इराणच्या पारशी धर्मातील देवता. इंडो-इराणीयन कालखंडातील या देवतेचा संबंध प्रकाश, करार, वचन व बंधन यांच्याशी आहे. मिथ्र या शब्दाची व्युत्पत्ती ‘मी’-बांधणे या युरो-भारतीय धातूपासून सांगितली जाते. अवेस्ता या धर्मग्रंथामधील मिथ्र हे देवतानाम वैदिक मित्र या देवतेच्या नावाशी साधर्म्य साधणारे आहे. हीच देवता मिन्ह किंवा मेहेर या नावानेही पुढे ओळखली गेली. वैदिक मित्राचे जसे प्रकाशाशी साधर्म्य आहे, तसेच मिथ्र हा प्रकाशाचा देव किंवा प्रकाशाचा दूत म्हणून ओळखला जातो. मुळात अवेस्तामध्ये हा सूर्यप्रकाशावर आधिपत्य गाजविणारा यझत आहे आणि त्यामुळेच सत्य, न्याय, स्नेह आणि मैत्री यांचाही तो अधिष्ठाता आहे. सूर्योदय होताच त्याचा प्रकाश लगेचच सर्वत्र पसरतो. या घटनेला अनुलक्षूनच याला अवेस्तामध्ये ‘वोरुगायोति’ असे म्हटले आहे. ऋग्वेदातील ‘उरुगाय’ (सर्वव्यापक) या विशेषणाशी याचे साधर्म्य दिसून येते.

अवेस्तामध्ये ‘मिथ्र’ म्हणजे करार असा अर्थ असून वेदांच्या तुलनेत तेथे या देवतेला अधिक महत्त्व असलेले दिसते. अवेस्ताच्या गाथांमध्ये मिथ्राचा उल्लेख नाही. झरथुष्ट्र (जरथुश्त्र) यानेही त्याची उपेक्षाच केली होती. अवेस्ताच्या ‘यश्त’नामक भागामध्ये मात्र त्याच्याविषयी प्रदीर्घ सूत्रे असून त्याला सत्याचा व वचनांचा पालनकर्ता मानलेले आहे. तसेच तो युद्धदेव आणि अहुर मज्द याचा साहाय्यकारी आहे.

एका प्राचीन आख्यायिकेनुसार मिथ्राचा जन्म हा गुहेतून वा खडकातून झाल्याचे आढळते. त्यामुळेच त्याच्या पूजेसाठी मंदिर म्हणून गुहेचा वापर केला जात असे. मेंढपाळ हे त्याचे पहिले उपासक मानले जाते. जन्माला येतानाच तो आपल्यासोबत मशाल आणि तलवार घेऊन आल्याचे दिसते. जन्माला आल्यानंतर तो वैश्विक वृषभावर (बैलावर) आरूढ झाला आणि काही काळाने त्याने त्या बैलाचा वध केला. ही घटना त्याच्या चरित्रातील मध्यवर्ती घटना मानली जाते आणि ती धर्ममंदिरांतून चितारल्याचे आढळते. त्या बैलाच्या रक्ताने पृथ्वी सर्जनशील बनते, असे मानण्यात आले आहे. एक विंचू त्या बैलाच्या जननेंद्रियावर हल्ला करतो, एक सर्प रक्त पितो, एक कुत्रा त्या जखमेकडे धावतो इत्यादीचे वर्णन सोबतच्या चित्रात पाहावयास मिळते. अशा प्रकारच्या इतर कथाभागही मंदिरांतील चित्रांतून आढळतात. यूरोपमध्ये अशा प्रकारची अनेक शिल्पे आढळली आहेत.

मिथ्र हा स्वर्गीय न्यायसभेचा एक न्यायाधीश मानला जातो. या संदर्भात त्याचा उल्लेख अहुर मज्द, स्रोश (Sraosha) आणि रश्नु (Rashnu) यांच्यासोबत केला जातो. स्वर्गीय न्यायाधीश म्हणून त्याचे पाहण्याचे व ऐकण्याचे सामर्थ्य कल्पनातीत आहे. या संदर्भात त्याचे अवेस्तामध्ये आलेले वर्णन असे :

  • तो सदैव जागरूक आणि निद्रारहित आहे.
  • त्याला १,००० श्रवणेंद्रिये आणि १०,००० चक्षू आहेत.
  • तो सर्वज्ञ आहे, त्याच्यापासून काहीही लपून राहात नाही.
  • त्याचे १०,००० हेर आहेत.
  • तो सर्वांना पाहू शकतो; पण त्याला कोणीही पाहू शकत नाही.

प्रस्तुत वर्णन हे ऋग्वेदात वरुणासंदर्भात पाहावयास मिळते.

अवेस्तामध्ये मिथ्र हा विस्तीर्ण शेतजमिनी आणि कुरणे यांचाही अधिष्ठाता मानला गेला आहे. स्वर्ग आणि सूर्य यांच्याशी त्याचा घनिष्ट संबंध आहे. पारशी धर्मातील दैनंदिन प्रार्थनांमध्ये आजही ‘मेहेर नियायिश’ ही मिथ्राशी संबंधित प्रार्थना म्हटली जाते.

संदर्भ :

  • Dhalla, Maneckji Nusservanji, History of Zoroastrianism, Bombay, 1985.
  • Modi, jivanji Jamshedji, The Religious Ceremonies and Customs of the Parsees, Bombay, 1995.
  • http://avesta.org/ritual/rcc1937.pdf
  • https://www.ancient-origins.net/myths-legends/cult-mithra-sacred-temples-and-vedic-legends-and-ancient-armenian-understanding-006423

                                                                                                                                                                    समीक्षक : शकुंतला गावडे