नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जल प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इ. देशांत ही समस्या तीव्रतेने जाणवते.
पाण्यातील प्रदूषकांचे स्रोत पुढीलप्रमाणे आहेत :
(१) मानवी मलमूत्र व औदयोगिक कार्बनी अपशिष्ट : मानवी वस्त्यांमधून उत्सर्जित झालेले मलमूत्र आणि औदयोगिक अपशिष्टातील कार्बनी पदार्थ मलवाहिन्यांतून नदी, समुद्र किंवा इतर जलाशयांत टाकले जातात. पाण्यात अतिप्रमाणात कार्बनी पदार्थ असल्यास सूक्ष्मजीवांची ऑक्सिजनाची मागणी वाढते. परंतु पाण्यातील ऑक्सिजनाची उपलब्धता घटते. त्यामुळे पारिस्थितिकीय संतुलन बिघडते व प्रदूषकांची समस्या निर्माण होते. विविध कारखान्यांमधून कार्बनी अपशिष्टे पाण्यात सोडल्यामुळे, या अपशिष्टांमार्फत ऑक्सिजन शोषून घेतला जातो. त्यामुळे जल प्रदूषणाची तीव्रता वाढते.
सांडपाणी व मैला वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये रोगांचे सूक्ष्मजीव असतात. अशा पाण्यावर संस्करण केल्यास काही सूक्ष्मजीवांचा नाश होतो, तर काही जिवंत राहतात. असे पाणी इतर जलाशयांत मिसळल्यास ते पाणी प्रदूषित होते. मैलापाण्याची सोय नीट न लावल्यास, त्यामुळे प्रदूषित झालेल्या पाण्याच्या वापरामुळे जठर आणि आतड्याचे रोग संभवतात.
(२) रासायनिक खते : शेतीपासून अधिक उत्पन्न व्हावे, यासाठी शेतजमिनीत रासायनिक खतांचा उपयोग केला जातो. ही खते जोराचा पाऊस पडल्यास ओहोळ, जलप्रवाह यांतून नद्यांना व परिणामी समुद्राला मिळतात. पाण्यातून वाहून आलेल्या या रासायनिक खतांमुळेही जल प्रदूषण होते. जमिनीवरील रासायनिक खते द्रवाच्या रूपात पाझरून भूजलसाठ्यात मिसळून भूजल प्रदूषित होते.
काही वेळा रासायनिक खतातील उर्वरित भागाचा उपयोग शैवालांच्या पोषणासाठी होतो. त्यामुळे शैवालांची वाढ जलद व दाट होते. मात्र, इतर वनस्पतींची वाढ खुंटते. तसेच माशांना धोका पोहोचतो. कालांतराने इष्ट प्रमाणात पोषकद्रव्ये न मिळाल्यास शैवालांचा लवकरच नाश होतो. ही मृत शैवाले कुजतात व अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव त्यांवर वाढतात. ते पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतात. या कुजलेल्या शैवालांमुळे पाण्याला दुर्गंधी सुटते.
(३) कार्बनी रसायने : आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशके, कवकनाशके, तणनाशके इ. रसायनांचा वापर केला जातो. त्यामध्ये विषारी द्रव्ये असतात. त्यांचा अल्पांश पिण्याच्या पाण्यात मिसळल्यास जल प्रदूषणाचा धोका निर्माण होतो.
(४) खनिज द्रव्ये व रासायनिक अपशिष्टये : कारखान्यातून बाहेर पडलेले अपशिष्ट पदार्थ जलाशयात सोडल्यास त्यातील पाणी प्रदूषित होते. कॅल्शियम व मॅग्नेशियम यांचे क्षार पाण्यात विरघळल्यास ते पाणी कठीण बनते. अशा पाण्याचा उदयोगासाठी व पिण्यासाठी उपयोग होत नाही. औदयोगिक अपशिष्टातील विषारी रसायने पाण्यात मिसळल्यास त्या जलाशयातील जैविक क्रियांमध्ये बदल घडून येतात. काही रसायनांच्या प्रभावाने ते पाणी आम्लीय होते. अशा पाण्यामुळे जलाशयातील सजीवांचा नाश होतो. भारतात चर्म, कागद, लगदा, वस्त्र, रसायने इ. उदयोग जल प्रदूषणास कारणीभूत आहेत.
(५) सांडपाण्यातील व पाणलोटातील गाळ : त्याज्य पाण्यातील गाळामुळे जलाशय गढूळ होतात. गाळाचे थर जमा होऊन कधीकधी जलाशय गाळाने भरून जातात. जलप्रवाहास गाळाचा अडथळा होऊन मैलापाणी व सांडपाणी कोंडले जाऊन चिकट गाळ खाली बसतो. त्यात विनॉक्सिजीवी सूक्ष्मजीव निर्माण होतात. त्यामुळे काही अंशी गाळाचे अपघटन होते. मात्र, ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात खर्ची पडतो व हवेतील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढते. विनॉक्सिजीवी सूक्ष्मजीवांमुळे हायड्रोजन सल्फाइड हा वायू पाण्यात मिसळतो. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते.
