असे म्हणता येईल.
‘सुसंवाद’ ही व्याकरणिक संज्ञा स्पष्ट करण्यापूर्वी आपण आधी मराठी वाक्यरचनेचा विचार करू. वाक्य म्हणजे शब्दांची सूत्रबद्ध गुंफण. वाक्यविचार करणे म्हणजे वाक्यातील शब्दांच्या गुंफणीतील ही सूत्रबद्धता पाहणे. शब्दांच्या गुंफणीच्या सूत्रांना किंवा नियमांना अनुसरून जेव्हा वाक्यातील शब्दांची रचना असते ते वाक्य व्याकरणिक असते. जेव्हा वाक्यातील शब्दांची ही रचना वाक्यान्वयाच्या नियमानुसार नसते तेव्हा ते वाक्य अव्याकरणिक असते. म्हणजेच वाक्य व्याकरणिक असण्यासाठी वाक्यातील शब्दांमधे सुसंवाद असणे गरजेचे आहे हे यावरून लक्षात येते.
मरीठीची वाक्यरचना सूत्ररूपाने खालील प्रमाणे मांडता येईल.
वाक्य → नामपदबंध (= कर्ता ) + क्रियापदपदबंध
→ ह्या चिन्हाचा अर्थ आहे ‘म्हणजे ’. म्हणून, वरील सूत्राचा अर्थ होतो ‘वाक्य म्हणजे नामपदबंध (नापबं) + क्रियापदपदबंध (क्रिपबं).’
- कर्ता → (नामपदबंध + सामान्य विभक्ती प्रत्यय + { – ने })
(नामपदबंध + प्रथमा विभक्ती प्रत्यय)
- क्रियापदपदबंध → (पूरक) + (विधेयविस्तारक) + क्रियापद
(इथे गोल कंस हा विकल्पदर्शक आहे.)
- पूरक → (कर्मपूरक) / (विधीपूरक) / (भोक्ता) / (शेषपूरक)
- विधेयविस्तारक → (क्रियाविशेषणपदबंध)
क्रियापदपदबंधाच्या सूत्राचा विचार केल्यास काय दिसते? क्रियापदपदबंधात क्रियापद हा एकच घटक अनिवार्य आहे. इतर घटकांची आवश्यकता क्रियापदाच्या प्रकारावर अवलंबून असते.
वाक्यसूत्राच्या नियमानुसार खालील मराठी वाक्यांची फोड अशी करता येईल.
वाक्य → नामपदबंध (=कर्ता) + क्रियापदपदबंध
१. मी(पु) + सकाळी फळं खातो.
२. मी(स्त्री) + सकाळी फळं खाते.
३. तू(पु) + सकाळी फळं खातोस.
४. तू(स्त्री) + सकाळी फळं खातेस.
५. तुम्ही + सकाळी फळं खाता.
६. त्या + सकाळी फळं खातात.
वरील वाक्यांमधे क्रियापदपदबंधातील तीनही घटक आहेत.
क्रियाविशेषणपदबंध = सकाळी
कर्मपूरक = फळं
क्रियापद = खा
‘सुसंवाद’ ही संकल्पना समजून घेण्यासाठी क्रियापदाची रचना जाणून घेणे गरजेचे आहे.
वरील १ ते ६ वाक्यांतील क्रियापदांची फोड केली तर पुढील बाबी दृष्टीस पडतात.
१.खा + त् + ओ
२.खा + त् + ए
३.खा + त् + ओ + स्
४.खा + त् + ए + स्
५.खा + त् + आ
६. खा + त् + आ + त्
यावरून क्रियापदाच्या रचनेविषयी पुढीलप्रमाणे सांगता येईल- या क्रियापदांत धातू आणि प्रत्यय असे दोन स्पष्ट भाग दिसतात. ‘खा’ हा क्रियापदाचा धातू प्रत्येक रूपात दिसतो. ‘त’ हा प्रत्यय प्रत्येक रूपात आहे. तो अपूर्ण क्रियाव्याप्तीचा निर्देशक मानता येईल. अंत्यप्रत्यय ‘ओ’ ‘ए’ ‘स’ ‘आ’ ‘त’ हे लिंग, वचन, पुरुष यांचे प्रत्यय आहेत. धातूनंतर लिंग, वचन, पुरुष यांचे प्रत्यय सोडून इतर जे क्रियाव्याप्ती, काळ आणि अभिवृत्ती चे प्रत्यय येतात त्यांना आख्याताचे प्रत्यय म्हणतात. मराठीत काळ आणि अभिवृत्ती वेगळे करता येत नाहीत. काळ हा क्रियापदातील घटनेचा काळ दर्शवितो तर अभिवृत्ती बोलणाऱ्याची त्याबाबतची वृत्ती दाखविते.
यावरून क्रियापदाचे सूत्र असे मांडता येईल.
- क्रियापद → धातू + (क्रियाव्याप्ती) + कालाभिवृत्ती + सुंसवाद
- धातू → {खा, पी, कर , … }
- क्रियाव्याप्ती → {पूर्ण / अपूर्ण / घटिष्य / घटितव्य}
- काळ → {वर्तमान / भूत / भविष्य}
- अभिवृत्ती → {आज्ञार्थ / विध्यर्थ / संकेतार्थ}
- सुसंवाद → ({लिंग + वचन + पुरुष})
({लिंग + वचन})
({वचन + पुरुष})
ज्या नामानुसार क्रियापद लिंग, वचन, पुरुष प्रत्यय घेते त्या नामाशी क्रियापदाचे सुसंवादित्व आहे असे म्हणतात. वरील १-६ या वाक्यांत क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन, पुरूष प्रमाणे प्रत्यय घेते. याचाच अर्थ क्रियापदाचा कर्त्याशी सुसंवाद आहे असे म्हणता येईल.
आता खालील वाकये पाहा:
७. तुषारने आंबा खाल्ला.
८. तुषारने पपई खाल्ली.
९. तुषारने सफरचंद खाल्ले.
वरील वाक्यांत
कर्ता = तुषारने
कर्मपूरक = ७.आंबा ८.पपई ९.सफरचंद
क्रियापद = ७. खाल्ला ८.खाल्ली ९.खाल्ले
या वाक्यांतील क्रियापदांची फोड केली तर पुढील बाबी दिसतात-
७.खाल् + ल + आ
८.खाल् + ल + ई
९.खाल् + ल + ए
यामधे तिन्ही वाक्यात धातू ‘खाल्’ प्रत्येक रूपात दिसतो. ‘ल’ हा पूर्ण क्रियाव्याप्तीचा प्रत्यय आहे. आ, ई, ए हे लिंग, वचन यांचे प्रत्यय कर्माच्या लिंग, वचनानुसार आलेले दिसतात. याचाच अर्थ या वाक्यांमध्ये क्रियापदाचा कर्माशी सुसंवाद आहे असे म्हणता येते.
क्रियापदाचे सुसंवादित्व सांगताना आपण कर्ता आणि कर्म या दोन्ही संकल्पना गृहीत धरल्या. वस्तुतः सुसंवादित्वाच्या साहाय्यानेच कर्ता किंवा कर्माची निश्चिती करता येते. क्रियापदाचा सुसंवाद कधी कर्त्याशी राखला जातो, तर कधी कर्माशी राखला जातो.
मराठीत विशेषण – नाम असाही सुसंवाद राखला जातो.
विशेषणाचे दोन प्रकार पडतात.
१.विकारी : ज्यांना लिंग, वचन, विभक्ती यांचा विकार होतो. उदा. पांढरा, निळा, ताजा इ.
२. अविकारी : ज्यांना लिंग, वचन, विभक्ती यांचा कोणताच विकार होत नाही. उदा. लाल, सुंदर, गोड, हुशार इ.
विकारी विशेषणाची रूपे खालील प्रमाणे होतात.
विभक्ती पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी
ए.व. अ.व. ए.व. अ.व. ए.व. अ.व.
प्रथमा(सरळ) निळा निळे निळी निळ्या निळे/निळं निळी
सामान्य निळ्या निळ्या निळ्या निळ्या निळ्या निळ्या
विशेषण – नाम सुसंवाद असा दाखवता येईल-
विभक्ती लिंग एकवचन अनेकवचन
प्रथमा पु. निळा (लाल) दिवा निळे (लाल) दिवे
स्त्री. निळी (लाल) साडी निळ्या (लाल) साड्या
नपुं. निळे/निळं (लाल) फूल निळी (लाल) फुले/फुलं
वरील उदाहरणांवरून ‘निळा’ हे विशेषण संबंधित नामांच्या लिंग, वचन, विभक्ती प्रमाणे बदललेले दिसते. याचाच अर्थ त्यांच्याशी सुसंवाद राखते. ‘लाल’ हे विशेषण अविकारी असल्यामुळे संबंधित नामांच्या लिंग, वचन, विभक्तीचे प्रत्यय त्याला लागलेले दिसत नाहीत.
नामाला सामान्य विभक्ती विकार झालेला असताना विशेषणही त्याच्याशी विभक्तिनिष्ठ सुसंवाद साधते.
उदा. प्रथमा (सरळ): ए.व. अ.व.
निळा दिवा निळे दिवे
सामान्य : निळ्या दिव्याखाली निळ्या दिव्यांखाली
मराठीत विशेषणाचा नामाशी विभक्तिनिष्ठ सुसंवाद हा एकाच रूपाने दर्शवला जातो.
संदर्भ :
- इंदापूरकर, चं. द. मराठी भाषा : व्यवस्था आणि अध्यापन, १९८८.२.धोंगडे, रमेश वा., अर्वाचीन मराठी, : १९८३.