हठयोगातील प्रमुख मुद्रांपैकी थोर वा श्रेष्ठ असा एक मुद्राप्रकार. योगाभ्यासाच्या दृष्टीने मुद्रा म्हणजे शरीराच्या विविध अवयवांची विशिष्ट स्थिती अथवा शरीराचा विशिष्ट आविर्भाव. महामुद्रा हा बैठा आसनप्रकार आहे. हठप्रदीपिकेत (३.६-७) जरा (वृद्धत्व)-मरण-नाशक अशा दहा मुद्रा सांगितलेल्या असून त्यांपैकी ही एक मुद्रा होय. ही मुद्रा बंध-मुद्रा (शरीर विशिष्ट अवस्थेत बांधल्यासारखे ठेवणे) या प्रकारात येते. या मुद्रेच्या साधनेत प्राणायामाबरोबरच शारीरिक बंधांचा म्हणजेच शरीराची मुख्य छिद्रे बंद करण्याच्या क्रियेचा समावेश आहे. कष्टसाध्य अशा हठयोग प्रकारात विशिष्ट प्रगती साधल्यानंतर, विशेषत: शरीर, नाड्या व मन ह्यांच्या पुरेशा शुद्धीकरणानंतर ह्या प्रकारच्या बंध-मुद्रांचा योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास करणे उचित ठरते.
ह्या मुद्रेत खेचरी (खे=आकाशात व चरी = संचार करणारी) व शांभवी (शंकराची) मुद्रा, मूल व जालंधर बंध (कंठस्नायूचा बंध) आणि कुंभक (श्वास रोखणे) या विशिष्ट शारीरिक अवस्थांचा समावेश असतो. त्यामुळे ह्या प्रकारांचा पुरेसा सराव झाल्यावरच महामुद्रा करावी.
महामुद्रेची साधना करताना पाठीचा कणा ताठ ठेवून तसेच हनुवटी छातीवर ठेवून उजवा पाय लांब वसरळ रेषेत ठेवावा. डाव्या पायाची टाच गुदद्वार वा शिवणीखाली दाबून ठेवावी. थोडे पुढे झुकून दोन्ही हातांनी उजव्या पावलाचा तळवा घट्ट पकडावा. डोके उजव्या पायाच्या गुडघ्यास लावावे. घेतलेला श्वास जालंधर बंध करून, म्हणजेच कंठस्नायूंचा संकोच करून, कुंभकाद्वारे (श्वासोच्छ्वासादरम्यान श्वास मर्यादित ठेवून, रोखून) वरच्या दिशेने नियंत्रित करावा. दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी एकाग्र करावी. दरम्यान मूलाधार, विशुद्धी व आज्ञा या चक्रांवर (शरीरातील नाड्यांच्या परस्पर छेदांची ठिकाणे) क्रमाने लक्ष केंद्रित करावे. कुंभक करण्याच्या क्षमतेनुसार तेवढाच वेळ मुद्रास्थिती ठेवावी. त्यानंतर कंठाचे स्नायू मोकळे करून हळूहळू श्वास सोडावा व पूर्वस्थितीत यावे. नंतर ह्याच क्रमाने परंतु डावा पाय सरळ व उजवा पाय शिवणीखाली ठेवून महामुद्रा करावी. पहिल्यांदा डाव्या नाकपुडीने आणि नंतर उजव्या नाकपुडीने अभ्यास करावा. जेव्हा दोन्ही प्रकारांची संख्या समान होईल तेव्हा मुद्रा विसर्जित करावी (योगचूडामणि उपनिषद् ६५-६७).
ही मुद्रा सकाळी उपाशीपोटी करणे उचित ठरते. या मुद्रेसाठी उत्थानपादासन मूलभूत असून ती मुद्रा सिद्धासनात बसून करता येते. सुरुवातीला साधकाने दोन्ही पायांनी तीन तीन वेळा होईल एवढाच वेळ ही मुद्रा करावी. नंतर ही संख्या हळुहळू वाढवावी. मुद्रा करताना श्वसनावर पर्यायाने फुप्फुसांवर ताण येता कामा नये.
उच्च रक्तदाब, हृदयविकार, ग्लुकोमा, इत्यादी विकार असणाऱ्यांनी तसेच डोळ्याची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी ही मुद्रा करू नये. ह्या मुद्रेमुळे शरीरात उष्णता निर्माण होत असल्याने उन्हाळ्यात ही मुद्रा शक्यतो करू नये.
महामुद्रेमध्ये समाविष्ट असलेल्या बंधांमुळे ती लाभदायक ठरते. बंधांमध्ये विशिष्ट ठिकाणच्या स्नायूंचे आकुंचन व प्रसरण केले जाते, त्यामुळे विशिष्ट इंद्रिये व नाडया नियंत्रित केल्या जातात. ह्या बंधांचा सूक्ष्म परिणाम शरीरांतर्गत चक्रांवर होतो. तसेच प्राणशक्तीचे नियंत्रण करणाऱ्या ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी व शिवग्रंथी यांवर त्यांचा परिणाम होऊन ती प्राणशक्ती योग्य ठिकाणी वळविली जाते.
महामुद्रेच्या साधनेमुळे क्षय, कुष्ठ, गुदावर्त (यकृताची सूज), गुल्म (ट्यूमर), अजीर्ण व त्यामुळे उद्भवणारे आजार दूर होतात (योगचूडामणि उपनिषद् ६९, हठप्रदीपिका ३.१६). हठप्रदीपिकेतील उल्लेखानुसार महामुद्रेच्या साधकाला विष देखील पचते. नीरस भोजनसुद्धा चविष्ट लागते. (योगचूडामणि उपनिषद् ६८, हठप्रदीपिका ३.१५).
महामुद्रेमुळे शरीरात सर्वत्र, विशेषत: चक्रांमध्ये ऊर्जा निर्माण होते. दीर्घकालीन सरावामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होते. ध्यानाची पूर्वतयारी म्हणूनही महामुद्रेचा उपयोग होतो. महामुद्रेमुळे नाडीशुद्धी होते, ईडा (चंद्रनाडी) व पिंगला (सूर्यनाडी) संचालित होतात; तसेच जीवनदायी रसांचे शरीरात व्यवस्थित शोषण होते, असे योगचूडामणि उपनिषदात (६५) म्हटले आहे. जालंधर बंध आणि महामुद्रा यांच्या एकत्रित परिणामामुळे मृत्यूचाही क्षय होतो, असे घेरंडसंहितेत (३.३१) म्हटले आहे. या मुद्रेमुळे मन:शांती मिळण्यास व नैराश्य दूर होण्यास मदत होते.
संदर्भ :
- दलाई, बी. के. योगचूडामणि उपनिषद्, योगोपनिषद्, संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, पुणे, २०१५.
- स्वामी दिगंबरजी; पितांबर, झा. डा. हठप्रदीपिका, श्रीमन्माधव योगमंदिर, कैवल्यधाम, लोणावळा, पुणे, १९८०.
समीक्षक : मकरंद गोरे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.