लोकरंजनासाठी नृत्य, संगीत आणि अभिनय यांचे गरजेनुसार मिश्रण साधून, सादर केला जाणारा गेय काव्यप्रकार. प्रकारभेदांनुसार लावणीच्या रचनेत साहित्य, संगीत, नृत्य आणि अभिनय यांचे प्रमाण निरनिराळे आणि आवाहन वेगवेगळे राहते.

‘लावणी’ या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी निरनिराळी मते आढळतात. उदा., (१) शेतात रोपाची लावणी करताना म्हटले जाणारे गीत. पण लावणी हे लोकगीत असले, तरी कृषिगीत नव्हे. (२) ‘लवण’ म्हणजे सुंदर. यावरून लावण्य हे भाववाचक नाम व त्याच्या साहाय्याने ‘लावणी’ ही संज्ञा. कारण लावणीत विशेषतः स्त्रीसौंदर्याचे वर्णन असते. (३) ‘लापनिका’ या संस्कृत शब्दावरून ‘लावणी’ ही संज्ञा. पण मुळात हा शब्द संस्कृत भाषेतला नसून महानुभाव ग्रंथांतून आढळतो. त्याचा अर्थही (स्पष्टीकरण, संबंध, अन्वय इ.) लावणीच्या स्वरूपाशी जुळत नाही. (४) लावणी-नृत्यात नर्तकी शरीर सहजपणे लववते, म्हणून ती लवणी व त्यावरून लावणी. (५) अक्षर शब्दांची शोभिवंत व सुभग जुळणी म्हणजे लावणी.

लावणीची बदलती रूपे आणि स्थल, काल व लोकसमूह यांच्या अपेक्षेने तिचे सिद्ध झालेले प्रकार ध्यानात घेता वरीलपैकी कोणतीही एक व्युत्पत्ती पूर्णतः समाधानकारक वाटत नाही.

लावणी जनप्रिय संगीताचा एक प्रकार आहे. घरदार सोडून मुलूखगिरीवर गेलेल्या शिपायाला रमविण्यासाठी काहीशी भडक व उथळ शृंगाराची गाणी रचली जात. शिपायांच्या तळांवर त्यांचे गायन होई. याचप्रमाणे उत्सव, जत्रा इ. समूहरंजनाच्या प्रसंगीही लावण्यांसारखे मनोवेधक आविष्काराचे प्रकार आवश्यक भासत. अशा गरजांमधून मराठी भाषेत लावणीचा जन्म झाला. आज जुन्यांत जुनी उपलब्ध लावणी एकनाथकालीन (सोळावे शतक) असून वीरशैव संत शाहीर मन्मथ स्वामी यांच्याकडे तिचे कर्तेपण दिले जाते. ही आध्यात्मिक लावणी कराडक्षेत्र वर्णनपर असून, शिलाहारांची कुलदेवता महालक्ष्मी कराडात कशी आली, ह्याचे वर्णन तीत आहे. खऱ्या अर्थाने लावणीची भरभराट उत्तर पेशवाईत (अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध) झाली.शाहीर राम जोशी, होनाजी बाळा, परशराम, सगनभाऊ, अनंत फंदी आणि प्रभाकर हे या कालखंडातील महत्त्वाचे लावणीकार शाहीर होत. रामजोशीने संस्कृतमध्ये व अनेक भाषांत लावण्या रचल्या.  इंग्रजी अमदानीत पट्ठे बापूराव, शाहीर हैबती, लहरी हैदर इ. अनेकांची नावे घेता येतात. लावणीचे आकर्षक स्वरूप ध्यानात घेता, आधुनिक काळात ग. दि. माडगूळकर, कवी संजीव, पी. सावळाराम, जगदीश खेबुडकर इ. गीतकारांचे लक्ष लावणीकडे वेधले गेल्यास नवल नाही.

विषयदृष्ट्या लावणीमध्ये स्त्री-पुरुष संबंध आणि त्यानिमित्ताने कृष्णगोपी संबंध यांची वर्णने विविध संदर्भात आणि वारंवार येतात. शृंगाराचे सर्व भेद लावणीकारांनी रंगविले आहेत. परंतु पौराणिक, आध्यात्मिक आणि इतर लौकिक विषयांवरही विपुल लावणीरचना दिसते. गणपती, शंकर, विष्णू इ. देवतांची स्तुती, एखाद्या पुराणकथेचे दीर्घकथन, तुळजापूर-पंढरपूर इ. क्षेत्रांची वर्णने, वैराग्यपर उपदेश, सावित्री-हरिश्चंद्र वगैरे आख्याने, लक्ष्मी-पार्वती, कृष्ण-राधा संवाद गुरुकृपा, गूढ आध्यात्मिक अनुभव यांसारख्या विषयांची वर्णी लावण्यांमध्ये लागलेली दिसते. भेदिक लावणीमध्ये कूटप्रश्न, कोडी, उखाणे व त्यांची उत्तरे असतात. तीत कलगी व तुरा हे दोन पक्ष असतात. यातही आध्यात्मिक व लौकिक अशा दोन्ही विषयांवर कूटप्रश्नात्मक लावण्या रचल्या गेल्या आहेत. काही भेदिक लावण्या रूपकात्मक आहेत. रामजोशीने दुष्काळावर लावणी रचावी, वा अनंत फंदीने बदलत्या काळाविषयी खंत व्यक्त करावी, यावरून लावणीच्या विषयांचा आवाका किती मोठा आहे, ह्याची कल्पना येते.

