दांडेकर, रामचंद्र नारायण : (१७ मार्च १९०९ – ११ डिसेंबर २००१). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संस्कृत पंडित आणि भारतविद्यावंत. त्यांचा जन्म साताऱ्यात सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटूंबात झाला आणि सुरुवातीचे शालेय शिक्षणही तिथेच झाले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून झाले. संस्कृत त्याचप्रमाणे प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास अशा दोन विषयात त्यांनी एम्. ए. ही पदवी प्राप्त केली( १९३१, १९३३). जर्मनीतील हायडलबर्ग विद्यापीठाततून त्यांनी ‘डेर वेदिश मेंश’ (वैदिक मानव) या विषयावर जर्मन भाषेत प्रबंध लिहून पीएच. डी. पदवी मिळविली (१९३८). महाविद्यालयीन जीवनात त्यांना अनेक शिष्यवृत्त्या आणि पारितोषिके मिळाली होती.
सांगलीचे विलिंग्डन् महाविद्यालय, पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे संस्कृत तसेच प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृति ह्या विषयांचे अध्यापन त्यांनी केले. काही वर्षे अध्यापन करून ते जर्मनीला शिष्यवृत्ती मिळवून उच्च शिक्षणासाठी गेले.तेथून डॉ डॉक्टरेट ही पदवी घेतल्यानंतर ते पुन्हा फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झाले (१९३९-५०). पुणे विद्यापीठाची स्थापना झाल्यावर १९४९ पासून पुणे विद्यापीठात संस्कृत-प्राकृत-भाषाविभाग-प्रमुख आणि प्राध्यापक ह्या स्वरूपात काम केले. १९६४-१९७४ ह्या दहा वर्षात पुणे विद्यापीठातील संस्कृत-प्रगत-अध्ययन-केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. निवृत्तीनंतर त्यांची गुणश्री (एमेरिटस) प्राध्यापक म्हणून त्याच ठिकाणी नियुक्ती झाली. याशिवाय त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे १९३९ पासून मानद सचिव म्हणून काम पाहिले तसे ते अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषदेचे सन्मान्य सचिव होते. शिवाय संस्कृत आयोग सचिव (१९५६-५७,भारत शासन गठित), कुप्पुस्वामी शास्त्री रिसर्च इन्स्टिट्यूट ,चेन्नई ; एशियाटिक सोसायटी, कलकत्ता(कोलकाता); सोशिएट एशिअॅटिक, पॅरिस; आदींचे सन्मानीय सदस्य होते आणि इंटरनॅशनल युनियन फॉर ओरिएंटल अॅण्ड एशिअन स्टडीज या संस्थेचे ते अध्यक्ष होते. जागतिक संस्कृत परिषदेचे ते १९७९ ते ९४पर्यंत सदस्य होते. या बहुविध भारतीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या निमित्ताने त्यांनी भारत आणि परदेशात भ्रमंती केली. महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार मंडळातही ते होते आणि साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य होते. यामुळे संस्कृतच्या सर्व क्षेत्रात त्यांना सहभागी होता आले आणि त्यांनी संस्कृतच्या अभिवृद्धीचे कार्य सक्षमतेने केले.
दांडेकरांच्या लेखनाचा व्याप मोठा आहे. त्यांनी मराठी, इंग्रजी व जर्मन भाषांत विपुल लेखन केले आहे. तसेच अनेक ग्रंथांचे संपादन केले. त्यांच्या ग्रंथांपैकी काही महत्त्वाचे व उल्लेखनीय ग्रंथ असे : वेदिक मायथॉलॉजिकल ट्रॅक्ट्स (१९७९), इनसाईट्स इनटू हिंदुइझम (१९७९), द एज ऑफ द गुप्ताज अॅण्ड अदर एसेज (१९८२), रिसेंट ट्रेंड्स इन इन्डॉलॉजी(१९७८-निबंध), Der mensh Im Denken Des Hinduismus (१९८४-जर्मन भाषेतील निबंध), वेदिक बिब्लिॉग्राफी :सहा खंड (१९४६-२००२), बिब्लिओग्राफी (१९८७), शल्यपर्व आणि अनुशासनपर्व (१९६६ – महाभारताची चिकित्सक प्रकरणे), श्रौतकोश (दोन खंड), ज्ञानदीपिका (१९४१), रसरत्नप्रदीपिका (१९४५-चिकित्सक आवृत्त्या) इत्यादी. ‘वैदिक देवदांचे अभिनवदर्शन’ (१९५१) या ग्रंथात त्यांनी काही वैदिक देवतांच्या मूलभूत स्वरूपावर प्रकाश टाकला आहे. त्याची वेदविषयक लेखनाची सूची वेद अभ्यासकांना अत्यंत उपयुक्त असून तिचा अखेरचा (सहावा खंड) मरणोत्तर प्रकाशित झाला. तो अंशत: पुणे येथील कोश अभ्यासक लेखक डॉ. गणेश थिटे यांनी संपादित करून प्रसिद्ध केला आहे.
संस्कृत अध्ययन आणि प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील दांडेकर यांच्या कार्याचा सन्मान आणि गौरव अनेक संस्थांनी-विद्यापीठांनी केला आहे. त्यांपैकी काही उल्लेखनीय मानसन्मानांत भारत सरकारचा पद्भूषण (१९६२), संस्कृत साहित्य विशिष्ट पुरस्कार (उत्तर प्रदेश-संस्कृत अॅकॅडेमी,१९७८), श्री शंकरदेव अॅवॉर्ड (१९९१-९२), विश्वभारती अॅवॉर्ड (उत्तर प्रदेश १९९३), राष्ट्रभूषण अॅवॉर्ड (१९९५), हायेस्ट मेरिट डिप्लोमा (इटली) यांचा उल्लेख होतो. याशिवाय त्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, हायड्लबर्ग विद्यापीठ, संपूर्णानंद विद्यापीठ या विद्यापीठांनी सन्मान्य डी. लीट. देऊन गौरविले आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या सुवर्ण जयंतीनिमित्त त्यांना सन्मानपूर्वक ताम्रपट देण्यात आला. हायडलवर्ग विद्यापीठाने त्यांना खास निमंत्रित करून डॉक्टरेट या त्यांच्या पदवीचे नूतनीकरण केले होते (१९८८).
दांडेकरांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केले. संस्कृत साहित्यातील कूट प्रश्नांचे संशोधन केले. देशात व देशाबाहेर त्यांचा शिष्यवर्ग व चाहता वर्ग मोठा होता. त्यांना त्यांच्या षष्ठद्वी निमित्त (१९६९) आणि अमृतमहोत्सवी वर्षी (१९८४) अमृतधारा ग्रंथ अर्पण करून त्याचा सन्मान केला गेला आहे .
वृद्धापकाळाने त्यांचे पुण्यात निधन झाले.