चिकू

चिकू हा सॅपोटेसी कुलातील वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव ॲक्रस सॅपोटा आहे. ॲक्रस ममोसाॲक्रस झपोटीला, मॅनिलकारा ॲक्रस, मॅनिलकारा झपोटा या नावांनीही हा वृक्ष ओळखला जातो. मेक्सिको मूलस्थान असलेला हा वृक्ष उष्ण प्रदेशांत लागवडीखाली आहे. आशिया खंडाच्या काही भागांत याची व्यापारी तत्त्वावर लागवड करतात. भारतात गुजरात राज्यातील सौराष्ट्र व दक्षिण गुजरात आणि महाराष्ट्रातील उत्तर कोकण या भागांच्या समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशांत तसेच आंध्र प्रदेश, तमिळनाडू, प. बंगाल या राज्यांच्या समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशांत चिकूची लागवड केली जाते.

चिकूचे झाड

चिकू हा दीर्घायू, सदाहरित वृक्ष आहे. याची वाढ सावकाश होत असून तो सरळ वाढतो. मोकळ्या जागेत, घरगुती बागेत हा वृक्ष ३-४ मी. पर्यंत उंच वाढतो तर वनांमध्ये तो सु.३० मी. वाढतो. पाने सदाहरित, चकचकीत, एकाआड एक आणि दुभागलेल्या फांद्यांच्या टोकाला गुच्छाने येतात. ती आकाराने लंबवर्तुळाकार, टोकांना टोकदार व ७-१२ सेंमी. लांब असतात. फुले पांढरी, चटकन नजरेत न भरणारी व लहान घंटेच्या आकाराची असून दलपुंज ६ दलांचे असते. मृदुफळे गोल, अंडाकृती, ५-१० सेंमी. व्यासाची, किंचित फिकट तपकिरी रंगाची असतात. बिया २-५, काळ्या चकचकीत व किंचित चपट्या असतात. फळातील मगजाचा (गराचा) रंग किंचित पिवळसर ते तपकिरी असतो. पिकलेले फळ गोड आणि चवदार असते. कच्चे फळ कडक असून त्यात सॅपोनीन हा टॅनिनासारखा एक पदार्थ असतो. चिकूच्या झाडाला फुले वर्षभर येत असली तरी फळे वर्षातून दोनदा येतात. फळे झाडावरून उतरवून ठेवल्याशिवाय पिकत नाहीत.

चिकूच्या कच्च्या फळांत अधिक मात्रेत चीक असतो. तसेच या झाडाच्या सालीतूनही चीक मिळतो. मेक्सिको व मध्य अमेरिकेत झाडाच्या खोडावर तिरक्या खाचा पाडून चीक मिळवितात. याला ‘चिकल गम’ असे व्यापारी नाव आहे. च्युइंग गम बनविण्यासाठी चिकल गमचा पूरक घटक म्हणून वापर करतात. चिकूची फळे रेचक आहेत. चिकूमध्ये अधिक मात्रेत प्रतिऑॅक्सिडीकारके असून त्यात क जीवनसत्त्व आणि पोटॅशियम भरपूर असते.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा