अष्टांगयोगापैकी धारणा हे योगाचे सहावे अंग होय. यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ही योगाची बहिरंग साधने आहेत तर धारणा, ध्यान आणि समाधी ही अंतरंग साधने होत. पतंजलींनी “देशबन्धश्चित्तस्य धारणा|” (योगसूत्र ३.१) – अर्थातच एखादया विशिष्ट वस्तूवर मन स्थिर करणे म्हणजे धारणा अशी धारणेची व्याख्या केली आहे. शिव पुराणात “एखादया विशिष्ट देशावर मन स्थिर करणे म्हणजे धारणा” अशी धारणेची व्याख्या आढळते (धारणा नामचित्तस्य स्थानबन्ध्स्समासतः|; शिवपुराण, वायवीय संहिता, उत्तरभाग ३७.४८).
धारणेच्या संदर्भात देश म्हणजे ठिकाण किंवा वस्तू उदाहरणार्थ – भ्रूमध्य किंवा पर्वतशिखर. मार्कण्डेय पुराणाने “मन स्थिर करणे म्हणजे धारणा” (धारणेत्युच्यते चेऽयं धार्यते यन्मनो यया|, ३६.४१) अशी धारणेची साधी व सोपी व्याख्या केली आहे. मन स्वभावतः चंचल असते. ते एका ठिकाणी बांधून ठेवण्यामुळे (बंध) त्याची ध्यानाकडे प्रवृत्ती होते. प्राणायामामुळे सत्त्वगुण प्रबळ होतो आणि मन धारणेसाठी योग्य होते. जागृतावस्थेत चित्त संपूर्ण शरीरभर संचार करीत असते. ज्ञानेंद्रिये ज्यावेळी विषयाचे ग्रहण करतात किंवा कर्मेंद्रिये कर्मरत असतात त्यावेळी चित्त त्या त्या विषयावर अथवा शरीराच्या त्या त्या भागावर स्थिर होत असते. ही स्थिरता जाणीवपूर्वक शरीराच्या कोणत्याही भागावर असली किंवा वस्तूवर असली तर तिला धारणा म्हणता येईल. धारणेमध्ये चित्तवृत्तिरूपाने त्या त्या पदार्थाला व्यापून त्यावर स्थिरावते. धारणेसाठी शरीरांतर्गत देश निवडल्यास ती आध्यात्मिक धारणा होय. शरीरामधील नाडीचक्रापैकी कोणतेही एक चक्र धारणेचे आलम्बन (ज्या विषयावर चित्त स्थिर होते तो विषय) होऊ शकते. नाभि, हृदय, छाती, कंठ, मुख, नासिकाग्र, नेत्र, भ्रूमध्य (दोन भुवयांचा मध्य), मूर्धा (डोके) यापैकी कोणत्याही एका देशावर चित्त स्थिर केल्यास धारणा सिद्ध होते (गरुड पुराण १.२२६.२१-२२). बाह्य देशांमध्ये – सूर्य, चंद्र, अग्नी इत्यादींचा समावेश होतो. ईश्वरगीतेनुसार (११.३९) धारणेसाठी हृदयकमल (अनाहतचक्र), नाभि, मूर्धा किंवा पर्वताचे शिखर इत्यादी ठिकाणी चित्ताला स्थिर करावे. शाण्डिल्य उपनिषदानुसार आत्म्यामध्ये मनाची धारणा; हृदयाकाशामध्ये बाह्य आकाशाची धारणा; तसेच पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश या पंचभूतांची धारणा अशी त्रिविध धारणा सांगितली आहे (शाण्डिल्य उपनिषद् १.९.१; वसिष्ठसंहिता, योगकाण्ड ४.३). वसिष्ठसंहितेमध्ये (योगकाण्ड ४.९) ल, व, र, य, ह या पाच वर्णांवर चित्त स्थिर करणे या धारणेचाही निर्देश केला आहे. हे वर्ण क्रमाने पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या भूतांशी संबद्ध आहेत. तसेच येथे पाच भूतांवर आणि त्यांच्या अधिष्ठात्री देवतांवर चित्त स्थिर करणे या धारणेचाही उपदेश आढळतो. पृथ्वीची अधिष्ठात्री देवता ब्रह्मा, जलाची विष्णू, अग्नीची रुद्र, वायूची महत्-तत्त्व आणि आकाशाची अव्यक्त जगदीश्वर ही अधिष्ठात्री देवता होय. घेरंडसंहितेनुसार वायूची अधिष्ठात्री देवता ईश्वर आणि आकाशाची सदाशिव आहे (३.७७,८०). पार्थिवी, आम्भसी, आग्नेयी, वायवी, आकाशी असे धारणेचे पाच प्रकार क्रमाने स्तंभिनी, प्लाविनी, दहनी, भ्रामणी, शमनी या नावाने परिचित आहेत (घेरंडसंहिता ३.७०, ७२, ७५, ७७, ८०; स्कंदपुराण, काशीखण्ड ४१.११८).
पायापासून गुडघ्यापर्यंत पार्थिवी धारणेचा देश आहे. गुडघ्यापासून गुदापर्यंत आम्भसी, गुदापासून हृदयापर्यंत दहनी, हृदयापासून भ्रूमध्यापर्यंत वायवीतर, भ्रूमध्यापासून ब्रह्मरंध्रापर्यंत आकाशी धारणेचा आध्यात्मिक देश आहे (योगसूत्र २.५३). घेरंडसंहितेनुसार विपरीतकरणी, योनि, वज्रोली, शक्तिचालनी, तडागी, माण्डुकी आणि शाम्भवी या मुद्रा धारणेला योग्य आहेत (३.२).
प्राणायामातील धारणेला ध्यान-धारणा म्हणतात. धारणेचा अवधी १२ प्राणायामांच्या अवधी एवढा असतो. धारणा, ध्यान आणि समाधी यांना योगशास्त्रात एकत्रितपणे ‘संयम’ अशी संज्ञा आहे (योगसूत्र ३.४).
पहा : ध्यान, समाधि.
संदर्भ :
- आचार्य श्रीनिवास शर्मा,घेरण्ड-संहिता, चौखम्बा विद्याभवन, वाराणसी, २००६.
- कोल्हटकर,केशव कृष्णाजी, भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातञ्जल योगदर्शन, आदित्य प्रतिष्ठान, पुणे, २०१४.
- Pai, G. K, Yoga Doctrines in Mahāpurāṇa-s, Bhandarkar Oriental Research Institute, Pune, 2007.
- VasiṣṭhaSaṃhitā, Kaivalyadhama S.M.Y.M. Samiti, Lonavla, 2005.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर