जीवाश्मच्या अभ्यासाला पुराजीवविज्ञान (Paleontology) म्हणतात. स्तरविज्ञानाशी (Stratigraphy) याचा निकटचा संबंध येतो. स्तरविज्ञानात जीवाश्मांचा फार मोठा उपयोग होतो. जीवाश्मांच्या अभ्यासामुळे पृथ्वी व तिच्यावरील जीवांचा इतिहास म्हणजे पूर्वीच्या निरनिराळ्या काळांतील वनस्पती व प्राणी; तसेच भौगोलिक परिस्थिती, त्या – त्या काळचे हवामान, भूरचना इत्यादींविषयी (Historical Geology) बरीच महत्त्वाची माहिती मिळते, म्हणून भूविज्ञान (Geology) व जीवविज्ञानाच्या (Biology) दृष्टीनेही जीवाश्म अत्यंत महत्त्वाचे ठरतात. मुख्यतः बारीक कणांनी बनलेल्या गाळ खडकांच्या निरनिराळ्या थरांत निरनिराळी वैशिष्ट्ये असलेले जीवाश्म असतात. जीवाश्माच्या प्रकारांवरून निरनिराळे थर ओळखू येतात. जीवाश्माची तपासणी करून गतकालीन पुरातन वनस्पती व प्राण्यांची माहिती मिळतेच; पण त्या आधारे खडकांचे सापेक्ष काल (Relative age of rocks) ठरविण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो.

खडकांत टिकून राहिलेल्या गतकालीन जीवांच्या अवशेषांना किंवा त्यांच्या अस्तित्वाच्या चिन्हांना जीवाश्म म्हणतात. जीवांच्या शरीरांचे मऊ भाग कुजून लवकरच नाश पावतात. कठीण सांगाड्यांसारखे काही भाग शरीरात असले, तर ते मात्र टिकून राहणे शक्य असते. मृत प्राण्यांची शरीरे (मढी) उघड्यावरच राहिली, तर ती कुजून छिन्नविच्छिन्न होतात किंवा शवभक्षक जीवांकडून खाऊन टाकली जातात; पण ती मातीने किंवा गाळाने झाकली गेली, तरच त्यांचे जीवाश्म होण्याचा संभव असतो. जमिनीवरील मर्यादित क्षेत्रात (उदा., नदी, नाले, डबकी, तलाव, सरोवर इ. ठिकाणी) फक्त गाळ साचत असतात; पण उथळ समुद्रात किंवा खोल समुद्रात मात्र ते विस्तीर्ण क्षेत्रात साचत असतात, म्हणून जमिनीवरील जीवांच्या (Terrestrial life) मानाने पाण्यात विशेषतः समुद्रात राहणाऱ्या जीवांचे जीवाश्म होण्याला अधिक अनुकूल परिस्थिती असते, म्हणूनच आपणास आढळणाऱ्या एकूण जीवाश्मांपैकी बहुतांशी हे समुद्रातल्या जीवांचेच (Marine life) असतात.

भारतीय भूवैज्ञानिकीय कालखंडातील गोंडवाना महासंघाच्या तालचीर संचामधील (Talchir Formation) पर्मियन कल्पातील (Permian Period; सु. २८०-२४० द.ल. वर्षांपूर्वी) जीवांचे सागरी जीवाश्ममय खडक हे मनेंद्रगढ (Manendragarh; सरगुजा जिल्हा, छत्तीसगढ) येथील राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय जीवाश्म उद्यानामध्ये (पार्क) जमिनीवर / उघड्यावर जतन झालेले एकमेव उदाहरण आहे. या ठिकाणी असलेल्या हसदेव (Hasdeo) नदी आणि हासिया (Hasia) नाल्याच्या संगमापासून नदीच्या उगमस्थानाकडील साधारण १ किमी. भागामध्ये हे सागरी जीवाश्ममय खडक पाहवयास मिळतात. या सागरी जीवाश्मांमध्ये प्रामुख्याने पेलेसिपोड्स (Pelecepods)/लॅमेलिब्रँच (Lamellibranchs) वर्गातील यूरिडेसमा (Eurydesma) आणि ॲव्हिक्यूलोपेक्टन (Aviculopecten) शिवाय ब्रायोझोनन्स (Brayozoans), क्रिनॉइड्स (Crinoids) आणि फोरॅमिनीफेरा (Foraminifera) हे (मातीच्या) पंकाश्म/शेल (Shale) खडकांमध्ये आढळतात. हसदेव नदीच्या उजव्या तिराकडील बाजूला हा भाग उघडा पडलेला असल्यामुळे नदीला पाणी येते, तेव्हा हा भाग पाण्यात बुडालेला असतो, त्यामुळे पावसाळ्याचे ४ महिने सोडून इतर वेळी या पार्कला भेट देता येते.

भारतीय रेल्वेच्या आग्नेय विभागातील (साऊथ ईस्टर्न) अनुपूर – चिरमिरीमार्गावरील ९३७ आणि ९३८ मैल दगडांमध्ये असणाऱ्या रेल्वे पुलाजवळ आणि मनेंद्रगढ रेल्वे स्थानकाच्या २.५ किमी. आग्नेयेला असलेल्या अम्माखेरवा गावाजवळ ही राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय स्मारकाची जागा आहे. या ठिकाणी नागपूरहून राष्ट्रीय महामार्ग ७ वरून जबलपूर आणि पुढे राज्य रस्ता क्रमांक १४ वरून कटनी, शहडोळ, बुरहार, अनुपूर आणि कोटमा असेही जाता येते.

संदर्भ :

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी