हठयोगावरील संस्कृत भाषेतील महत्त्वाचा पद्यग्रंथ. संहिता म्हणजे संग्रह अथवा विशिष्ट पद्धतीने केलेली मांडणी. हठयोगावर गोरक्षसंहिता, हठयोगप्रदीपिका, घेरण्डसंहिता  आणि शिवसंहिता  हे ग्रंथ प्रमाण मानले जातात. मुनिवर्य घेरण्ड यांनी चंडकपाली नावाच्या जिज्ञासू राजाला दिलेले ज्ञान घेरण्डसंहिता  या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे. मुनिवर्य घेरण्ड आणि राजा चंडकपाली यांच्या अस्तित्वाविषयी ऐतिहासिक आधार प्राप्त होत नाही. मात्र हठयोगप्रदीपिकेच्या काही प्रतींमध्ये सिद्धांच्या यादीमध्ये चंड आणि कापालिक अशी नावे आढळतात.

घेरण्डसंहितेत हठयोग ही संज्ञा वापरली नसून त्याऐवजी ‘घटस्थ योग’ या संज्ञेचा वापर केला आहे. घट म्हणजे शरीर. घटस्थ योग म्हणजे शरीराने ज्याची साधना करता येईल असा योग. या ग्रंथात प्रारंभी राजा चंडकपाली योगीश्वर घेरण्ड मुनींच्या कुटीमध्ये जाऊन त्यांना घटस्थ योगाचे रहस्य विचारतो. त्यावर ‘योगासारखे बळ नाही’ असे प्रतिपादन करून घेरण्ड मुनी म्हणतात की — ‘कर्मामुळे देह प्राप्त होतो. योगाभ्यास न करणाऱ्याचा देह जीर्ण होतो म्हणून योगाभ्यासाने घट मजबूत करावा. पाप किंवा पुण्यामुळे जीव जन्माला येतो. कर्मामुळे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सापडतो. त्यापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी घटशुद्धी साधावी.’ या प्रारंभिक संवादानंतर हा ग्रंथ प्रायश: निवेदनात्मक स्वरूपाचा झाला आहे. ग्रंथाची भाषा सुगम व सुबोध आहे. प्रसाद आणि लालित्य ही यातील शैलीची वैशिष्ट्ये आहेत.

या ग्रंथामध्ये हठयोगप्रदीपिकेतील बरेचसे श्लोक जसेच्या तसे आढळतात. तसेच आशयाच्या दृष्टीनेही उभय ग्रंथात अनेक श्लोकांचे साम्य आहे. हठयोगप्रदीपिकेचा काळ सामान्यपणे इ. स. १३५०-१४०० असा मानला जातो. घेरण्डसंहिता  हा ग्रंथ हठयोगप्रदीपिकेच्या नंतरचा असून त्याचा काळ सामान्यत: इ. स. १६५०-१७०० असावा, असा अंदाज आहे. घेरण्डसंहिता  ही शिवसंहितेच्या समकालीन आहे असे मानले जाते. उपलब्ध माहितीनुसार वरील ग्रंथ सर्वप्रथम भुवन चन्द्र वसाक यांनी कलकत्त्याला इ. स. १८७७ मध्ये संपादित केला.

या संहितेमध्ये योगाची षट्कर्मे, आसने, मुद्रा, प्रत्याहार, प्राणायाम, ध्यान व समाधी अशी केवळ सात अंगे सांगितली आहेत. संहितेच्या प्रकरणांना उपदेश ही संज्ञा आहे. या संहितेत एकूण सात उपदेश असून या सर्व उपदेशांना मिळून ‘घटस्थं सप्तसाधनम्’ अशी संज्ञा दिली आहे. विविध प्रतींमध्ये आढळणारी श्लोकसंख्या ३४६ ते ३५० अशी आहे. (१) षट्कर्मसाधन (२) आसन-प्रयोग (३) मुद्रा-प्रयोग (४) प्रत्याहार-प्रयोग (५) प्राणायाम-प्रयोग (६) ध्यानयोग आणि (७) समाधियोग अशी या उपदेशांची नावे आहेत. यामध्ये २१ प्रकारच्या क्रिया, ३२ आसने, २५ मुद्रा, ५ प्रत्याहार, १० प्रकारचे प्राणायाम, ३ ध्याने आणि ६ प्रकारच्या समाधी ह्या विषयांवर विवेचन केले आहे. या सात उपदेशांमध्ये साधकाचा शारीरिक ते आध्यात्मिक प्रवास अंतर्भूत झाला आहे.

(१) षट्कर्मसाधन (प्रथमोपदेश) : या उपदेशामध्ये योगाचे महत्त्व, मनुष्यदेहरूपी साधनाचे महत्त्व, त्याची शुद्धी आणि शुद्धीची आवश्यकता हे विषय आले आहेत. षट्कर्माने शरीराच्या  भागांची शुद्धी होते, आसनांमुळे शरीर दृढ होते; मुद्रांच्या अभ्यासाने शरीरास स्थिरता प्राप्त होते व प्रत्याहाराच्या अभ्यासाने मनाचे धैर्य वाढते; प्राणायामाने शरीर हलके होते; ध्यानामुळे आत्म्याचा साक्षात्कार होतो; समाधीमुळे मन निर्लिप्त होऊन त्यामुळे मुक्ती साधते असे प्रतिपादन या उपदेशात केले आहे. शरीराच्या शुद्धीसाठी धौती, बस्ती, नेती, लौलिकी, त्राटक आणि कपालभाती ही षट्कर्मे सांगितली असून त्यांची सविस्तर वर्णने आहेत.

(२) आसन-प्रयोग (द्वितीयोपदेश) : या उपदेशामध्ये (१) सिद्धासन (२) पद्मासन (३) भद्रासन (४) मुक्तासन (५) वज्रासन (६) स्वस्तिकासन (७) सिंहासन (८) गोमुखासन (९) वीरासन (१०) धनुरासन (११) शवासन (१२) गुप्तासन (१३) मत्स्यासन (१४) मत्स्येन्द्रासन (१५) गोरक्षासन (१६) पश्चिमोत्तानासन (१७) उत्कटासन (१८) संकटासन (१९) मयूरासन (२०) कुक्कुटासन (२१) कूर्मासन (२२) उत्तानकूर्मासन (२३) मंडूकासन (२४) उत्तानमंडूकासन (२५) वृक्षासन (२६) गरुडासन (२७) वृषासन (२८) शलभासन (२९) मकरासन (३०) उष्ट्रासन (३१) भुजंगासन आणि (३२) योगासन या आसनांचे विधी व लाभ सांगितले आहेत. संहितेतील वर्णनामध्ये शीर्षासनाचे नाव दिसत नाही पण यांतील विपरीतकरणी मुद्रा म्हणजे शीर्षासन होय.

(३) मुद्रा-प्रयोग (तृतीयोपदेश) : यामध्ये २५ मुद्रांचे वर्णन आले असून त्यातच ५ धारणा व ५ बंध समाविष्ट आहेत. त्या मुद्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : (१) महामुद्रा (२) नभोमुद्रा (३) उड्डीयानबंध (४) जालंधरबंध (५) मूलबंध (६) महाबंध (७) महावेध (८) खेचरीमुद्रा (९) विपरीतकरणी (१०) योनिमुद्रा (११) वज्रोलि (१२) शक्तिचालन  (१३) ताडागी (१४) मांडुकी (१५) शांभवी (१६) अश्विनी (१७) पाशिनी (१८) काकी (१९) मातंगिनी (२०) भुजंगी (२१) पार्थिवी धारणा (२२) आम्भसी धारणा (२३) वैश्वानरी धारणा (२४) वायवी धारणा आणि (२५) नभोधारणा. ह्या मुद्रा योगसाधनेसाठी उपकारक असून त्यांच्यामुळे सर्व प्रकारचे भोग प्राप्त होतात, सर्व रोगांचा परिहार होतो, भूक वाढते, पचनक्रिया चांगली होते आणि मनुष्य सुदृढ राहतो तसेच साधकाला मुक्ती प्राप्त होते असे म्हटले आहे.

