शाहिरी वाङ्मय म्हणजे मुख्यतः पोवाडे, लावण्या आणि लावण्यांतच मोडणारी भेदिक कवने. एखाद्या वीराचा पराक्रम, राज्यकर्त्यांचे गुणगान, परचक्र व दुष्काळ वा दंगा यांसारखे देशावर कोसळलेले संकट, तीर्थक्षेत्राचे वा राजधानीचे वर्णन इ. विषय पोवाड्यांचे होत. स्त्रीपुरुषांचे सौंदर्य, त्यांची प्रेमभावना, विरहावस्था, प्रणयक्रीडा, झगडे, रुसवेफुगवे, निपुत्रिकेची दु:खे, गरोदर स्त्रीचे डोहाळे, पुराणांतील कथा, आध्यात्मिक वा व्यावहारिक उपदेश, अध्यात्म वा पुराणकथा वा लौकिक जीवन यांवरील कोडी, लोककथा इ. लावण्यांचे विषय होत. या वाङ्मयाला शाहिरी काव्य म्हणतात.
शाहीर हा शब्द कवी या अर्थाच्या शाइर या मूळ अरबी शब्दावरून आला आहे. संत व पंडितकवी यांचे काव्यविषय आध्यात्मिक व पौराणिक, तर शाहिरांचे मुख्यतः लौकिक. शाहिरांनी आध्यात्मिक वा पौराणिक विषयांवर कवने रचली नाहीत असे नाही; पण त्यांचा रचनाहेतू संत व पंडितकवी यांच्याहून वेगळा आहे. लोकांचे मनोरंजन करून त्यांच्याकडून द्रव्यसंपादन करावे, हाच शाहिरांचा हेतू दिसतो. पोवाडे व लावण्या यांच्या अंती बिदागीचा उल्लेख या कारणानेच आलेला दिसतो. त्यांच्या आध्यात्मिक रचनेचा हेतू आपल्या ज्ञानाने श्रोत्यांना चकित करणे आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला निरुत्तर करणे एवढाच दिसतो. म्हणून विषय लौकिक आणि रचनाहेतू मनोरंजन व द्रव्यसंपादन या कारणांनी पोवडे व लावण्या रचणाऱ्यांस कवी न म्हणता शाहीर म्हटले असावे असे वाटते.
उपलब्ध शाहिरी रचनेतील जुन्यात जुने पोवाडे शिवकालातील आहेत आणि लावण्या पेशवाईतील; परंतु ही परंपरा ज्ञानेश्वरांच्याही आधीपासूनची असावी आणि आजमितीपर्यंत ती चालूही आहे. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या सतराव्या अध्यायात तामस दानाची जी उदाहरणे दिली आहेत, त्यांतील एक भाग असा आहे : ‘‘नगरातल्या चव्हाट्यावर, संध्याकाळच्या वा रात्रीच्या वेळी गीतभाटीवांचे म्हणजे लावण्या-पोवाड्यांचे गायन चालते. त्याला रूपनृत्याची पुरवणी म्हणजे साथ असते. त्यातच नाची डोळे मोडते आणि पुढे होऊन श्रोत्याच्या कानात कर्णजप करते म्हणजे कुजबुजते. त्या वेळी तिच्या केसातील फुलांचा वास येताच, श्रोत्याच्या मनातील मोहाचा वेताळ जागा होतो आणि तो आपल्या जवळील धनाचा तिच्यावर वर्षाव करतो” (ज्ञानेश्वरी १७ : २९३–२९८). हे वर्णन आजच्या तमाशाशी पुष्कळच मिळतेजुळते आहे. एकनाथी भागवतात भांडाच्या भंडपुराणाचा उल्लेख आहे (ए. भा. ८–८२). खुद्द एकनाथांनी एक भांडही रचलेले आहे. त्याचा आशयविषय निवृत्तिपर असला, तरी त्याची भाषा तमाशा कलावंताच्या तोंडीच शोभेल अशी आहे. महीपतीच्या संतविजयात (अध्याय १८ : १८३–२१४) रामदासस्वामींच्या मठात छ. शिवाजींकडे फिर्याद घेऊन आलेल्या शाहिरांची कथा आहे. त्यातील शाहिरांचे व त्यांच्या झगड्याचे वर्णन आणि रामदासांनी त्यांची तामसी व धीट कवी अशी केलेली संभावनाही लक्षणीय आहे. भंड व भांड हे दोन्ही शब्द संस्कृत आहेत. यावरून तमाशाच्या प्राचीनतेची कल्पना येते आणि भांडांच्या तमाशांचा उल्लेख पेशवेकालीन बखरीतही येतो, यावरून तमाशाच्या परंपरेचीही कल्पना येते. विराण्या, सौरी, गौळणी, भारूडे या प्रकारांची जी ज्ञानेश्वरादी सर्वच संतांनी रचना केली आहे, त्यांवरूनही त्यांच्या काळात याच प्रकारची पण लौकीक स्वरूपाची शाहिरी रचना होत असावी असे वाटते.
