गोव्यात सादर केले जाणारे एक विधीनृत्य. ते साखळी या गावी चैत्र पौर्णिमेला तर फोंडा, केपे, सांगे इत्यादी भागात धालोत्सवाची वा शिगमोत्सवाची सांगता करताना सादर केले जाते. गोव्यावर कदंबांची आणि विजयनगरची सत्ता होती. त्या काळात कर्नाटकातून वीरशैव पंथातील या वीरभद्र सादरीकरणाची परंपरा गोव्यात आली असावे असे अभ्यासक मानतात. कानडी भाषेतील आवाहन, त्याला दिला जाणारा प्रतिसाद, एकूण वेशभूषा आणि नृत्यपद्धती यांवरून त्याची खात्री पटते.

वीरभद्र या पात्राची कथा पद्मपुराण आणि महाभारतात मिळते. स्वायंभूव मन्वंतरात दक्षप्रजापतीने यज्ञ केला.यज्ञासाठी समस्तांना निमंत्रण दिले. मात्र आपल्या मनाविरुद्ध पार्वतीने शिवाशी लग्न केले या रागातून दक्षाने पार्वतीला म्हणजे सतीला आणि शिवाला निमंत्रण दिले नाही. शिवाचे सांगणे अव्हेरून सती यज्ञसमारंभात गेली. तेथे दक्षाने तिची आणि शिवाची निर्भत्सना करणारे शब्द उच्चारले. ते सहन न झाल्याने सतीने योगाग्नी प्रज्वलित करून त्या यज्ञकुंडात देहत्याग केला.शिवाला ही बातमी कळताच त्याचा राग अनावर झाला. त्याने आपल्या जटा जमिनीवर आपटल्या.त्यातून वीरभद्राची उत्पत्ती झाली. शिवाने वीरभद्राला दक्षयज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा केली. रुद्रगणांना घेऊन वीरभद्र दक्षाकडे गेला आणि त्याला  यज्ञकुंडात फेकून दिले.शिवाचा आवडता पार्षद म्हणून वीरशैव पंथात वीरभद्राला मानाचे स्थान देण्यात आले.

वीरभद्र सादर करणारे पात्र ठरावीक कुटुंबातील असते.ते पात्र पहिले तीन दिवस व्रतस्थ राहते. सादरीकरणाच्या रात्री त्याचा चेहरा रंगवून त्याला वेश परिधान केला जातो.त्याअगोदर तिथे नारळ फोडून दैवताला आवाहन केले जाते. वीरभद्राचा वेश म्हणजे पायघोळ रंगीत धोतर,कमरेला रंगीत लुगडे,गळ्यात माळा,कानांत व हातांत आभूषणे, अंगात भरजरी पोषाख,डोक्यावर पगडीसदृश्य मुकूट आणि पाठीला बांबूच्या कामट्यांनी व रंगीत कागद तसेच कपड्यांनी बनविलेली  प्रभावळ आणि दोन्ही हातात दोन तलवारी राक्षसी वेशभूषेतील या पात्रासोबत दोन दिवटीवाले आणि काही माणसे असतात.ती त्याचा जयजयकार करतात.त्याच्या कमरेला बांधलेल्या वस्त्राची टोके आपल्या हातांत  घेऊन काही माणसे त्याला आवरण्याचा प्रयत्न करतात.ढोल,ताशा,कांसाळे, झांज यांच्या वादनासह वीरभद्राची मिरवणूक निघते. ती ठरावीक जागेवर थांबते.तेव्हा त्याचा साहाय्यक त्याला आवाहन करून त्याची महती गातो. ‘कैलास वळगे वीरनुवीर महावीर वीरभद्रअण्णा’अशा कन्नड भाषेतील शब्दांत तो वीरभद्राचे मोठेपण सांगतो, तेव्हा त्याचे गण ‘हाउदे’ म्हणून आपली संमती देतात.वीरभद्राचे हे संपूर्ण सादरीकरण राक्षसी पद्धतीचे असते. हातांतील  नंग्या तलवारी वेळावत वीरभद्र त्वेषपूर्ण रीत्या पुढे-पुढे सरकत जातो. सादरीकरणाच्या स्थळावर ठरावीक फेऱ्या मारल्यावर वीरभद्र जमिनीवर कोसळतो. तेव्हा त्याला सोबतची माणसे सावरतात.मंदिरातील तीर्थ त्याच्यावर शिंपडतात.काही वेळाने ते पात्र सावशीद(शांत) होते.दैवताला गाऱ्हाणे घालून वीरभद्र उत्सव संपतो.

संदर्भ : फळदेसाई,पांडुरंग,गोवा : फोकलोर स्टडीज,पणजी,२०११.

प्रतिक्रिया व्यक्त करा