अय्यर, अनंतकृष्ण (Iyer, Ananthakrishnan) : (? १८६१ – २६ फेब्रुवारी १९३७). एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. पूर्ण नाव लक्ष्मीनारायणपुरम कृष्ण अनंतकृष्ण अय्यर. त्यांचा जन्म केरळ राज्यातील पालघाट जिल्ह्यातील लक्ष्मीनारायणपुरम गावी ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांनी १८७८ मध्ये पालघाट विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले; तर १८८३ मध्ये मद्रास ख्रिश्चन कॉलेज येथून बी. ए ही पदवी प्राप्त केली. काही काळ ते केरळमध्येच विज्ञानाचे प्राध्यापक होते. पुढे त्रावणकोर-कोचीन मानवजातिवर्णनविषयक सरकारी संस्थेचे प्रमुख म्हणून त्यांना नेमण्यात आले. केरळमधील जातिजमातींची त्यांनी सखोल व पद्धतशीर पाहणी करून माहिती गोळा केली व ती द कोचीन ट्राइब्ज अँड कास्ट्स या ग्रंथाच्या दोन खंडांत प्रसिद्ध केली (१९०८–१९१२). तसेच त्यांनी मलबार किनाऱ्याजवळील जमातींचेही संशोधन केले.

अय्यर यांनी १९१४ मध्ये भारताच्या पहिल्या वैज्ञानिक काँग्रेसच्या मानवशास्त्र विभागाचे अध्यक्षपद भूषविले. तसेच त्यांनी भारतात मानववंशीय अध्यापनशास्त्राचे उपनिरिक्षक म्हणूनही काम केले. त्यांनी १९१६ मध्ये मानवशास्त्र विषयावर मद्रास विद्यापीठात व्याख्याने दिली. त्यानंतर कलकत्ता विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास विभागात त्यांनी अध्यापन केले. १९२१ साली भारतात प्रथमच कलकत्ता विद्यापीठात मानवशास्त्र विभाग उघडण्यात आला. त्या विभागाचे पहिले प्राध्यापक व विभाग प्रमुख होण्याचा मान अय्यर यांना मिळाला. कलकत्ता विद्यापीठात असताना त्यांनी द मायसोर ट्राइब्ज अँड कास्ट्स  हा ग्रंथ चार खंडांत प्रकाशित केला (१९२८–१९३६). त्याशिवाय त्यांनी १९२५ मध्ये लिहिलेले अँथ्रॉपॉलॉजी ऑफ द सिरियन ख्रिश्र्चन  व १९३० मध्ये लिहिलेले लेक्चर्स ऑन इथ्‍नॉग्राफी  हे ग्रंथही उल्लेखनीय आहेत. ब्रिटिश सरकारने ‘दिवाणबहाद्दुर‘ हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. १९३४ साली त्यांना यूरोपात व्याख्याने देण्यासाठी बोलाविण्यात आले होते. भारतातील मानवशास्त्रीय अभ्यासाचे अग्रदूत म्हणून अय्यर यांचे नाव नेहमीच गौरविण्यात येते. कर्नाटक व केरळमधील जातिजमातींवरील त्यांचे ग्रंथ आजही प्रमाणभूत मानले जातात.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा