पारशी धर्मग्रंथ अवेस्तामध्ये येणारी महत्त्वपूर्ण संकल्पना. यझत हा शब्द अवेस्तन यझ् (संस्कृत यज्) या धातूपासून तयार झाला आहे. त्यामुळे यझत किंवा यझद म्हणजे पूजार्ह किंवा यज्ञार्ह होय. पारशी धर्मात सर्वसाधारणपणे एखाद्या दैवी शक्तीला उद्देशून ही संज्ञा वापरली जाते. झरथुष्ट्र हा सर्वांत श्रेष्ठ यझत मानला जातो. चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविणे आणि दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट करणे या कामी झरथुष्ट्राचे साहाय्यक असलेल्यांसाठीसुद्धा ही संज्ञा वापरलेली दिसून येते. त्यामुळे मिथ्र, अपां नपात्, स्रओश वगैरे दैवी प्रवृत्तींना यझत म्हटलेले आहे.

अवेस्तात यझतचे दोन वर्ग आढळतात : १. आध्यात्मिक जगातील यझत, २. भौतिक जगातील यझत. प्रत्यक्षात सर्व यझत हे आध्यात्मिक असतातच; परंतु भौतिक यझतांची व्यवस्था वेगळी करण्यामागचे कारण असे की, हे भौतिक जगातील यझत निसर्गातील महत्त्वाच्या शक्तींवर नियंत्रण ठेवणारे असतात.

यझतांची एकूण संख्या ३० असून यांच्या नावांवरूनच पारशी धर्मात महिन्यातील ३० दिवसांची नावे पडलेली आहेत, ती खालीलप्रमाणे :

आध्यात्मिक जगातील यझत भौतिक जगातील यझत
१. अहुर मज्द

२. बहमन

३. अर्दिबेहश्त

४. शेहरिवर

५. स्पेन्दार्मद

६. खोर्दाद

७. अमेर्दाद

८. दए-प-आदर्

१५. दए-प-मेहेर

१७. सरोश

१८. रश्न

२०. बेहराम

२३. दए-प-दिन

२४. दिन

 २५. अशी

२६. आस्ताद

२९. मारेस्पन्द

९. आदर्

१०. अवान्

११. खोर्शेद

१२. मोहोर

१३. तिर

१४. गोश

१६. मेहेर

१९. फरवर्दिन

२१. राम

२२. गोअद

२७. आस्मान

२८. झमयाद

३०. अनेरान

वरील वर्गीकरणातील पहिले ७ यझत हे इतर यझतांच्या तुलनेत महत्त्वाचे मानले जातात. यांनाच अमॅष स्पॅंत असे म्हटले जाते.

संदर्भ :

  • Boyce, Mary, Zoroastrians : Their Religious Beliefs and Practices, London, 1979.
  • Modi, Jivanji Jamshedji, The Religious Ceremonies and Customs of the Parsees, Bombay, 1995.
  • https://www.fas.harvard.edu/~iranian/Zoroastrianism/Zoroastrianism1_Intro.pdf

                                                                                                                                                                                                                              समीक्षक : शकुंतला गावडे