पारंपरिक लोकजीवन व लोकमानसातील कृती-उक्तींचा आविष्कार लोकसाहित्यात होतो.लोकसमूहाच्या जीवनविषयक प्रणालीची मूर्त-अमूर्त विविध रूपे लोकसाहित्यात प्रकट होत असतात. ही रूपे ढोबळमानाने पुढीलप्रमाणे मांडता येतात. १) लोक विश्वास,लोकश्रद्धा,लोकभ्रम,लोकोक्ती, २) रूढी, प्रथा, ३) विधी विधाने, सण उत्सव, व्रतवैकल्ये, ४) नैसर्गिक घटीते, ५) पारंपरिक व्यवसाय आणि कौशल्ये, ६) लोकनृत्य,लोककला,लोककलात्मक शब्दाविष्कार. या लोकसाहित्याच्या ढोबळ अंगांव्यतिरिक्त लोकसाहित्याचे साक्षेपी अभ्यासक प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्याच्या व्याप्तीचे चार विभाग पुढील प्रमाणे सुचविले आहेत.१) मौखिक आविष्कार, २) भौतिक संस्कृती, ३) लोकरुढी, विधी समजुती, ४) प्रयोग सिद्ध कला. पारंपरिक लोकजीवनाच्या मौखिक शब्द आविष्कारात कथा, गीत, कथागीत, उखाणे, म्हणी व वाक्प्रचार यांसारख्या लोकवाङ्मयाचा समावेश होतो. कौटुंबिक,सामाजिक व धार्मिक विधीच्या निमित्ताने लोकगीतांची निर्मिती होते. श्रमपरिहारासाठीही ही निर्मिती होते. लोकसाहित्याच्या भौतिक संस्कृतीत परंपरेने लोकजीवनात चालत आलेले व्यवसाय, या व्यवसायात उपयोगात आणली जाणारी अवजारे व व्यावसायिक कौशल्ये यांचा समावेश होतो. भाव, भावना, श्रद्धा यांचा आविष्कार कृतीद्वारा केला जातो. लोकसमूहाच्या या कृतींचा समावेश लोकविश्वास, लोकरुढी-प्रथा, लोकसमजुती, लोकश्रद्धा, लोकभ्रम आणि विधी या लोकसाहित्याच्या अंगामध्ये केला जातो. लोकजीवनात निरनिराळ्या विधी आचरणाच्या निमित्ताने होणारी लोकनृत्ये, खेळ, नृत्य-खेळ तसेच मनोरंजनासाठी केली जाणारी लोकनाट्ये, लोकसंगीत, चित्रकथा, रांगोळी या प्रयोगसिद्ध कला होत. लोकसाहित्याचे हे महत्वाचे अंग आहे.
संदर्भ :
- देवरे, रमेश (संपा), लोकसाहित्य दर्शन, कर्मवीर प्रकाशन, पुणे, २००९.