‘पवाड’ हा शब्द ‘महत्त्व, सामर्थ्य, विस्तार, विस्ताराने वर्णन, पराक्रम’ या अर्थांनी ज्ञानेश्वरीत आला आहे. उपलब्ध पोवाड्यांत युद्धाबरोबरच दुष्काळ, दंगा, राज्यकर्त्याचा मृत्यू, राष्ट्रीय आपत्ती वगैरे प्रसंग आलेले आहेत. एखाददुसरा अपवाद सोडला, तर बहुतेक पोवाडे हे तत्कालीन प्रसंगावरच आहेत. याचे महत्त्वाचे कारण असे दिसते की, हे शाहीर तत्कालीन समाजात क्षोभ उत्पन्न करणाऱ्या आणि म्हणून त्याला कुतूहल वाटत असलेल्या घटनांवर पोवाडे रचून गावोगाव म्हणून दाखवीत असावेत.
लावणीच्या अभ्यासकाला तिच्या ज्या विशेषाचे आकर्षण वाटले, त्याला अनुसरून ‘लावणी’ या संज्ञेची व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. लावणी हे लोकगीत असा ज्यांचा समज त्यांनी लावणी म्हणजे ‘(भाताच्या) रोपांची लावणी’ करते वेळी म्हणावयाचे गीत किंवा ‘लू’ म्हणजे ‘कापणे’, ‘खुडणे’ या धातूवरून ‘लावणी’ म्हणजे ‘पिकांची कापणी’ करते वेळी म्हणायचे गीत अशी व्युत्पत्ती सुचविली. लावणीत सौंदर्याचे–विशेषतः स्त्रीसौंदर्याचे – वर्णन असते, यावर भर देणाऱ्यांनी ‘लवण’ म्हणजे सुंदर या शब्दावरून ‘लावणी’ ची व्युत्पत्ती सांगितली. भाषाशास्त्रज्ञांनी संस्कृत, प्राकृत व मराठी या भाषांतील ध्वनिपरिवर्तन लक्षात घेऊन ‘लापनिका’ या शब्दावरून ‘लावणी’ हा शब्द व्युत्पादिला आणि भेदिक लावण्यांतील आध्यात्मिक कूटांवर भर देणाऱ्यांनी ‘अंतर्लापिका’, ‘बहिर्लापिका’ या संस्कृत कूटकाव्याशी ‘लापनिके’ चे नाते जोडून या व्युत्पत्तीचा पुरस्कार केला पण यांपैकी कोणालाही आपल्या व्युत्पत्तीला ग्रंथाधार देता आलेला नाही.
