गुंज ही बहुवर्षीय वेल लेग्युमिनोजी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अॅब्रस प्रिकॅटोरियस आहे. बारीक फांद्यांची ही पानझडी वेल दुसर्या झाडावर पाच-सहा मीटर उंच वाढते. साधारणत: उष्ण प्रदेशीय, समुद्रकाठच्या विरळ व दमट वनांत ती आढळते. महाराष्ट्रात कोकण तर कर्नाटकातील उत्तर कारवार भागांत ही वनस्पती आढळते. ही बागेत व शेतातही लावतात.
गुंजेची मुळे, पाने व बिया औषधी आहेत. मुळे व पाने मधुर परंतु बिया तिखट असतात. ही सर्व पौष्टिक, कामोत्तेजक, पित्तनाशक, रुचिवर्धक, कांतिवर्धक, नेत्ररोगहारक व चर्मरोगहारक असून जखमा व कंड यांवर गुणकारी आहे. ज्वर, डोकेदुखी, दमा, दात किडणे व तहान यांवर मुळे व पाने उपयुक्त असतात. मुळांचा रस कफनाशक आहे. बसलेला घसा (आवाज) पाने चावून खाल्ल्यास तो सुटतो. पानांच्या विड्यात गुंजेचा पाला घालतात. बिया थोड्या प्रमाणात सारक आणि वांतिकारक पण अधिक प्रमाणात विषारी ठरतात. त्यांचे चूर्ण तपकिरीसारखे नाकात ओढल्यास तीव्र डोकेदुखी थांबते. त्यांमध्ये अॅब्रिन हे ग्लुकोसाइड प्रमुख घटक असते. पूर्वीच्या काळी सोने वजन करण्यासाठी बियांचा वापर केला जात असे.