अग्यारी (अग्निमंदिर), मध्य लंडन.

पारशी धर्मियांच्या अग्निमंदिराचे हे नाव आहे. ‘आतश्-ए-दादगाह,’ ‘आतश्-ए-आदराँन’ व ‘आतश्-ए-बेहराम’ असे अग्यारीचे तीन दर्जे आहेत. ‘आतश्-ए-दादगाह’ मधील अग्नीजवळ पूजेसाठी दस्तुर (पुरोहित) किंवा गृहस्थी जाऊ शकतो; परंतु ‘आतश्-ए-आदराँन’ व ‘आतश्-ए-बेहराम’ मधील अग्नीजवळ सेवानियुक्त दस्तुराखेरीज अन्य कोणासही जाण्याचा अधिकार नाही. अग्यारीतील अग्नीचे दर्शन अन्य धर्मियांस घेता येत नाही.

सोनार, लोहार, कुंभार इत्यादिकांच्या भट्ट्यांतील अग्नी एकत्र करून त्यावर धार्मिक विधी झाल्यावर प्याल्यासारख्या मूल्यवान धातुपात्रात आतश्-ए-आदराँन व आतश्-ए-बेहराममधील सिद्धग्नी स्थापिला जातो. विशेषत: आतश्-ए-बेहराममधील सिद्धग्नीत वैद्युताग्नी समाविष्ट असतो. आतश्-ए-बेहराम हे अग्नीमंदिर सर्वश्रेष्ठ होय. या मंदिरातील अग्नी विझला, तर ते अरिष्टसूचक चिन्ह मानले जाते.

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा