चुका ही वर्षायू वनस्पती पॉलिगोनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव रुमेक्स व्हेसिकॅरियस आहे. प्रजातीत रुमेक्स जवळजवळ २०० जाती आहेत. ही वनस्पती मूळची पश्चिम पंजाबमधील असून तिचा प्रसार पाकिस्तान आणि भारताशिवाय इराण, अफगाणिस्तान आणि आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात झालेला आहे. या वनस्पतीला ‘आंबट चुका’ असेही म्हणतात.
सरळ वाढणाऱ्या चुका वनस्पतीचे झुडूप १५ – ३० सेंमी. पर्यंत वाढते. फांदया तळापासून येतात. पाने साधी व २.५ – ७.५ सेंमी. लांब असतात. ती एकाआड एक, मांसल, पांढरट, अंडाकृती व विशालकोनी असतात. उपपर्णे पातळ व नलिकाकृती असतात. फूले एकाच झाडावर येतात. नर – फुले व मादी – फुले वेगवेगळी असून टोकाकडच्या मंजिऱ्यावर येतात. फळ कठीण कवचाचे, शुष्क, आपोआप न फुटणारे आणि पांढरे किंवा गुलाबी असते.
चुक्याची पाने आंबट, प्रशीतक, सौम्य रेचक व मूत्रल असतात. पानांचा रस दातदुखीवर लावतात. पानांच्या रसाने शिसारी कमी होऊन भूक वाढते. भाजलेल्या बिया आमांशावर घेण्याची पद्धत आहे. कोवळ्या पानांची भाजी करतात. आहारात वापर होत असल्याने या वनस्पतीची मोठया प्रमाणात लागवड करतात.