
जरथुश्त्री (पारशी) धर्मग्रंथात वर्णन केलेल्या पाशवी प्रवृत्तीचे मूर्तस्वरूप म्हणजे अंग्रो-मइन्यु होय.
पेहलवी भाषेत त्यास ‘अहरिमन’ अशी संज्ञा आहे. झरथुष्ट्रप्रणीत गाथेत अंग्रो-मइन्युचा उल्लेख आढळत नाही; तथापि अन्य अवेस्ता प्रकरणांत हे नाव येते. अहुर मज्द (स्पँता-मइन्यु) ह्या दैवी प्रवृत्तीचा त्यास शत्रू मानले आहे. तो साक्षात मृत्युस्वरूपी असून जीवसृष्टीत निर्माण होणारे रोग व तदनुषंगिक घाण, सडणे कुजणे इ. प्रक्रिया घडवून आणतो. उत्तर देशा हे त्याचे निवासस्थान होय.
परमात्मभक्तीची व सद्धर्माचरणाची उदात्त शिकवण देण्याच्या व्रतापासून झरथुष्ट्रास (इ.स.पू. ६ वे-७ वे शतक) परावृत्त करण्याचे त्याने प्रयत्न केले, पण ते सफल झाले नाहीत, असा उल्लेख अवेस्ता साहित्यात आढळतो. सैतानाशी त्याचे बरेच साम्य आहे.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.