भेक (दत्ताफ्रिनस मेलॅनोस्टिक्टस)

बेडकासारखा दिसणारा एक प्राणी. उभयचर वर्गाच्या ॲन्यूरा गणातील ब्यूफोनिडी कुलात भेकाचा समावेश होतो. ऑस्ट्रेलिया वगळता जगात सर्वत्र भेक आढळतात. यूरोपमध्ये आढळणाऱ्या भेकाचे शास्रीय नाव ब्यूफो ब्यूफो आहे. भारतासह दक्षिण आशियाई देशांमध्ये आढळणारी दत्ताफ्रिनस मेलॅनोस्टिक्टस ही जाती पूर्वी ब्यूफो मेलॅनोस्टिक्टस या नावाने ओळखली जात असे. शरीराची कोरडी व चामड्यासारखी त्वचा आणि कर्णपूर्वी विषग्रंथी या भेक ओळखण्याच्या मुख्य खुणा आहेत.

भेकाच्या शरीराचे डोके आणि धड असे दोन भाग असतात. डोक्यावर प्रत्येकी दोन नासाछिद्रे, डोळे व कर्णपटल असतात. त्याच्या मुखगुहेत दात नसतात. जीभ पुढच्या टोकाला जाड असते. मात्र, बेडकासारखी विभागलेली नसते. धडाला अग्रपादाची एक आणि पश्चपादाची एक अशा दोन जोड्या असतात. अग्रपादापेक्षा पश्चपाद मोठे, जाड आणि लांब असतात. अग्रपादाला चार बोटे असून त्यांच्या टोकाशी गोल चकत्या असतात. पश्चपादाला पाच बोटे असून बोटांमध्ये अर्धविकसित पडदा असतो. पाठीवरची त्वचा फिकट तपकिरी अथवा मातकट रंगाची, तर पोटाकडची त्वचा फिकट असते. पाठीच्या त्वचेवर बारीक पुटकुळ्या असून ती खडबडीत असते. त्वचेवर श्लेष्मग्रंथी आणि विषग्रंथी असतात. डोक्याच्या खाली असलेली विषग्रंथींची जोडी मोठी असते. ती  कर्णपटलालगत असल्याने तिला कर्णपूर्व ग्रंथी म्हणतात. भक्षकापासून संरक्षण करतेवेळी या विषग्रंथीमधून पांढरट अथवा दुधी रंगाचा स्राव स्रवला जातो. त्यात ब्यूफोनीन नावाचे विषारी संयुग असल्यामुळे तो स्राव माणसाला दाहक असतो. त्यामुळे त्वचा चुरचुरते व त्वचेवर लाल पुरळ उठते. तसेच काही वेळा अधिहर्षता उद्भवते.

भेक उभयचर असला तरी तो जास्त काळ जमिनीवर वावरतो. जमिनीवर तो ओलसर जागी आढळतो. प्रजननाच्या वेळी तो पाण्यात जातो. भेक निशाचर असून दिवसा दगडाखाली अथवा बिळात राहतो. तो कीटकाहारी असून काही वेळा गांडूळ, गोगलगाय व छोटे सापही खातो. अनेक प्राणी भेक खातात. सापासारख्या प्राण्यावर भेकाच्या विषाचा काही परिणाम होत नाही. मात्र कुत्र्याने जर भेकाला खाल्ले, तर कुत्रा मरतो. बेडकाप्रमाणे भेकामध्ये ग्रीष्मनिष्क्रियता आणि शीतनिष्क्रियता या दोन्ही समाधी अवस्था असतात. परिस्थिती अनुकूल झाल्यावर तो या अवस्थांतून बाहेर येतो.

नर भेक मादीपेक्षा खूपच लहान असतात. पावसाळ्यात त्यांचे प्रजनन घडून येते. या काळात नर भेक मोठा व कर्कश आवाज करतात, त्यावेळी ते इतर नरांशी लढतात व कमजोर नरांना ठार करतात. मादी सामान्यपणे संथ वाहणाऱ्या पाण्यात एकावेळी अनेक अंडी घालते व त्यांवर नर शुक्रपेशी सोडतो. फलित अंडी पाण्याबरोबर दूर वाहत जातात. या अंड्यातून डिंभ बाहेर येतात व साधारण तीन महिन्यांनंतर नवीन भेक तयार होतात.

सुरिनाम भेक मादी (पिपा पिपा)

 

 

काही भेकांमध्ये अंड्यांची काळजी घेण्याची प्रवृत्ती दिसून येते. दक्षिण अमेरिकेतील सुरिनाम देशात आढळणाऱ्या सुरिनाम भेकाचे शास्त्रीय नाव पिपा पिपा असून ती जाती ॲन्यूरा गणाच्या पिपिडी कुलातील आहे. या जातीमध्ये बाह्यफलन होते. मादी तिच्या पाठीवर असलेल्या अनेक खोबणीत सु. ८० दिवस अंडी बाळगते. त्यानंतर त्यांचे पिलांत रूपांतर होते.

 

 

 

भेक (ॲलयटेस ऑबस्टेट्रिकनस)

 

फ्रान्स व इटली या देशांमध्ये आढळणारी भेकाची ॲलयटेस ऑबस्टेट्रिकनस ही जाती ॲलायटिडी कुलातील असून नर फलित अंडी आपल्या पश्चपादांवर गुंडाळून घेतो. सु. २० दिवसानंतर नवीन डिंभ तयार होतात, तेव्हा नर भेक पाण्याजवळ जाऊन डिंभ पाण्यात सोडतात. या भेकाला ‘सुर्इण भेक’ म्हणतात. आफ्रिकेत आढळणारी नेक्टोफ्रायनॉइडीस व्हिव्हिपॅरस जातीची भेकाची मादी जरायुज असून ती पिलांना जन्म देते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा