पॅरान्थ्रोपस  हे मानवी उत्क्रांतीमधील एका पराजातीचे नाव. हे मानवसदृश प्राणी सुमारे २६ लक्ष ते १४ लक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. पॅरान्थ्रोपस याचा अर्थ ‘मानवाला समांतरʼ असा आहे. या पराजातीच्या पॅरान्थ्रोपस रोबस्टस (Paranthropus robustus), पॅरान्थ्रोपस बॅाइसी (Paranthropus boisei) आणि पॅरान्थ्रोपस इथिओपिकस (Paranthropus aethiopicus) अशा तीन प्रजाती आहेत. या पराजातीच्या संदर्भात पुरामानवशास्त्रात दोन प्रवाह आहेत. एक मत असे आहे की, पॅरान्थ्रोपस आणि ऑस्ट्रॅलोपिथेकस यांच्यामध्ये फरक नव्हता. त्यामुळे आकाराने मोठ्या तीन प्रजातींचा समावेश ‘दणकट ऑस्ट्रॅलोपिथेकसʼ (Robust) या गटात केला जातो. दुसरा मतप्रवाह मानणारे पुरामानवशास्त्रज्ञ मात्र पॅरान्थ्रोपसची वेगळी पराजाती मानतात.

शरीराचा छोटा आकार आणि तुलनेने मोठे दणकट डोके हे पॅरान्थ्रोपसचे मुख्य वैशिष्ट्य आहे. नरांच्या कवटीच्या मध्यभागी तुऱ्यासारखा एक लांबलचक उंचवटा होता. याला सममितार्धी शिखा (sagittal crest) म्हणतात. त्यांच्या मेंदूचे आकारमान ४२० ते ५२० घ. सेंमी. होते. खालचे जबडे दणकट असून दाढांचे दात (molars) मोठे होते. तसेच दातांवरील लुकनचे (इनॅमल) आवरण जाड होते. बहुधा पॅरान्थ्रोपस प्राण्यांच्या आहारात कठीण कवच असलेल्या फळांचा अथवा बियांचा समावेश होता. दाढांचे दात अधिक तंतुमय अन्न चघळण्यासाठी उपयोगी पडत होते. याकरता आवश्यक बळकट स्नायूंना आधार देण्यासाठी कवटीमधील अनेक हाडे लांबरुंद झालेली दिसतात.

पॅरान्थ्रोपस पराजातीचे प्राणी आणि होमो या मानव पराजातीच्या काही प्रजाती (होमो हॅबिलिस आणि होमो इरेक्टस) एकाच कालखंडात अस्तित्वात असल्या, तरी यांचा मानव पराजातीच्या उत्क्रांतीशी थेट संबंध नाही. फक्त या दोघांचा एक सामायिक पूर्वज (Common ancestor) होता. त्यामुळे पॅरान्थ्रोपस पराजातीला मानवी उत्क्रांतिवृक्षावर एक नामशेष झालेली शाखा (Clade) असे स्थान आहे.

संदर्भ :

  • Hlusko, L. J. ‘Protostylid variation in Australopithecusʼ, Journal of Human Evolution : 46, pp. 579-594, 2004.
  • Jurmain, Robert; Nelson, Harry; Kilgore, Lynn & Trevathan, Wenda, Essentials of Physical Anthropology, Belmont, USA, 2001.
  • Ungar, P. S. Ed., Evolution of the Human Diet : The Known, the Unknown and the Unknowable, Oxford, 2007.

                                                                                                                                                                                                                          समीक्षक – शौनक कुलकर्णी