लावणीची व्युत्पत्ती ग्रंथांच्या आधाराने शोधायची असली, तर संगीत-शास्त्रावरील प्राचीन ग्रंथांकडे वळले पाहिजे. मध्ययुगीन भारतात –विशेषत: दक्षिण भारतात – नाट्य, नृत्य व गीत यांचे मार्ग व देशी असे दोन ठळक भेद मानले जात असत. मार्ग म्हणजे ब्रह्मदेवाने सांगितलेली, नटराज शंकराने योजलेली आणि नाट्याचार्य भरताने पुरस्कारिलेली अभिजात कला आणि देशी म्हणजे निरनिराळ्या प्रदेशांत परंपरेने चालत आलेली लोककला. शहाजीराजांच्या दरबारातील वेद नावाच्या पंडिताने संगीतमकरंद नावाच्या ग्रंथात देशी नृत्याचे लावण, भित्र, नेत्र, जारुमान, तुल्ल, वेनकतुल्ल, चुल्लक, पसर, वक्र, हुल्ल, होय्लु आणि कट्टण असे १२ प्रकार सांगितले आहेत. त्यांतील ‘लावण’ नृत्याची लक्षणे तमाशातील नाचाशी जुळती आहेत. वेदाचे वडील दामोदर यांनी संगीतदर्पण या ग्रंथात याच ‘लावण’ नृत्याचा निर्देश ‘लावणी’ या नावाने केला आहे. पंधराव्या शतकातील वेमभूपाल या ग्रंथकाराने संगीतचिंतामणी या ग्रंथात याच नृत्याचा ‘लवणी’ असा निर्देश करून त्याच्या व्याख्येत ‘अप्रयासेन नमनमङ्नां लवणी मता’ अशी ‘लवणी’ ची व्युत्पत्तीही सांगितली आहे. ‘नम्’ धातूवरून ज्या नृत्यप्रकारात शरीर सहजपणे लवविले जाते, त्याला ‘लवणी’ हे नाव दिले गेले असावे. याच ‘लवणी’ नृत्याचा काही संगीतशास्त्रग्रंथकारांनी ‘नवणी’ असाही नामोल्लेख केला आहे. ‘लवणी’ नृत्याचा प्राचीनतम उल्लेख तेराव्या शतकातील ज्यायन नावाच्या ग्रंथकाराने नृत्यरत्नावली नावाच्या ग्रंथात केलेला आढळतो. यावरून ‘लावणी’ची परंपरा किती प्राचीन असावी याची कल्पना येते.
‘लावणी’ हा याप्रमाणे एक नृत्यप्रकार असून त्याच्या साथीने जे गीत गायिले जात असे, त्याला लक्षणेने ‘लावणी’ हे नाव पडले असावे. लावणी ही नृत्याच्या साथीनेच बहुश: गायिली जाते. लावणीची एकंदर बांधणीही नृत्याच्या ढंगानेच झालेली आढळून येते. लावणीचा पद्मावर्तनी वा भृंगावर्तनी जातिछंद, तिची पालुपदात्मक रचना, तिच्यातील खटका, तिचा नृत्य व नाट्य यांना अनुकूल असा आशय इत्यादी तिचे विशेष पाहिले असता. ही व्युत्पत्ती सहजच पटते.
‘लावणी’ या संज्ञेचा अर्थ कालांतराने विस्तृत झालेला दिसतो. आता त्यात पोवाडे वगळून रागदारीत गायिली जाणारी बैठकीची लावणी, भेदिक लावणी, कलगीतुऱ्याचे झगडे अशा सर्वच रचनांचा अंतर्भाव होतो. बैठकीच्या लावण्यांवरून लावणी हा गायनाचा विशिष्ट ढंग म्हणूनही मानला जाऊ लागला आहे. या ढंगात नाटकातील व कीर्तनातील पदेही गायिली जातात.
भेदिक लावणी ही बाह्यतः लौकिक लावणीसारखी असून तिचा आशय मात्र आध्यात्मिक असतो. त्यास भेद असे नाव आहे. उदा., सिदराम लहेरीच्या ‘विड्याचा भेद’ या लावणीत सत्रावीचे पान, चित्तचेतनाचा चुना, सात्त्विकाचा कात, भावाचा वेलदोडा इत्यादींप्रमाणे आध्यात्मिक संज्ञांवर विड्याच्या घटकांची रूपके करून तो विडा प्रियकराला दिला आहे. ही भेदिक लावण्यांची परंपरा फार जुनी असावी.
कलगीतुरा हा दोन पक्षांतील झगडा असतो. कलगी म्हणजे तुळशीच्या मंजरीसारखा किंवा मोराच्या तुऱ्यासारखा ताठ उभा राहणारा तुरा आणि तुरा म्हणजे मक्याच्या कणसातील केसासारखा किंवा पगडीच्या झिरमिळ्यासारखा खाली लोंबणारा तुरा. कलगीवाल्याचे निशाण भगवे वा जरीपटक्याचे असते आणि तुरेवाल्याचे पांढरे वा हिरवे. कलगीवाले हे प्रकृतिवादी वा शक्तिवादी आणि तुरेवाले हे पुरुषवादी वा शिववादी. दक्षिणेकडे कर्नाटक–तामिळनाडूत कलगीवाले हे शैव किंवा नागेशी आणि तुरेवाले हे वैष्णव किंवा हरिदासी. उत्तरेकडे राजस्थानात कलगीवाले हे मुसलमान आणि तुरेवाले हे हिंदू असतात मात्र तुरेवाल्यांप्रमाणे कलगीवाल्यांचेही काव्य हिंदू जीवन व तत्त्वज्ञान यांवरच आधारलेले असते. राम जोशी, अनंत फंदी हे तुरेवाले आणि प्रभाकर, परशराम, सगनभाऊ, होनाजी, पठ्ठे बापूराव हे कलगीवाले. कलगीतुऱ्याचा झगडा कित्येकदा पाच-सहा रात्री चालतो. यातील सावलजबाब आध्यात्मिक विषयावरच असतात असे नाही. सवालजबाबाच्या लावण्यांचा समावेश भेदिकातच जातो. या प्रकारच्या अगणित लावण्या महाराष्ट्राच्या खेडोपाडी रचल्या गेल्या आहेत असे म्हणतात. यांतील केवळ पाचपंचवीसच पठ्ठे बापूराव आणि शाहीर हैबती यांच्या संग्रहात प्रकाशित झाल्या आहेत. उत्तर पेशवाई व अव्वल इंग्रजी अंमलात कलगीतुऱ्यात एकाच विषयावर एकाच ढंगाच्या एकाहून एक वरचढ लावण्या रचलेल्या आढळतात. म्हणजे एकाने हिरव्या रंगावर लावणी केली, तर दुसरा पिवळ्या रंगावर लावणी करतो.
शाहिरी काव्याची परंपरा फार प्राचीन असून ती आजतागायत अखंडितपणे चालू आहे, हे खरे असले, तरी त्याला बहर आला, तो मराठेशाहीतच. आज उपलब्ध असलेल्या पोवाड्यांतील सर्वांत जुने पोवाडे शिवकालातील आहेत. हे पोवाडे रचणारे व म्हणणारे गोंधळी होते. वास्तविक गोंधळी हे भवानीचे उपासक आणि ते पोवाडे गात, ते देवतांच्या पराक्रमाचे वा कीर्तीचे पण शिवकालात मराठे देवांसारखे पराक्रम करू लागले आणि छ. शिवाजींना प्रत्यक्ष भवानी साहाय्य करते अशी श्रद्धा निर्माण झाली त्यामुळे गोंधळी इतर देवतांबरोबरच मराठी वीरांचेही पोवाडे गाऊ लागले. शिवकालीन शाहीर अज्ञानदासाच्या अफझलखानवधाच्या आणि तुळसीदासाच्या सिंहगडाच्या पोवाड्यात ही वीरकृत्ये भवानीनेच केली वा करविली असे वर्णन आहे.
पुढे स्वराज्याचे साम्राज्य झाले. उत्तरेकडील विलासी वृत्तीने मराठी भूमीत मूळ धरले. या विलासी वृत्तीला साथ देणाऱ्या शृंगारिक लावणीला या काळात बहर येऊ लागलेला दिसतो. या काळात समाजातील सर्वच थरांतील व जातींतील लोक लावण्या रचू लागले. आज उपलब्ध असलेल्या बहुसंख्य लावण्या या उत्तर पेशवाईतील असून तत्कालीन वैभवाचे, ऐषारामाचे आणि विलासी वृत्तीचे त्यांत प्रतिबिंब पडलेले दिसून येते. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत या लावणीकारांना राजाश्रय लाभला व त्यामुळे शाहिरी पेशाला प्रतिष्ठा व पैसा लाभू लागला. रामजोशी, अनंत फंदी, प्रभाकर इ. ब्राह्मण-मंडळींनीही आपला पिढीजात कीर्तनकाराचा वा कारकुनीचा पेशा सोडून वा सांभाळूनही शाहिरी पेशात प्रवेश केला. या काळातील बऱ्याचशा लावण्या शृंगारिकच नव्हे, तर अश्लीलही आहेत.
या काळात लावण्यांचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांतील रचनेची सफाई. ही बहुधा रामजोशी, प्रभाकर, अनंत फंदी ही शिक्षित मंडळी या पेशात शिरल्यामुळे आलेली दिसते. छंददृष्ट्या यांच्या लावण्या रेखीव दिसतात. संस्कृत शब्दांचा भरणा आणि संस्कृत काव्यातील संकेतांचा प्रभाव, हेही यांत विशेष आढळून येतात. या काळात निरनिराळ्या रागदारीत लावण्या रचल्या जाऊ लागल्या आणि फडावरची लावणी गायिकांच्या बैठकीत शिरली. होनाजी व सगनभाऊ हे या रागदारीतील लावण्यांचे प्रमुख रचनाकार मानले जातात.
या काळातील लावण्यांचा परिणाम तत्कालीन पोवड्यांवरही झालेला आढळून येतो. शिवकालातील तीन-चारच पोवाडे उपलब्ध आहेत. छ. संभाजी – राजारामांच्या कारकीर्दीतील एकही नाही. शाहूंच्या कारकीर्दीतील सहा पोवाडे उपलब्ध आहेत. त्यांतील दोन त्यांच्या मृत्यूसंबंधी आहेत. बाकीचे उपलब्ध असलेले दीडदोनशे पोवाडे तिसऱ्या पानिपताच्या युद्धानंतरचे आहेत. यांची रचना पालुपदात्मक असून त्यांत जातिछंदाची नियमितता दिसून येते. युद्धाचे वर्णन व राज्यकर्त्यांचा मृत्यू या पूर्वीच्या विषयांच्या जोडीने पेशव्यांच्या राजधानीचे वर्णन, होळकरांचा दंगा, दुष्काळ, नारायणरावाचा वध, पेशवाईची समाप्ती वगैरे इतर विषयही त्यांत आलेले आहेत.