गेयतेचे बंधन लावणीने नेहमीच मानले आहे. लावणीरचना आठ मात्रांच्या पद्‌मावर्तनी वा सहा मात्रांच्या भृंगावर्तनी वृत्तांमध्ये आढळते. ही जातिवृत्ते गायनसुलभ असतात.

सर्वसाधारणतः ढोलकी, हलगी, तुणतुणे, झांज यासारखी उच्च स्वरी आणि मैदानी आविष्कारास योग्य अशी वाद्ये लावणीगायनात वापरली जातात. अपवाद फक्त बैठकीच्या लावणीचा. सर्वसाधारणतः सादरीकरणाच्या दृष्टीने पाहता लावणीचे तीन प्रकार मानता येतील :

(१) शाहिरी लावणी : डफ-तुणतुण्याच्या साथीने शाहिराने पद्यमय कथन वा निवेदन पेश करण्यासाठी गायलेली लावणी. उच्च स्वराने साथ करणारे झीलकरी संचामध्ये असतात.

(२) बैठकीची लावणी : तबला, पेटी, सारंगी, तंबुरी वगैरे वाद्यांच्या साथीने ही लावणी गायिका-नर्तिका बैठकीमध्ये सादर करतात. ह्या रचना उत्तर हिंदुस्थानी ठुमरीच्या धर्तीच्या असतात आणि माफक अभिनयाची, तसेच रागसंगीताची जोड देऊन बैठकीची लावणी सादर केली जाते.

(३) फडाची लावणी : नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांच्या साथीने नृत्य, संवाद आणि अभिनय यांची जोड देऊन ढोलकीवर गायली जाणरी लावणी. ‘बालेघाटी’ (विरहदुःखाची भावना आळवणारी), ‘छक्कड’ (उत्तान शृंगारिक), ‘सवाल-जवाब ’ (प्रश्रोत्तरयुक्त), ‘चौका’ची (दीर्घ चार कडव्यांची वा चार वेळा चाली बदलणारी) रचना फडावर सादर केली जाते.

आजच्या तमाशातील लावणीनृत्यावर हिंदी चित्रपटातील बेगडी नृत्यप्रकार तसेच उत्तर हिंदुस्थानी कथ्थक नृत्यशैली यांचा बराच प्रभाव दिसून येतो. तरीही या नृत्यपरंपरेतच आढळणारे असे काही खास सौष्ठवयुक्त पदन्यास आहेत. ‘मुरळी’च्या नृत्याशी त्याचे बरेच साधर्म्य दिसून येते. ढोलकीच्या साथीने विविध प्रकारच्या कौशल्यपूर्ण ठेक्यांत व जलद गतीत होणारे पदन्यास, तसेच खांद्यावरून मागे सोडलेल्या नऊवारी लुगड्याचा पदर दोन्ही हातांत डोक्यामागे शिडासारखा धरून केले जाणारे पदन्यास ही पारंपरिक ढंगाच्या लावणीनृत्याची खास वैशिष्ट्ये होते.

उत्तान शृंगाराच्या आधिक्यामुळे आज आपले स्वत्व व सुसंस्कृत समाजातील लोकप्रियता घालवून बसलेल्या लावणीला व ती सादर करणाऱ्या अशिक्षित तमाशा कलावंत  वर्गाला पुनः चांगल्या तऱ्हेने सजग करण्याचे प्रयत्न आज महाराष्ट्र सरकार तमाशाशिबिरे, महोत्सव आदींचे आयोजन करून करीत आहे. पारंपरिक रीतीने लावणीपरंपरा जोपासणाऱ्या कलावंतांना राज्य पुरस्कार देण्याची प्रथाही तालू आहे.

पहा : तमाशा ,पोवाडा, शाहिरी वाङ्‌मय.

संदर्भ :

  • अदवंत, म. ना. पैंजण, पुणे, १९५४.
  • केळकर, य. न. अंधारातील लावण्या, पुणे, १९५६.
  • धोंड, म. वा. मऱ्हाटी लावणी, मुंबई, १९८८.
  • मोरजे, गंगाधर, मराठी लावणी वाङ्‌मय, पुणे, १९७४.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा