टेमरू हा एबेनेसी कुलातील वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव डायोस्पिरॉस मलबारिका आहे. टेंबुर्णी, तेंडू या वनस्पतीदेखील या कुलात समाविष्ट आहेत. हा सदाहरितवृक्ष मूळचा भारतीय उपखंड आणि आग्नेय आशियातील आहे. त्याला टेम्बुरी असेही म्हणतात. भारतात तो सर्वत्र मात्र तुरळक आढळतो.

टेमरूची पाने व फळे

टेमरू टेमरू हा मध्यम, डेरेदार आणि दाट सावली देणारा वृक्ष आहे. त्याची वाढ सावकाश होत असून सु. ३५ मी.पर्यंत उंच वाढतो. खोड सु. ७० सेंमी.पर्यंत वाढत असून साल जाड, गुळगुळीत व काळपट रंगाची असून मोठ्या आकाराच्या पापुद्र्यांनी गळून पडते. पाने साधी, लंबगोलाकार (१०–२५ सेंमी.), जाडसर, चामट आणि चकचकीत हिरवी असतात. पालवी तजेलदार व लालभडक असते. नर–फुले व मादी–फुले वेगवेगळी येतात. फुले नाजूक, हस्तिदंती रंगाची व सुगंधी असतात. नरफुले ३–५ च्या संख्येने गुच्छात येतात. मादी–फुले नर–फुलांपेक्षा किंचित मोठी (२–३ सेंमी.) असून पानांच्या बगलेत एकेकटी येतात. दोन्ही प्रकारच्या फुलांमध्ये चार सुट्या पाकळ्या असतात. फळांना ‘टेमरं’ म्हणतात. ती गोल, पिवळसर, ४–८ सेंमी. आकाराची असतात. फळांवरील लालसर तपकिरी मखमली आवरण गळून पडले की, फळे चिकूच्या फळांसारखी दिसतात.फळांतील गर चिकटसर असून त्यात ४ – ८ चपट्या व तपकिरी बिया असतात.

टेमरू या वृक्षाचे लाकूड कठीण आणि टिकाऊ असते. त्याचा वापर विविध कामांसाठी केला जातो. सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी होतो. फळे खाद्य असून शीतल आहेत. त्यांपासून मिळणारा डिंक पुस्तक बांधणीसाठी वापरतात. कोवळी पाने गुरे चारा म्हणून खातात. उद्यानात शोभेसाठी म्हणून तो लावला जातो.