सामान्यपणे जमिनीवरच वावरणारा एक उड्डाणक्षम पक्षी. टिटवीचा समावेश कॅरॅड्रीफॉर्मिस गणाच्या कॅरॅड्रीइडी कुलात होत असून त्याचे शास्त्रीय नाव व्हॅनेलस इंडिकस आहे. या जातीला रक्तमुखी टिटवी असेही म्हणतात. इराक, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, श्रीलंका इत्यादी देशांत तो आढळतो. जगभरात टिटवीच्या दोन प्रजाती आणि २५ जाती आहेत. बहुधा पाणवठ्याच्या जागी हा पक्षी जोडीने दिसतो. प्रजननाच्या हंगामाखेरीज ते मोठ्या कळपाने आढळतात.
टिटवी तितरापेक्षा किंचित मोठ्या असलेल्या टिटवीची लांबी सु. ३५ सेंमी. असते. पाठ आणि पंख फिकट तपकिरी असतात. पोटाकडची बाजू पांढरी असते. डोके, मान व गळा काळा असून छातीचा वरचा भाग काळा असतो. डोळ्यांच्या मागून एक पांढरा पट्टा निघून मानेच्या बाजूवरून खाली जातो. पंखांची आणि शेपटीची टोके काळी असतात. दोन्ही डोळ्यांसमोर तांबड्या रंगाच्या पीसविरहित मांसल त्वचेच्या गलुली असतात. चोच तांबडी परंतु टोकाकडे काळी असते. पाय लांबट पिवळे असून त्यांवर तीनच बोटे आणि तीही पुढच्या बाजूला असतात. त्यामुळे टिटवीला बोटांनी पकड घेऊन फांद्यांवर किंवा तारेवर बसता येत नाही.
टिटवी जोड्यांनी किंवा ३ ते ४ च्या गटांनी चालत असता जमिनीवरील कीटक, अळ्या, सुरवंट, लहान गोगलगायी किंवा अन्य अपृष्ठवंशी प्राणी शोधून खाण्यात व्यस्त असतात. तृणधान्य, अन्य बीजे, कोवळी पाने आणि फुलांच्या पाकळ्या यांचाही अधूनमधून त्यांच्या आहारात समावेश असतो.
हिवाळ्यात आणि वसंत ऋतूत टिटवी हे पक्षी अधिक उंचीच्या भागात सरकतात आणि पावसाळ्यात पुन्हा खाली सखल भागात सरकून पाणवठ्यानजिक राहतात. ‘टिट्-टिट्-ट्यू टिट्’ अशा त्यांच्या खास शैलीतील ओरडण्यामुळे त्यांची उपस्थिती जाणवते. रात्रीही ते जागरुक आणि क्रियाशील असतात. नेहमी सतर्क असणारे हे पक्षी माणसाच्या किंवा इतर शत्रूंच्या उपस्थितीची जाणीव इतरांना करून देण्यासाठी ओरडत असतात.
टिटवी नर आणि मादी यांच्या बाह्यरूपात विशेष फरक नसतो. नरामधील घोट्याचे हाड मादीच्या तुलनेत अधिक लांब असते. त्याच्यावरील काटादेखील मोठा असतो. मार्च ते ऑगस्ट हा त्यांच्या विणीचा हंगाम. जमिनीवरील छोट्या उथळ खळग्यामध्ये दोन-चार दगडगोटे, काही बारीक खडे, शेळ्या-मेंढ्यांच्या आणि सशांच्या लेंड्या असलेले जुजबी घरटे करून मादी चार अंडी घालते. फिकट तपकिरी रंगाच्या अंड्यांवर लहानमोठे काळे डाग आणि ठिपके असतात. अंड्यांचे आणि घरट्याचे छद्मावरण वैशिष्ट्यपूर्ण असते. आकाशात घिरट्या घालणारे नर-मादी आरडाओरड करून आणि प्रसंगी हल्ला करून शत्रूला घरट्यापासून दूर हुसकून देतात. याकरिता काही वेळा आपला पंख मोडल्यामुळे आपण तडफडतो आहोत, असेही नाटक करतात. शत्रूचे लक्ष दुसरीकडे वेधून त्याला घरट्यापासून दूर नेतात. पिलांची पिसे साधी धाग्यांसारखी असून ती नेहमी विसकटलेली असतात. त्यांच्यावर तपकिरी, पांढरे आणि करडे डाग असतात. प्रौढांच्या ओरडण्यातून संकेत मिळताच पाय दुमडून पिले जमिनीलगत बसून राहतात. छद्मावरणामुळे ती शत्रूच्या लक्षात येत नाहीत. संकट दूर झाल्यानंतर आकाशात घिरट्या घालणाऱ्या प्रौढांच्या ओरडण्यातून वेगळे संकेत मिळताच पिले उठून चालू लागतात.
आसाम वगळता भारतात सर्वत्र आढळणारी टिटवीची दुसरी जाती म्हणजे व्हॅनेलस मलबारिकस. या पक्ष्याला पीतमुखी टिटवी म्हणतात. हा पक्षी रक्तमुखी टिटवीपेक्षा किंचित लहान असतो. डोळ्यांसमोर पिवळ्या गलुली व काळे टोक असलेली पिवळी चोच ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.