योगशास्त्र, नृत्य आणि धार्मिक क्रियांमध्ये हस्तमुद्रांचे अनन्यसाधारण स्थान आढळते. चित्तशोधन, चित्ताची एकाग्रता, मनोविजय तसेच वायूवरील नियंत्रणासाठी योगशास्त्रात मुद्रांचे महत्त्व सांगितले आहे. शरीरशास्त्राच्या दृष्टीने पाहता हातांचे महत्त्व असाधारण आहे. मानवी हात, हातांची बोटे ही अत्यंत क्लिष्ट क्रियाही सहजपणे करू शकणारे, परिपूर्ण असे नैसर्गिक साधन होय. बोटांच्या हालचाली एकमेकांच्या सुसंबद्ध सहकार्याने चालत असतात. बोटे असंख्य संवेदनांचे ग्रहण करून त्या संवेदना मज्जासंस्थेच्या मोठ्या भागाकडे पोहचविणाऱ्या अनेक मज्जातंतूंनी युक्त असतात. सूचिचिकित्सेचे (ॲक्युपंक्चरचे) चौदापैकी सहा बिंदू बोटांच्या अग्रभागी आहेत. हस्तमुद्रांच्या सहाय्याने ही केंद्रे उद्दीपित केली जाऊन त्या त्या इंद्रियाचे वा अवयवाचे कार्य नियंत्रित करून आरोग्य प्राप्त करता येते.

योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून हस्तमुद्रा ह्या पंचतत्त्वांचे नियमन करणाऱ्या मुद्रा म्हणून ओळखल्या जातात. ब्रह्मांड हे पंचतत्त्वांनी (जल, अग्नी, वायू, आकाश व पृथ्वी) युक्त असून आपला देहदेखील त्याच पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. आपल्या हाताची पाचही बोटे त्या पाचतत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात. अंगठा अग्नि तत्त्वाचे, तर्जनी वायु तत्त्वाचे, मध्यमा आकाश तत्त्वाचे, अनामिका पृथ्वी तत्त्वाचे, तर कनिष्ठिका जल तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. पंचतत्त्वांमधील समस्थिती देह निरोगी ठेवण्यासाठी, तर विषमस्थिती अनारोग्यासाठी कारणीभूत ठरते. हस्तमुद्रांच्या साधनेमुळे त्या त्या तत्त्वांशी निगडित असलेले शरीरांतर्गत अवयव व ग्रंथी प्रभावित होतात व त्यांचे कार्य नियंत्रित होते. बोटांच्या अग्रभागातून सूक्ष्म रूपात प्राण-ऊर्जा सतत बाहेर पडत असते. हस्तमुद्रांच्या सहाय्याने ही क्रिया अवरुद्ध करून ती सर्व शक्ती शरीराकडेच वळविली जाते. ह्या क्रियेत मेंदूकडून हातांकडे संक्रमित होणारी शक्ती बोटांची टोके जुळविलेली असल्याने पुन्हा मेंदूकडेच वळविली जाते. हस्तमुद्रेच्या क्रियेकडे केंद्रित झालेली संपूर्ण जाणीव वा चित्ताची एकाग्रता ध्यान साधनेसाठी उपयुक्त ठरते. तसेच साधनेच्या विकसित टप्प्यावर साधकाला सूक्ष्म प्राणशक्तीच्या प्रवाहावर जाणीवपूर्वक नियंत्रण प्राप्त करून देते. अशा रितीने हस्तमुद्रांमुळे शरीरातील सुप्त प्राणशक्ती जागृत केली जाऊ शकते; ती शरीराच्या विशिष्ट भागाकडे वळवून त्या त्या ठिकाणचे आजार दूर केले जाऊ शकतात. हस्तमुद्रेद्वारा प्राणशक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे वळवून तिचेही आजार दूर करता येतात. हस्तमुद्रा शरीरावर त्वरित परिणाम साधतात. ज्या हाताच्या सहाय्याने ह्या मुद्रा केल्या जातात त्याच्या विरुद्ध बाजूच्या शरीराच्या भागावर त्यांचा परिणाम होतो. फक्त हातांशी संबंधित असल्याने कधीही, कोठेही वा कोणत्याही स्थितीत, चालता-फिरतानाही त्या करता येतात. अर्थात विशिष्ट आसनस्थितीमध्ये विशेषत: वज्रासन वा पद्मासन  असल्यास जास्त व्यापक परिणाम साधला जातो. मुद्रा, आसने व बंध ह्यांची एकत्रित साधना अतिशय प्रभावी ठरते.

योगशास्त्रातील हस्तमुद्रा साधकाच्या अंतर्मनातील आध्यात्मिक भावावस्थेचे आविष्करण करतात.

पहा : अपानमुद्रा, अश्विनीमुद्रा, काकीमुद्रा, चिन्मुद्रा, धारणाशक्ती-मुद्रा, नृत्यमु्द्रा, प्राणमुद्रा, पृथ्वीमुद्रा, मुद्रा, योनिमुद्रा, लिंगमुद्रा, वरुणमुद्रा, वायु मुद्रा, शून्यमुद्रा, सूर्यमुद्रा, ज्ञानमुद्रा (ध्यानमुद्रा).

        समीक्षक : कला आचार्य