जगभरातील मानवी समुदायातील लोकांचे जीवन सुधारण्याच्या दृष्टीने होणारी प्रक्रिया म्हणजे मानवीय विकास होय. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जी वसाहतवादी राष्ट्रे होती आणि जी आता आर्थिक सत्ता आहेत, त्यांची विकास प्रक्रिया कशी होत गेली याचा अभ्यास करण्याकडे सामाजिक मानवशास्त्रज्ञांचा कल हळूहळू वाढत गेला. या विकसित म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या राष्ट्रांनी विकसनशील आणि अविकसित किंवा गरीब राष्ट्रांना सरकारी, बिगरसरकारी (एन.जी.ओ.) आणि खाजगी समूहांद्वारे तंत्रज्ञान, अर्थसाह्य व कुशलता प्रदान करण्याचा प्रयत्न केला; याला ‘विकास’ असे संबोधले गेले. काही मानवशास्त्रज्ञांनी दुसऱ्या महायुद्धानंतर विकासाच्या अनुषंगाने होणारे परिणाम जाणून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला; परंतु १९८० नंतरच मानवशास्त्राची एक उपशाखा म्हणून ‘विकासात्मक मानवशास्त्र’ ही संकल्पना उदयास आली.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला मानवशास्त्रातील सिद्धांत व पद्धती यांचा वापर राजकीय घडामोडींचा परिणाम पाहण्यासाठी कसा करता येईल, यासाठी अमेरिका, ग्रेट ब्रिटन आणि फ्रांस येथील त्यांच्या त्यांच्या विषयांतील सिद्धांत व पद्धती वापरण्यात कुशल असणाऱ्या मानवशास्त्रज्ञांची नेमणूक केली. त्यांना समताधिष्टित, पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत, बहुआयामी आणि बहुविध समाजासाठी लागू असेल अशा पद्धतींचा आर्थिक विकास करता येईल का, हे पाहण्यास मानवशास्त्रज्ञांना सांगितले होते. एकूणच, मानवशास्त्र हे विकासातील प्रक्रिया समृद्ध होण्यासाठी मानवशास्त्रामधील सिद्धांताचा उपयोग करते.

मानवशास्त्राच्या विकास प्रक्रियेमधील मानवशास्त्रज्ञांच्या समावेशावर काही मानवशास्त्रज्ञांनी आक्षेप घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मानवशास्त्रज्ञ हे सामाजिक बदलांचे वर्णन करू शकतील; परंतु ते त्या बदलांना कारणीभूत होतील अशा पद्धतीने स्वतःला सामावून घेऊ नये. विकासात्मक मानवशास्त्रज्ञांनी विकासाचे जे ‘लाभार्थी’ आहेत, ते गरीब देशांतील लोक आहेत असे नमूद केले आहे. जर विकासाची प्रक्रिया यशस्वी करायची असेल, तर मागासलेल्या देशांचा विकासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये समावेश करणे आवश्यक आहे. म्हणजेच जे संसाधन व्यवस्थापक आहेत, त्यांना विकासासाठी कोणते प्रकल्प आहेत हे ओळखण्यामध्ये, तसेच ते बांधणी करताना, राबविताना आणि पडताळणी करताना त्यांचा समावेश करून घ्यावा, असा मानवशास्त्रज्ञांचा कल असतो. यामध्ये स्थानिक लोकांचा वर्ग, वय, लिंग, सामाजिक वर्ग व शिक्षण याला धरून आंतर-जटिलता आणि सामाजिक-आर्थिक फरकदेखील आहेत.

विकासासाठी प्रकल्प बनविताना जर स्थानिक मत विचारात घेतले नाही आणि त्यांचा प्रक्रियेत समावेश करून घेतला नाही, तर ते प्रकल्प अयशस्वी होण्याचे प्रमाण जास्त असते, असे मानवशास्त्रज्ञांनी बरेचदा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी काही विकास प्रकल्पांमध्ये मानवशास्त्रज्ञांनी मोलाची भर घातली आहे. त्यांमध्ये नदीखोऱ्यातील लोकांचे विस्थापन, मोठमोठे जलविद्युत धरणे-प्रकल्प, सामुदायिक पर्यावरण व्यवस्थापन, सामाजिक वनीकरण, विकासातील लिंगभेद, आरोग्य यंत्रणेमध्ये पारंपरिक औषधी देणाऱ्यांचा समावेश आणि पारंपरिक ज्ञान व जैव विविधता यांचा समावेश करून विकास करणे यांचा समावेश होतो.

विकास प्रक्रिया होत असताना मानवशास्त्राचा वाटा उपयुक्त ठरत असतो. उदा., एखाद्या स्वयंसेवी संस्थेला विकासाला धरून एखादा नवीन प्रकल्प राबवायचा असेल, तर मानवशास्त्रज्ञ त्या विशिष्ट समुदायाचे स्थानिक ज्ञान त्या प्रकल्पासाठी कसे उपयोगी होऊ शकेल हे पाहतील. मानवशास्त्रज्ञांना स्थानिक सांस्कृतिक प्रथांबद्दल उत्तम जाण असते. त्यामुळे विकास क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना, तसेच ज्यांना स्थानिक लोकांबद्दल, त्यांच्या संस्कृती, चालीरिती यांबद्दल फारशी माहिती नसतात अशा व्यक्तींपर्यंत या गोष्टी ते पोहोचवू शकतील.

विकासात्मक मानवशास्त्रामध्ये अभ्यासातील माहितीचा उपयोग व्यवहारामध्ये कसा आणता येईल, पाण्याचे स्थानिक पातळीवर व्यवस्थापन, दारिद्र्य निर्मूलन, शिक्षणाचा प्रसार जास्तीत जास्त कसा होईल ते पाहणे इत्यादी विकासात्मक कार्यांचा विचार होतो. एखाद्या विशिष्ट जागेमध्ये एखाद्या समाजावर आणि संस्कृतीवर कोणत्याही विकास प्रकल्पाचा कसा परिणाम होऊ शकतो, हे समजून घेण्यासाठी मानवशास्त्रज्ञ मदत करू शकतात.

मानवशास्त्र हे मानवी संस्कृती आणि समाजाचा अभ्यास करते. तसेच मानवी विकासातील प्रक्रिया समृद्ध होण्यासाठी मानवशास्त्रामधील सिद्धांताचा उपयोग करते.

समीक्षक : शौनक कुलकर्णी