(४) प्रत्याहार-प्रयोग (चतुर्थोपदेश) : हा उपदेश अत्यंत संक्षिप्त आहे. प्रत्याहारामुळे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंचा नाश होतो. आदर किंवा तिरस्कार, आनंददायक किंवा दु:खदायक गोष्टी, इष्ट किंवा अनिष्ट रुची अशा द्वंद्वांमध्ये मन स्थिर ठेवणे म्हणजे प्रत्याहार होय. रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श या विषयांकडे मन आकृष्ट होत असते. प्रत्याहारामुळे त्यावर संयम प्राप्त होतो. या उपदेशात आलेला ‘यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम्| ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ||’ हा श्लोक भगवद्गीतेमधून (६.२६) घेतलेला आहे.

(५) प्राणायाम-प्रयोग (पंचमोपदेश) : उपदेशाच्या आरंभी योग्याच्या कुटीचे वर्णन आले आहे. मिताहार तसेच आहारातील इष्ट व वर्ज्य वस्तू यांचेही विवेचन या उपदेशात आढळते. यातील मिताहाराची व्याख्या इतर ग्रंथांतील व्याख्येपेक्षा वेगळी आहे. ती अशी — ‘शुद्ध, गोड, रुचकर, स्निग्ध भोजन योग्याने अर्ध्या भुकेइतकेच घ्यावे. असे रसपूर्ण भोजन प्रेमाने घेणे याला मिताहार म्हणतात.’ प्रस्तुत उपदेशात प्राणायामासाठी योग्य ऋतू, आसन आणि नाडीशुद्धी यांच्या विवेचनानंतर प्राणायामाचे प्रकार वर्णिले आहेत.

(६) ध्यानयोग (षष्ठोपदेश) : स्थूल, ज्योती व सूक्ष्म असे ध्यानाचे तीन प्रकार सांगितले आहेत. स्थूल ध्यानात ध्यानाचे आलम्बन प्रत्यक्ष अथवा काल्पनिक वस्तू असते. ज्योति-ध्यानात प्रकाश हा ध्यानाचा विषय असतो, तर सूक्ष्म ध्यानामध्ये बिंदूवर अथवा कुण्डलिनी देवतेवर ध्यान केले जाते. सूक्ष्म ध्यानाची परिणती आत्मसाक्षात्कारामध्ये होते (आत्मा साक्षात् भवेत् यस्मात् तस्मात् ध्यानं विशिष्यते | ६.२२) म्हणून ध्यानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

(७) सप्तमोपदेश (समाधियोग) : यामध्ये राजयोग समाधीचे ६ प्रकार वर्णन केले आहेत. मात्र येथील राजयोग संज्ञेचा पातंजल योगाशी दूरान्वयानेही संबंध नाही.

ध्यानयोगसमाधी, रसानन्दसमाधी, नादयोगसमाधी, लयसिद्धिसमाधी, भक्तियोगसमाधी आणि मनोमूर्च्छेद्वारे समाधी हे सहा प्रकार राजयोग समाधीमध्ये समाविष्ट केले आहेत. ते अनुक्रमे शांभवीमुद्रा, खेचरीमुद्रा, भ्रामरीमुद्रा, योनिमुद्रा, भक्ती व मनोमूर्च्छेद्वारे साध्य होतात. समाधी अहंकार आणि आसक्तीचा निरास करते आणि जीवाचे आणि परमात्म्याचे ऐक्य घडवून आणते. समाधी हे मुक्तीचे साधन आहे असे प्रतिपादन करून घेरण्ड मुनी ग्रंथाचा समारोप करतात.

पहा : प्राणायाम, षट्कर्म, समाधि, हठयोग.

संदर्भ :

  • Kaivalyadhama S.M.Y.M. Samiti, Gheraṇḍa Saṃhitā,  Lonavla, 1997.
  • Swami Niranjanananda Saraswati, Gheranda Samhita, Yoga Publication Trust, Bihar, 2004.

समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर