वेलदोडा (इलेटॅरिया कार्‌डॅमोमम) : (१) वनस्पती, (२) फुले, (३) फळे, (४) बिया.

(कार्‌डॅमम). मसाल्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेली वनस्पती. वेलदोडा ही वनस्पती झिंजिबरेसी कुलातील आहे. आले, हळद या वनस्पतीही झिंजिबरेसी कुलातील आहेत. झिंजिबरेसी कुलातील इलेटॅरिया आणि ॲमोमम प्रजातीतील वनस्पतींना आणि त्यांपासून मिळणाऱ्या फळांना वेलदोडा म्हणतात. या वनस्पतींच्या शेंगा (वेलदोडे) लहान, टकळीसारख्या आणि साधारणपणे त्रिकोणी आकाराच्या असतात. इलेटॅरिया प्रजातीचे वेलदोडे रंगाने ‍फिकट हिरवी व लहान, तर ॲमोमम प्रजातीचे वेलदोडे रंगाने गडद तपकिरी व मोठे असतात. मसाल्यांसाठी इलेटॅरिया कार्‌डॅमोमम हे वेलदोडे मोठ्या प्रमाणावर वापरले जात असल्याने याच जातीची लागवड बहुतकरून करतात. . कार्‌डॅमोमम ही जाती मूळची भारताच्या दक्षिण भागातील असून भारत, श्रीलंका, ग्वातेमाला, मलेशिया, टांझानिया इ. देशांत तिची लागवड केली जाते. वेलदोड्याला ‘विलायची’, ‘वेलची’ असेही म्हणतात. वेलदोड्याच्या निर्यातीत ग्वातेमाला पहिल्या स्थानावर असून भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

वेलदोड्याचे मूलखोड म्हणजेच मूलक्षोड जमिनीत वाढते. त्यालाच २–४ मी. उंचीचे उभे धुमारे म्हणजेच प्ररोह फुटलेले असतात. त्यांच्या तळभागावर मऊ आवरणे असतात. पाने एकाआड एक, लहान देठाची, लांबट भाल्यासारखी असून पानांची मध्यशीर जाड असते. फुले द्विलिंगी आणि स्वत:च्या परागकणांनी फलित न होणारी, स्वयंवंध्य असतात आणि धुमाऱ्यांच्या तळाशी फुटून येणाऱ्या लांब परिमंजरी फुलोऱ्यावर येतात. फुले ३.५ सेंमी. लांब, पांढरी, जांभळट किंवा फिकट हिरवी असून त्यांच्या मोठ्या पाकळ्यांवर निळसर रेषा असतात. फळ बोंड प्रकाराचे असून ते तीन कप्प्यांचे, त्रिकोणी, लांबट आणि अंडाकृती असते. त्यांवर बारीक उभ्या रेषा असतात. या फळांना वेलदोडा म्हणतात. प्रत्येक फळात साधारणपणे १५–२० बिया असतात. बिया तपकिरी, काळ्या रंगाच्या काहींशा सुरकुतलेल्या असतात. बियांमध्ये २ ते ८% फिकट पिवळ्या रंगाचे किंवा रंगहीन सुगंधी बाष्पनशील तेल असते.

वेलदोड्याच्या १०० ग्रॅ. पासून ६८% कर्बोदके (त्यामध्ये २८% तंतू ) व ११% प्रथिने मिळतात. त्यांत , क आणि समूह जीवनसत्त्वे, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, तांबे, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त इ. खनिजे असतात; कोलेस्टेरॉल नसते. . सुबुलेटम, . ॲरोमॅटिकम, . झँथायडीस इ. वनस्पतींची फळे वेलदोड्यासारखी दिसतात. ती फळे . कार्‌डॅमोमम जातीपासून मिळणाऱ्या वेलदोड्यांपेक्षा हलक्या प्रतीची असतात. बाजारात ती वेलदोडे म्हणून विकली जातात आणि भेसळीकरिता वापरली जातात.

आयुर्वेदानुसार वेलदोड्याच्या बिया कडवट, तिखट, शीतल, सुवासिक, सारक, मूत्रल असून श्वसनसंस्थेचे विकार, त्वचाविकार आणि मूत्रविकार यांवर ती गुणकारी असतात. सर्दी तसेच वांती थांबविण्यासाठी वेलदोडे खातात. तेल औषधात व सुगंधी द्रव्यात वापरतात. लज्जतदार पक्वान्ने, मसाले आणि खाण्याचे विडे यांमध्ये वेलदोडे वापरतात. वेलदोडे, सुंठ, लवंगा व शहाजिरे यांचे चूर्ण अपचनावर गुणकारी असते.