माणिक्‍यचंद्रसूरी : (इ. स. १५ व्‍या शतकाचा पूर्वार्ध) गुजरातमधील अंचलगच्‍छ या जैन संप्रदायातील साधू. मेरूतुंगसुरींचे शिष्‍य. संस्‍कृतचे विद्वान तसेच समर्थ गुजराती गद्यकार म्‍हणून ख्‍याती. कथासरीत्सागरवर आधारित पृथ्‍वीचंद्रचरित्र  या त्‍यांच्‍या कृतीत राजा पृथ्‍वीचंद्र आणि राणी रत्‍नमंजरी यांच्‍या चरित्रचित्रणाच्‍या आश्रयाने पुण्‍यकर्मांचा सत्‍प्रभाव दर्शविला आहे. या गद्यात्‍मक धर्मकथेचे निरूपण करताना अद्भुत रसाचा वापर करण्‍यात आला आहे. त्‍याशिवाय अनुष्‍टुभ, आर्या, शिखरिणीतील १७ संस्‍कृत श्‍लोक आणि फागु, रास, अढैऊ यासारख्‍या देशी छंदातील ७४ गुजराती श्‍लोक अशी नेमिनाथकुमारराजिमती -चरित्र -फाग / नेइमीश्‍वरचरित -फाग  ही त्‍यांची वैशिष्‍टयपूर्ण रचना आहे. सुबाहु -चरित्र,सत्‍तरभेदी /सप्‍तप्रकारकथा, पार्श्‍वनाथ -स्‍तवन, विचारसारस्‍तवन  इ. त्‍यांच्‍या गुजराती कृती प्रसिद्ध आहेत. याबरोबरच ९ सर्गात बांधलेले श्रीधर -चरित्र  हे महाकाव्‍य, चंद्रधवल -धर्मदत्‍त -कथा, महावीरांनी राजा श्रेणिकाला केलेल्‍या उपदेशाचे वर्णन करणारी गुणवर्मचरित, ४ सर्गातील महाबलमलय सुंदरीचरित, १४ सर्गाचे यशोधर -चरित हे महाकाव्‍य या त्‍यांच्‍या संस्‍कृत रचनाही महत्‍त्‍वाच्‍या आहेत; तसेच साहित्‍य संग्रहकथावार्ता ही कृतीही त्‍यांच्‍या नावावर आहे.

संदर्भ : सांडेसरा, भोगीलाल, इतिहास अने साहित्य, १९६६.