प्राचीन काळापासून यूरोपात जिरे माहीत असल्याचा व इंग्लंडमध्ये सतराव्या शतकात ते मसाल्यात वापरल्याचा उल्लेख आढळतो. बायबलमध्ये देखील तिचा उल्लेख आहे. अमेरिकेत स्पेन व पोर्तुगीज वसाहतवादयांनी ही वनस्पती नेली. उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, टर्की, मोरोक्को, ईजिप्त, भारत, सिरिया, मेक्सिको, चिली व चीन या देशांत जिऱ्याचे पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते. भारतात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांत व्यापारी स्तरावर तिची लागवड होते.
जिऱ्याचे झुडूप ३०-५० सेंमी. उंच वाढते. खोड सडपातळ असून त्याला अनेक फांदया असतात. फांदयावर धाग्यांसारखी पाने असतात. पाने हिरवी, एकाआड एक व नाजूक असतात. फुले छत्रीसारख्या फुलोऱ्यात येतात. ती लहान असून पांढरी किंवा गुलाबी असतात. फळ टोकदार, लहान व शुष्क असते. ते अर्धस्फुटनशील असून तडकल्यावर त्याचे दोन भाग होतात. प्रत्येक भागावर नऊ उभ्या रेषा व खोबणी असतात. खोबण्यत तेलनलिका असून त्यात बाष्पनशील तसेच स्थिर तेल असते. फळांत एक बी असते. बी बडिशेपेसारखी दिसते. फळे काहीशी कडवट व स्वादयुक्त असतात.
अनेक वेगवेगळ्या संस्कृतीच्या खादयपदार्थांत जिरे किंवा त्याची पावडर मसाल्यात व स्वयंपाकात वापरतात. जिरे उत्तेजक असून वायुनाशी, शीतल (थंडावा देणारे), स्तंभक (आतडयांचे आकुंचन करणारे), रक्तशुद्धी करणारे व दाहशामक आहे. जिऱ्यात लोह, कर्बोदके आणि मेद पदार्थ असतात. क्युमिनालिडहाइड या संयुगामुळे जिऱ्याला सुगंध प्राप्त झाला आहे. काही देशांत मद्यात तसेच सुगंधी द्रव्यांत जिऱ्याचे तेल घालतात. पशुवैदयकात बियांचा वापर करतात.