एक रंगीबेरंगी आकर्षक पक्षी. हूपू हा पक्षी ब्युसेरोटिफॉर्मिस गणाच्या उपूपिडी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव उपूपा इपॉप्स आहे. उपूपिडी कुलात फक्त उपूपा प्रजाती असून त्यात हूपू पक्षाच्या . इपॉप्स, . आफ्रिकाना, . मार्जिनाटा अशा तीन जाती आहेत. त्यांपैकी . इपॉप्स ही जाती आफ्रिका, यूरोप व आशिया खंडांत आढळते, . आफ्रिकाना ही जाती आफ्रिका व आशिया खंडांतील दक्षिण आफ्रिका, लेसोथो, स्वाझीलँड, नामिबिया, बोट्स्वाना, झिंबाब्वे, टांझानिया, सौदी अरेबिया, काँगो इ. देशांत आढळते, तर . मार्जिनाटा ही जाती केवळ मादागास्करमध्ये आढळते.

हूपू (उपूपा इपॉप्स)

हूपू हा मध्यम आकाराचा, मैनेएवढा पक्षी असून शरीराची लांबी २५–३२ सेंमी. असते. पंखविस्तार ४४–४८ सेंमी. असून वजन ८०० ग्रॅ.– १.३ किग्रॅ. असते. शरीराचा रंग तपकिरी असून पाठ, पंख व शेपटी यांवर काळे व पांढरे पट्टे असतात. डोक्यावर उघडता व मिटता येणारा हातपंख्यासारखा पिसांचा तुरा असतो. डोळे लाल-तपकिरी आणि पाय करडे-काळपट असतात. चोच, लांब, निमुळती होत गेलेली व बाकदार असते.

हूपू मुख्यत: कीटक खातात; परंतु ते साप, सरडे, लहान सरपटणारे प्राणी, बेडूक तसेच काही वेळा बिया व फळेही खातात. अन्न शोधताना ते एकटे वावरतात आणि उघड्या किंवा थोड्याफार गवताने झाकलेल्या मैदानात अन्नाचा शोध घेतात. यासाठी त्याला लांब चोचीचा उपयोग होतो. तोंडाचे स्नायू मजबूत असल्याने तो जमिनीखाली चोच उघडून भक्ष्य पकडू शकतो. भक्ष्य शोधताना तो अधूनमधून थांबून चोच जमिनीत खुपसतो आणि कीटकांच्या अळ्या, वाळवी, कोळी, नाकतोडे खातो. हवेत तो क्वचितच भक्ष्य पकडताना दिसतो; मात्र मधमाशांचे मिलन उड्डाण चालू असताना तो त्यांना पकडून खातो. हूपू पक्षी झाडाच्या बुंध्यावर चोचीने जोरात ठोकतात आणि सालीखाली दडलेले कीटक, अळ्या बाहेर पडल्यावर खातात. मोठे भक्ष्य गिळण्याआधी दगडावर आपटून त्याचे लहान तुकडे करतात. तसेच भक्ष्याचे न पचलेले भाग (जसे पाय, पिसे) लहान गोळ्यांच्या रूपात बाहेर टाकतात.

हूपूच्या अधिवासाच्या दोन गरजा असतात; चारा मिळविण्यासाठी मोकळी सपाट जागा किंवा तुरळक झाडी असलेले प्रदेश आणि घरट्यासाठी झाडे, इमारतीच्या भिंती, डोंगरकडा यांच्यातील ढोली किंवा कपारी. त्याच्या या गरजा कोणत्याही ठिकाणी पूर्ण होत असल्याने बहुधा तो सर्वत्र आढळतो. हिमालयात तो समुद्रसपाटीपासून सु. ६,४०० मी. उंचीवर आढळल्याची नोंद आहे. त्याचा वावर ठरावीक प्रदेशापुरताच असतो. नर एकाच मादीबरोबर राहतो; काही वेळा नर-मादी एका हंगामापुरते सोबत राहतात. नर जेथे राहतो, त्या प्रदेशावर अधिकार दाखवतो आणि आपल्या प्रदेशात दुसऱ्या नराला फिरकू देत नाही. बाहेरून आलेल्या नराला हुसकावण्यासाठी अनेकदा त्यांच्यात लढाई होते. नर छाती फुगवून एकमेकांसमोर उभे राहतात, तुरे उभारतात आणि प्रतिस्पर्ध्यांवर चोचीने हल्ला करतात. या लढाईत ते एकमेकांशी पिसे उपटतात, तसेच डोळ्यांना इजा करतात. मादीला आकर्षित करताना नर एखाद्या झाडाच्या शेंड्यावर बसतो आणि डोके खाली घालून, मान फिरवत, तुरा खाली करत, मृदू पण स्पष्ट ‘‘हूप, हूप, हूप, की, की’’ असा आवाज काढतो. त्याचा आवाज रिकाम्या बाटलीत फुंकर मारल्यानंतर येणाऱ्या आवाजासारखा असतो. तो आपले पंख अर्धवट उघडे टाकून मादीभोवती पिंगा घालतो आणि पुन:पुन्हा तिच्या उघडलेल्या चोचीत चोच घालतो.

हूपूचे घरटे झाडांच्या ढोलीत, जुन्या इमारतींच्या भिंतीच्या खोबण्यात, शेवाळ किंवा पानांनी बनलेले असते. अशा जागा त्यांना सापडल्या नाहीत तर खडकांच्या बेचक्यांत, झाडांच्या मुळाखाली किंवा जमिनीखाली मादी अंडी घालते. मादी एकावेळी ७-८ अंडी घालते. अंडी दुधी-निळसर रंगाची व गोलसर असतात; परंतु लगेच ती मळकट दिसू लागतात. मादी अंडी उबवते आणि या काळात नर तिला अन्न भरवतो. अनेक पक्ष्यांप्रमाणे हूपूच्या घरट्याला दुर्गंधी येते. अंड्यांचे रक्षण होण्यासाठी हूपू त्यांच्या शेपटीजवळ असलेल्या ग्रंथीतून द्रव बाहेर टाकतात. परिणामी भक्षक प्राणी व शिकारी त्यांच्या घरट्याकडे फिरकत नाहीत. ३-४ आठवड्यांत पिले उडायला लागतात. साधारणपणे एक वर्षात ती प्रजननक्षम होतात. हूपू हा वन्य अधिवासात सु. १० वर्षे जगतो.

ग्रीस, ईजिप्त व पश्चिम आशियाई देश यांच्या दंतकथांमध्ये हूपूचा उल्लेख आहे. इझ्राएल देशाने हूपू या पक्ष्याला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा दिलेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा