सराटा किंवा काटे गोखरू ही जमिनीवर सरपटत वाढणारी वर्षायू आहे. या वनस्पतीचा समावेश झायगोफायलेसी कुलात होतो. तिचे शास्त्रीय नाव ट्रिब्यूलस टेरेस्ट्रिस आहे. प्रामुख्याने उष्ण प्रदेशात ती आढळते. भारतात समुद्रसपाटीपासून सु. ५,४०० मी. उंचीपर्यंत ही वनस्पती रस्त्याच्या कडेला आणि रुक्ष ठिकाणी तण म्हणून वाढते.
या वनस्पतीचे खोड व फांद्या केसाळ असतात. पाने संयुक्त, समोरासमोर व पिसांसारखी असून पर्णिकांच्या ३-६ जोड्या असतात. पर्णिका आयताकृती, केसाळ आणि भाल्यासारख्या असतात. अधूनमधून काही पाने साधी असतात. फुले एकेकटी, पिवळी व पानांच्या बगलेत किंवा पानांसमोर वर्षभर येतात. फळ गोलाकार व कठिण असून पाच कप्प्यांचे असते. फळावर पाच कडा असून त्यांवर काटे असतात. प्रत्येक कप्प्यात अनेक बिया असतात.
या वनस्पतीचे सर्व भाग औषधी आहेत. दशमुळा औषधात गोखरूच्या मुळाचा वापर करतात. मूळ आणि फळे चवीला गोड असून ती शीतल, मूत्रल, पाचक तसेच सारक आहेत. वात, पित्त, खोकला, दमा आणि शारीरिक दुर्बलता यांवर ती गुणकारी ठरतात. पाने दाह, कुष्ठरोग आणि त्वचारोगावर वापरतात. बिया तुरट असून रक्तस्राव थांबविण्यासाठी वापरतात. वनस्पतीची राख संधिवातावरील लेप तयार करण्यासाठी वापरतात.