पारशी धर्मातील अत्यंत पूजनीय व एकमेवाद्वितीय अशा ईश्वराचे हे नाव आहे. अहुर मज्द ही उच्चतम दैवी शक्ती मानली आहे. ऋग्वेदातील ‘असुर’ हे नाव गाथांतील ‘अहुरा’शी मिळतेजुळते आहे. ऋग्वेदातील आरंभीच्या सूक्तात असुराला सन्मान्य स्थान देण्यात आले होते. अहुर मज्द सर्वशक्तिमान आहे. त्याची सत्ता अमर्याद असून तो अविनाशी व अविकारी आहे. तो सदाचरणाद्वारा सुख व आनंद देतो. तो आदी आहे, त्याच्या पूर्वी कोणीही नव्हते. तो चिन्मय असून केवळ मनानेच आकलनीय आहे. सन्मार्गाचा अवलंब करून मानवास त्याचा साक्षात्कार करून घेता येतो. तो सृष्टीचा निर्माता आहे. विश्वात प्रकाश निर्माण करण्याचा मानस त्यानेच प्रथम केला. त्याने सृष्टीची निर्मिती केली. एवढेच नव्हे, तर सृष्टिसंचालनासाठी स्वत: निर्माण केलेल्या व सत्यावर अधिष्ठित असलेल्या शाश्वत धर्माचे पालन करून सृष्टीस गतिमान केले. रात्र व दिवस तसेच निद्रा व जागृती हीही त्याचीच निर्मिती आहे. त्याने स्नेहभावाची थोर देणगी मानवास दिली आहे. तो ज्ञानवान, सर्वज्ञ व चातुर्याचा जनक आहे, त्याला कोणीही फसवू शकत नाही. सर्व स्मरणारा तसेच मानवाला त्याच्या ऐहिक जीवनात त्याच्या कृत्यांचा न्यायनिवाडा देणारा, असेही त्याचे वर्णन आढळते.
सदाचरणाने व सत्कार्य करीत राहिल्याने मानवास अहुर मज्दाची प्राप्ती होते. नंतरच्या अवेस्ता व पेहलवी ग्रंथांत अंग्रो-मइन्यु (अहरिमन) हा अहुर मज्दाचा विरोधक म्हणून वर्णिला आहे. गाथांत व ‘यस्नात’ मात्र अंग्रो-मइन्यूचा उल्लेख आढळत नाही. तेथे ‘स्पँता-मइन्यु’ म्हणजे कल्याणकारी तत्त्व व ‘अचिश्तेम मनो’ म्हणजे अकल्याणकारी अथवा दुष्ट तत्त्व यांच्यातील विरोध दाखविला आहे. ही दोन परस्परविरोधी तत्त्वे मानवी जीवनात नेहमीच झगडत असतात आणि त्यांचा हा झगडा चिरकाल चालू राहणार आहे.
अशा प्रकारे झरथुष्ट्राने विश्वनिर्मात्या, विश्वनियामक व विश्वपोषक ईशशक्तीची दिव्य व उदात्त कल्पना अहुर मज्दाच्या रूपाने जगास आणून दिली. ह्या ईशशक्तीस सन्मार्गयुक्त जीवनाने संतुष्ट करता येते व त्याचा साक्षात्कार करून घेता येतो, ह्या थोर विचाराची ही देगणी झरथुष्ट्राचीच आहे. सदाचार व चांगुलपणा यांवर निर्भर असणाऱ्या धर्मविचाराची ही प्रगती मानावी लागेल. ‘अहुर’ व ‘मज्द’ ही दोन नावे गाथांतून पृथक्पणे आली आहेत; तथापि गाथोत्तर अवेस्ता ग्रंथात ही दोन नावे ‘अहुर मज्द’ या स्वरूपात संलग्न झाली. प्राचीन इराणी (पर्शियन) शिलालेखांत हे नाव ‘ओहर्-मज्द’ असे असून पुढे ते ‘होर्मज्द’ असे झाले.