चाकवत वनस्पती १-२ मी. उंच वाढते. सुरुवातीला ती सरळ उभ्या दिशेत वाढते आणि फुलांनी बहरल्यावर ती कलते. खोड पिंगट व रेखित असते. पाने साधी व एकाआड एक असून त्यांच्या आकारात विविधता आढळते. तळाकडील पाने मोठी, दंतुर आणि चौकटच्या आकाराची असतात. शेंड्याकडील पाने लहान, निमुळती व भाल्याच्या आकाराची असतात. फुले लहान व हिरवट असून कणिशावर येतात. बिया चपट्या व चकचकीत असतात.
चाकवत ही वनस्पती पाचक, रेचक व कृमिनाशक आहे. तिचा पालेभाजी म्हणूनही उपयोग करतात. मात्र, पानांमध्ये ऑक्झॅलिक आम्ल अधिक प्रमाणात असल्याने ही भाजी कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. पानांमध्ये प्रथिने, ब-समूह जीवनसत्त्वे व क जीवनसत्त्व, लोह, तंतुमय पदार्थ व अन्य खनिजे असतात. बिया पौष्टिक असून त्यांत अ जीवनसत्त्व, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम व प्रथिने अधिक प्रमाणात असतात. त्यांचा धान्य म्हणून वापर करतात. पाने व बिया कोंबड्यांना चारा म्हणून देतात. ही वनस्पती जशी जुनी होत जाते तसे तिचे खोड कठीण होत जाते. चीनमध्ये याचा चालण्याची काठी म्हणून उपयोग करतात.