खोंदा, यान :– (१४ एप्रिल १९०५ – २८ जुलै १९९१). डच वेदाभ्यासक व भारतविद्यावंत. साउथ हॉलंड (नेदर्लंड्स) मधील हौडा येथे त्यांचा जन्म झाला. नेदर्लंड्समधील उत्रेक्त विद्यापीठात ते संस्कृतचे पहिले प्राध्यापक होते. अभिजात वाङ्मयाचे अध्ययन केल्यानंतर डच प्राच्यविद्याविद् विलेम कलांद यांच्याकडे त्यांनी संस्कृत व इतर विषयांचे अध्ययन केले. इंडोनेशियन भाषा, इंडो-यूरोपियन भाषाशास्त्र तसेच संस्कृत भाषा, भारतीय धर्म, वैदिक साहित्य इत्यादी विषयांचे अध्ययन करून त्यांनी प्रचंड ग्रंथनिर्मिती केली. डच, जर्मन व इंग्रजी या भाषांमध्ये त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या संपूर्ण लेखनाची सूची सिलेक्टेड स्टडीज (६ खंड, १९७५-१९९१) ह्या नावाने प्रसिद्ध झालेल्या लेखसंग्रहात दिली आहे. सिलेक्टेड स्टडीज मध्ये त्यांच्या महत्त्वपूर्ण लेखांचा समावेश असून त्यांतील काही लेख ग्रंथ म्हणूनही मानता येतील इतके मोठे आहेत. ग्रीकमधील deikhani हे क्रियापद आणि इंडोयूरोपियन धातू Deidre ह्या विषयावर खोंदा यांनी पीएच.डी. साठी संशोधन केले आहे.
खोंदा यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. त्यांनी जवळजवळ सत्तर ग्रंथ व सात ग्रंथ होतील इतके स्फुटलेख लिहिले. त्यांनी मुख्यत: संस्कृत भाषाशास्त्र, वैदिक धर्म या विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या काही प्रमुख ग्रंथांमध्ये पुढील ग्रंथांचा समावेश होतो, ते असे : The Rigvidhana (1951), Remarks on Sanskrit Passive (1951), Aspects of Early Vishnuism (1954), The character of Indo-European Moods(1956), Stylistic repetition in the Veda (1959), Epithets in the Rig-Veda (1959), The vision of Vedic Poets (1963), Change and Continuity in Indian Religion (1965), Vishnuism and Shaivism (1970), The Duel Divinities in the religion of the Veda (1974), Vedic Literature (1975). खोंदा यांच्या लेखनामध्ये त्यांची चिकित्सक दृष्टी प्रत्ययास येते. अचूक अवतरणे, तळटीपा आणि संदर्भसाहित्य यांनी त्यांचे लेखन समृद्ध आहे. संस्कृत व्याकरणासंदर्भात कात्यायमुनींनी ज्याप्रमाणे उक्त, अनुक्त आणि दुरूक्त ह्यांचा विचार करून योग्य त्या सुधारणांसह वार्त्तिके लिहिली, त्याप्रमाणे गोंडा यांनी आपल्या लेखनातून सर्व गोष्टींचा परामर्श घेऊन अत्यंत समतोल व परिपूर्ण दृष्टीने लेखन केले. वेदांवर, विशेषत: ऋग्वेदावर त्यांनी वेगवेगळ्या दृष्टीने लेखन केले. वैदिक लिटरेचर हा त्यांचा ग्रंथ भारतीय वाङ्यमयाचा इतिहास या ग्रंथातील पहिला भाग होय. सेवानिवृत्तीनंतर गोंडा यांनी प्रामुख्याने वैदिक कर्मकांडावर लेखन केले. त्यांच्या लेखांमध्ये ब्राह्मणग्रंथातील व्युत्पत्त्या, उत्सवकल्पना, ऋग्वेदातील इहवादी सूक्ते इत्यादी विषयांच्या लेखांचा अंतर्भाव होतो.
खोंदा रॉयल नेदर्लंड्स अॅकॅडेमी ऑफ आर्टस अँड सायन्सेस या संस्थेचे ते सदस्य होते (१९५७). पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय प्राच्यविद्यापरिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना प्राप्त झाला (१९७८).
उत्रेक्त येथे त्यांचे निधन झाले.