जांभूळ वृक्षाची वाढ जोमाने होते आणि तो सु. ३० मी. उंच वाढू शकतो. खोड रुंद असून त्यावरची साल खवल्यांनी सुटते. पाने साधी, समोरासमोर, लंबगोल व वेगवेगळ्या आकारांची असतात. फुलोरा शाखायुक्त व टोकाला गुच्छाप्रमाणे असून त्यांवर मार्च ते मे महिन्यात लहान, हिरवट पांढरी सुगंधी फुले येतात. मृदुफळे लांबट गोल असून कच्ची असताना हिरवी तर पिकल्यावर गर्द जांभळ्या रंगाची होतात. फळे रसाळ असून त्यात एकच आठळीयुक्त बी असते. मोठी फळे असलेल्या वृक्षांना रायजांभूळ म्हणतात.
जांभळाची साल, फळे आणि बिया उपयुक्त आहेत. खोडाची साल तुरट, पाचक, आतड्यासाठी स्तंभक आणि कृमिनाशक आहे. साल किंवा फळे सुकवून, त्याची वस्त्रगाळ पूड करून किंवा फळांचे सरबत मधुमेही रुग्णांना रक्तातील साखर आटोक्यात ठेवण्यासाठी दिली जाते. पिकलेली फळे लोक आवडीने खातात. त्यांत अ आणि क ही जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात असतात. फळे तुरट, आंबट-गोड आणि शीतल असतात. फळांपासून वाइन आणि शिरका तयार करतात. हा शिरका पौष्टिक आणि वायुनाशी असतो.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