पृथ्वीवर मोठ्या भौगोलिक क्षेत्रात निसर्गत: अनेक वनस्पतींचे भिन्न आणि मोठे समुदाय आढळतात. त्याचबरोबर अशा अधिवासात राहणारे प्राणीही आढळतात. सजीवांच्या अशा एकत्र समुदायाला जीवसंहती म्हणतात. जमिनीवर आढळणाऱ्या वेगवेगळ्या जीवसंहतीच्या सीमा या प्रामुख्याने हवामानानुसार निश्चित होतात. सामान्यपणे, एकाच स्वरूपाच्या जीवसंहती समान अक्षांशावर असतात. उदा., टंड्रा आणि तैगा. पृथ्वीवरील पुढील जीवसंहती महत्त्वाच्या मानल्या जातात : (१) टंड्रा, (२) शंकुधारी वने, (३) पानझडी वने, (४) तृणभूमी, (५) सॅव्हाना, (६) वाळवंट, (७) भूमध्यसागरीय खुरटी वनभूमी, (८) उष्ण प्रदेशातील वर्षावने, (९) उष्ण प्रदेशातील मान्सून वने. जीवसंहती निश्चित होण्यात हवामानाबरोबर पुढील घटकही लक्षात घेतात : (१) वनस्पतींचे प्रकार, (२) पानांचे प्रकार, (३) वनस्पतींची मांडणी. जलीय जीवसंहतींच्या सीमा निश्चित करणे मात्र अवघड असते.
प्रत्येक जीवसंहतीमध्ये विशिष्ट प्राणी आणि वनस्पती असतात आणि ते जगण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. तसेच हे प्राणी व वनस्पती तेथील विशिष्ट हवामानानुसार जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असतात. उदा., शंकुधारी वनांतील प्रदेशात दीर्घ हिवाळा आणि अल्पकाळ उन्हाळा असे हवामान असते. या जीवसंहतीत फर, स्प्रूस आणि पाईन हे शंकुधारी सदाहरित वृक्ष प्रामुख्याने आढळतात, तर प्रामुख्याने वनस्पतींचे सेवन करणारे मूस, कॅरिबू (रेनडिअर) आणि इतर हरिणे असे प्राणी आढळतात. काही जीवसंहतीचे नामकरण त्या जीवसंहतीमधील प्रभावी वनस्पती आणि प्राणी यांच्या नावावरून करतात. जसे समशीतोष्ण सदाहरित वनांना ओक-काळवीट-मेपल जीवसंहती असेही म्हणतात.
एखादया जीवसंहतीमध्ये जरी ती जगाच्या वेगवेगळ्या भागांत असली तरी त्यांच्यात जवळपास सारखे वनस्पती आणि प्राणी समुदाय आढळून येतात. उदा.तृणभूमी जीवसंहीतमध्ये आशियातील थंड व विस्तृत गवताळ प्रदेश (स्टेप) उत्तर अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेश (प्रेअरी), दक्षिण आफ्रिकेतील गवताळ प्रदेश (वेल्ड) आणि दक्षिण अमेरिकेतील गवताळ प्रदेश (पँपास) इत्यादींचा समावेश होतो. या प्रत्येक जीवसंहतीतील गवतांची जाती वेगवेगळी असू शकते;परंतु या सर्व प्रदेशांमध्ये वनस्पतींचे स्वरूप जवळपास सारखे असते.
एखादया जीवसंहतीतील प्राणी आणि वनस्पती यांच्यातील आंतरक्रिया कशी घडते, त्यानुसार जीवसंहतीतील त्यांचे ‘सुस्थान’ (नीश) निश्चित होते. ‘सुस्थान’ ही संज्ञा प्राणी किंवा वनस्पती यांचा निसर्गातील अधिवास आणि धर्म (संयुक्तपणे त्यांच्या सवयी आणि वागणूक) यांची परस्परसंगती दर्शविते; उदा., तृणभूमी जीवसंहतीत अनेक प्राण्यांचा धर्म ‘चरणे’ असतो. एकेकाळी, उत्तर अमेरिकेतील तृणभूमी गव्यांचे सुस्थान होते. त्याचप्रमाणे आज आफ्रिकेतील तृणभूमी झीब्रा, चिंकारे आणि हरणे यांचे सुस्थान आहे. असे प्राणी जे वेगवेगळ्या भागांतील सुस्थानात आढळतात त्यांना ‘पारिस्थितिकीय समतुल्य’ (इकॉलॉजिकल इक्विवॅलंट) म्हणतात.
बहुसंख्य प्राणी त्यांना योग्य अशा सुस्थानात आढळतात. मात्र प्राण्यांची काही उदाहरणे अशी आहेत की, ते प्राणी त्यांचे सुस्थान म्हणता येत नाही अशा अधिवासात राहतात. उदा., किवी हा न उडणारा पक्षी जमिनीवर राहतो आणि कृमी तसेच तत्सम प्राण्यांवर जगतो; परंतु तो सस्तन प्राण्यांसाठी ‘सुस्थान’ असलेल्या अधिवासात राहतो.
एखादया विशिष्ट जीवसंहतीत आढळणारे प्राणी किंवा वनस्पती यांची खास लक्षणे दिसून येतात ती त्यांच्या जगण्यासाठी अनुकूलित झालेली असतात. उदा., वाळवंटातील जीवसंहतीत निवडुंग (कॅक्टेसी) आढळून येतात. या वनस्पतींचे खोड पाणी साठवून ठेवण्यासाठी मांसल असतात आणि त्यांवर बाष्पोत्सर्जन टाळण्यासाठी व प्राण्यांनी खाऊ नये यांसाठी काटे असतात. टंड्रा जीवसंहतीतील काही प्राण्यांचा रंग हिवाळ्यात पांढरा होतो आणि उन्हाळ्यात करडा होतो. प्राण्यांच्या रंगांतील हा बदल त्यांना हिवाळ्यात हिमकणांबरोबर किंवा उन्हाळ्यात वनस्पतींमध्ये मिसळून वावरायला उपयुक्त ठरतो.