शाहिरी वाङ्मय मौखिक परंपरेने आजही आपापल्या ‘वळीतून’ किंवा ‘फडातून’ बदलत्या जीवनसंदर्भानुसार बदलत प्रवाही राहिलेले आहे. पेशवाईच्या अस्तानंतरच्या स्वातंत्र्यपूर्वकाळात मराठे शाहीर लोकजागरण करीत राहिले. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, महात्मा जोतीराव फुले, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारखे देशभक्त, तसेच १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध, १९४२ ची छोडो भारत चळवळ इ. त्यांच्या पोवाड्यांचे विषय झाले. सार्वजनिक गणेशोत्सव तसेच इतर सामाजिक, राजकीय घटनाप्रसंगी शाहिरी सादर होऊ लागली. या कालखंडात समाजाच्या निरनिराळ्या स्तरांतून शाहीर पुढे आले. त्यांच्या रचना अन्य कलाकाराही सादर करू लागले. श्रोत्यांच्या वा प्रेक्षकांच्या जाणिवांचा स्तर बदलत जाऊ लागला आणि शाहिरी रचना नीटस आणि आशयदृष्ट्या व्यापक होत गेली. स्वातंत्र्यलढा, युवकांचे कार्य, सामाजिक सुधारणा, अस्पृश्यतानिवारण, हुंडाबंदी, सामाजिक परिवर्तन अशा विषयांवर मराठी शाहिरी अभिनिवेशाने बोलू लागली. स्वातंत्र्योत्तर काळात संयुक्त महाराष्ट्र, कामगारांचे प्रश्न, आंबेडकरी चळवळ, स्त्रियांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जाऊ लागले. पांडुरंग खाडिलकर, अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर, अमर शेख, आत्माराम पाटील, किसनराव हिंगे, पुंडलिक फरांदे, निवृत्ती पवार, विठ्ठल उमप, पिराजीराव सरनाईक, बाबासाहेब देशमुख, शाहीर योगेश, शाहीर विभूते असे कितीतरी शाहीर पुढे आले. ग.दि. माडगूळकर, जगदीश खेबुडकर, शांता शेळके आदींनी चित्रपट क्षेत्रात तर वसंत बापट, नारायण सुर्वे इ. मराठी कवींनी मराठी कवितेत शाहिरी रचनेची भर घातली. लोककलांच्या अंगांनी वसंत सबनीस, पु.ल.देशपांडे, शाहीर कृष्णराव साबळे, दादा कोंडके आदींनी शाहिरी जोपासली आहे. स्त्रीमुक्तीच्या चळवळीतील प्रबोधनकर्त्यांनी ‘मुलगी झाली हो’ सारख्या रचनेसाठी शाहिरी रचना जवळ केली आहे. सामाजिक वनीकरण, भ्रष्टाचार व अंधश्रद्धा यांचे निर्मूलन, रोगनिवारक प्रकल्प यांसारखे अनेक विषय लोकजागृतीच्या व लोकशिक्षणाच्या दृष्टीने शाहिरी रचनांतून सादर होत आहेत. लोकवाङ्मय, लोकसंगीत, लोकशिक्षण व लोकरंजन यांतच शाहिरी वाङ्मयाचे मूळ अधिष्ठान असल्याने ते बदलत्या लोकजीवनाशी सुसंगती राखून विकसनशील राहिले.
पहा : तमाशा, पोवाडा, मराठी साहित्य, लावणी, लोकगीते.
संदर्भ :
- अदवंत, म. ना. संपा. पैंजण, पुणे, १९५४.
- आहेर, विजय, स्वातंत्र्योत्तर लावणीवाङ्मय, पुणे, १९९९.
- कुलकर्णी, श्रीधर रंगनाथ, ओवी ते लावणी, १९९४.
- केतकर, श्री. व्यं. महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण, पुणे, १९२८.
- केळकर, य. न. अंधारातील लावण्या, पुणे, १९५६.
- केळकर, य. न. संपा. ऐतिहासिक पोवाडे किंवा मराठ्यांचा काव्यमय इतिहास, ३. भाग, पुणे, १९२८ १९४४ १९६९.
- केळकर, य.न. मराठी शाहीर आणि शाहिरी वाङ्मय, पुणे १९७४.
- जोग, रा. श्री. मराठी वाङ्मयाभिरूचीचे विहंगावलोकन, पुणे, १९५९.
- ढेरे, रा. चिं. मराठी लोकसंस्कृतीचे उपासक, पुणे, १९६४.
- धोंड, म. वा. मऱ्हाटी लावणी, मुंबई, १९८८.
- महाडिक, कृष्णस्वामी, संपा. लोकगीत, मद्रास, १९५०.
- मांडे, प्रभाकर, मराठवाड्यातील कलगी-तुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी, औरंगाबाद, १९३५.
- मोरजे, गं. ना. मराठी लावणी वाङ्मय, पुणे, १९९९.
- वर्दे, श्री. म. मराठी कवितेचा उषःकाल किंवा मराठी शाहीर, मुंबई. १९३०.