(६) किरणोत्सारी पदार्थ : किरणोत्सारी अपशिष्टांची विल्हेवाट लावण्यासाठी ती जलप्रवाहाच्या मदतीने विरल करून विखुरली जातात. ही अपशिष्टे जलप्रवाह किंवा समुद्रात मिसळल्यास तेथील पाणी प्रदूषित होते.
(७) उष्णता : पाण्याचे निक्षरीकारक संयंत्रे, औष्णिक विद्युत् निर्मिती, रासायनिक व पोलाद कारखाने, अणुकेंद्रीय संयंत्रे अशा अधिक प्रमाणात पाण्याची गरज असणाऱ्या आस्थापनांतून बाहेर पडणारे पाणी अतिउष्ण असते. हे पाणी इतर जलाशयांत सोडल्यास ‘औष्णिक प्रदूषण’ होते. अशा अनैसर्गिक उष्णतेमुळे तेथील पाण्यातील सजीवांच्या जीवनचक्रास बाधा येते व परिसंस्थेचे संतुलन बिघडते.
(८) खनिजे व ज्वालाग्राही तेल : कधीकधी समुद्रपृष्ठावर अपघात घडून येतात. त्यामुळे जलप्रदूषण होते. खनिजे व ज्वालाग्राही तेलाची वाहतूक बहुधा जहाजांतून होत असते. त्यांतील तेलाच्या टाक्या फुटून तेल समुद्रावर पसरते. अशा पाण्यामुळे पक्षी, मासे व इतर जलचर तसेच पाणवनस्पती मृत्युमुखी पडतात. सागरी संसाधनांचा ऱ्हास होतो. समुद्रकिनाऱ्यावरील खनिज तेल परिष्करण कारखान्यांतून, विहिरींतून व साठवण टाकीतून काही प्रमाणात गळत राहते व पाझरत राहते. हे तेलही समुद्राच्या पाण्यात मिसळल्यास जल प्रदूषण होते. अशा दुर्घटनांमुळे माशांना धोका निर्माण होतो. तेल परिष्करण कारखान्याच्या परिसरात जलीय कवचधारी जीवांची निपज होऊ शकत नाही. साठवणीच्या टाक्या स्वच्छ करताना त्यांतील खनिज तेल, पेट्रोल, केरोसीन, डांबर इ. पदार्थ पाण्यात मिसळतात व प्रचंड प्रमाणात मासे मरतात. समुद्रपृष्ठावर तेल पसरल्याने त्या पाण्यात सूर्याची किरणे कमी प्रमाणात मिसळतात. त्यामुळे सागरी जल व वातावरण यांच्यातील ऑक्सिजन विनिमय प्रक्रिया मंद होते.
जल प्रदूषणावरील उपाय खालीलप्रमाणे आहेत :
• जलशुद्धीकरण करणे.
• सांडपाणी व मैला पाण्यात सोडण्यापूर्वी विशेष प्रक्रिया करणे.
• पिण्याच्या पाण्याचे नियमित परीक्षण करणे.
• पाण्यातील रोगकारक जीवाणूंच्या संख्येत वाढ होणार नाही, यावर नियंत्रण ठेवणे.
• कवकनाशके, कीटकनाशके व कीडनाशके यांचा वापर मर्यादित करणे अथवा टाळणे.
• कृत्रिम खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे.
• पिण्याच्या पाण्यातील रसायनांच्या प्रमाणाची विशिष्ट मर्यादा असते. या सहज मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात रसायनांची वाढ होऊ नये, यासाठी योग्य ती दक्षता घेणे.
• किरणोत्सारी अपशिष्टे विशिष्ट जागी बंदिस्त करून ठेवण्याच्या पद्धतीचा अवलंब करणे.
• औष्णिक जल प्रदूषणामूळे जलाशय किंवा समुद्रातील पाण्याचे तापमान २० से.पेक्षा अधिक वाढणार नाही, याची खबरदारी घेणे.
• खनिज तेलामुळे होणाऱ्या जल प्रदूषण समस्येवर उपाययोजना आखणे.
महाराष्ट्रात जल प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. नदयांतील पाण्याच्या दर्जाचे संनियंत्रण ४८ ठिकाणी नियमितपणे केले जाते. या ४८ पैकी, ३५ ठिकाणी पाण्याचा दर्जा खालावल्याचे आढळले आहे. महाराष्ट्र राज्याने १९९५ मध्ये राष्ट्रीय नदी कृती आराखडा तयार केला असून नागरी व घरगुती सांडपाण्यामुळे होणारे जल प्रदूषण कमी करणे, हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. या योजने अंतर्गत सांडपाणी अडवणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे, नदीघाटाचा विकास करणे, कमी खर्चाचे स्वच्छतागृह बांधणे इ. योजना हाती घेण्यात आल्या आहेत. जल प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना सुचविणे व राज्यांच्या सहकार्याने राबविणे यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय जल दर्जा मूल्यांकन प्राधिकरण नियुक्त केले आहे.
I like the your own idia
Very nice
Water pollution बद्दल माहिती प्रशंसनीय आहे, हि बाब सामान्य जनतेला समजून सुद्धा काही करता येत नाही. त्याकरिता शासनाने सदसद्विवेकबुद्धी ने विचार करून कार्यवाही करणे आवश्यक आहे
Amazing
The information is so helpful in preparing my EVs project .
Thank you sir