हिरवा पोकळा (अॅमरँथस ब्लायटम )

अॅमरँटेसी कुलातील या वर्षायू क्षुपाचे शास्त्रीय नाव अॅमरँथस ब्लायटम आहे. ही वनस्पती मूळची भूमध्य समुद्र प्रदेशातील आहे. अनेक ठिकाणी ती तणासारखी वाढलेली दिसून येते. हिरवा पोकळा आणि तांबडा पोकळा असे तिचे दोन प्रकार आहेत.

पोकळा या क्षुपाची उंची २०-३० सेंमी. असते. खोड प्रथम मऊ परंतु नंतर काहीसे कठीण होते. पाने एकाआड एक, साधी व लांब चमच्यांसारखी असून त्यांवर तांबड्या रेषा असतात. फुले लांब मंजिरीत येतात. ती शुष्क, लहान व द्विलिंगी असून परिदले हिरवट-पांढरी व संयुक्त असतात. फुलांमध्ये ४-५ पुंकेसर असतात आणि ते तळाशी एकमेकांना चिकटलेले असतात. जायांगात ऊर्ध्वस्थ २-३ संयुक्त अंडपी असतात. त्यात एक बीजुक असते. फळ लहान व एकबीजी असते. बिया चकचकीत, बारीक व काळसर लाल असतात.

पोकळा शीतकर, दीपक व सारक असून त्रिदोषनाशक आहे. पोकळ्याच्या पानांमध्ये , आणि ब-समूह जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. शिवाय कॅल्शियम, आयर्न (लोह), पोटॅशियम व मॅग्नेशियम यांची खनिजे असतात. पाने आणि कोवळ्या फांद्या भाजीसाठी वापरतात. बियांमध्ये लायसीन हे अॅमिनो आम्ल असते, जे इतर वनस्पतींमध्ये सहसा आढळत नाही. तसेच वनस्पतीतील प्रथिनांचा उपयोग ग्लुटेनाची अॅलर्जी असणाऱ्यांना होतो. या वनस्पतीपासून गुलाबी, तांबडा व जांभळा रंग मिळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा