अपरान्तज्ञान म्हणजे मृत्यूचे ज्ञान. प्रत्येक प्राण्याचा जन्म झाल्यानंतर त्याचा मृत्यू निश्चितच आहे. सामान्य माणसाला मृत्यू कधी येणार याचे ज्ञान नसते; परंतु योगशास्त्रानुसार मृत्यू कधी येणार याचेही ज्ञान होणे शक्य आहे. पतंजली महर्षींनी ‘सोपक्रमं निरुपक्रमं च कर्म तत्संयमात् अपरान्तज्ञानम् अरिष्टेभ्यो वा’ (३.२२) या सूत्रामध्ये मृत्यू कधी येणार याचे ज्ञान कसे होऊ शकते, याविषयी दोन उपायांचा उल्लेख केला आहे.
यातील प्रथम उपाय म्हणजे कर्मावर संयम (धारणा, ध्यान, समाधी) केल्याने योग्याला मृत्यूचे ज्ञान होऊ शकते. ज्याप्रमाणे स्वतःच्या कर्मावर संयम केल्याने स्वतःच्या मृत्यूचे ज्ञान होऊ शकते, त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या कर्मावर संयम केल्याने योग्याला दुसऱ्यांच्या मृत्यूचे ज्ञानही होऊ शकते. योगशास्त्रानुसार कर्म हे दोन प्रकारचे असते – (१) सोपक्रम : जे कर्म आपले फळ देण्यास सिद्ध आहे, म्हणजे ज्या कर्माचे फळ लवकर मिळते अशा कर्माला सोपक्रम कर्म असे म्हणतात. (२) निरुपक्रम : ज्या कर्माचे फळ काही काळानंतर मिळते, अशा कर्माला निरुपक्रम कर्म असे म्हणतात.
अशा दोन्ही प्रकारच्या कर्मांवर संयम केल्याने योग्याला त्यांचे यथार्थ ज्ञान प्राप्त होते व त्या अनुषंगाने मृत्यू कधी येणार याचेही ज्ञान प्राप्त होते. योगशास्त्रानुसार कोणत्याही जीवाचे आयुर्मान त्याच्या कर्माने निश्चित होते. कर्माचे ज्ञान झाल्यानंतर किती आयुष्य शिल्लक आहे व मृत्यू कधी येणार याचे ज्ञान योग्याला होते.
अपरान्तज्ञान प्राप्त करण्याचा अजून एक उपाय म्हणजे अरिष्टांचे निरीक्षण करणे होय. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू येण्यापूर्वी काही महिन्यांपासून अनेक मरणसूचक चिन्हे दिसू लागतात, त्यांना अरिष्ट असे म्हणतात. ही अरिष्टे ज्या व्यक्तीचा मृत्यू होणार आहे, त्या व्यक्तीला किंवा काही अरिष्टे आजूबाजूच्या अन्य व्यक्तींनाही दिसू शकतात. या मरणसूचक चिन्हांचे लक्षपूर्वक निरीक्षण केले, तर मृत्यू कधी येणार याविषयीचे ज्ञान प्राप्त होऊ शकते. या दोन उपायांपैकी कर्मावर संयम करून मृत्यूचे ज्ञान प्राप्त करणे हे फक्त योग्यालाच शक्य आहे, परंतु अरिष्टांचे निरीक्षण करून सामान्य व्यक्तीही मृत्यूचे ज्ञान प्राप्त करून घेऊ शकते.
पहा : अरिष्ट, कर्म.
संदर्भ :
- आगाशे, काशिनाथशास्त्री (संपा.), पातञ्जलयोगसूत्राणि, पुणे, १९०४.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर