अपृष्ठवंशी विभागातील संधिपाद (आथ्रोपोडा) संघाच्या एका वर्गातील प्राणी. या वर्गाला कीटक वर्ग (इन्सेक्टा) म्हणतात. प्राणिसृष्टीत एकूण सु. १० लाख जातींची नोंद झालेली असून त्यांतील सु. ७ लाख जाती कीटकांच्या आहेत. कीटकांच्या कोलिऑप्टेरा या एकाच गणात पाच लाखांहून अधिक जातींचा समावेश होतो. नवीन जातींच्या कीटकांचा शोध लागल्याने त्यांच्या संख्येत सतत भर पडत आहे. कीटकांचे दोन उपवर्ग पडतात :
१) पंख नसलेले अपक्ष आणि २) पंख असलेले सपक्ष. जीवनचक्र आणि विकास, बाह्यलक्षणे, मुखांगे इ. वैशिष्ट्यांनुसार कीटकांचे वर्गीकरण २९ गणांत केलेले आहे. काही कीटकवैज्ञानिकांच्या मते कीटकांच्या सु. १ कोटी जाती असाव्यात. मात्र अजूनही सर्व ज्ञात कीटकांचे द्विपदनाम पध्दतीने वर्गीकरण झालेले नाही.
सर्वसाधारणपणे कीटक लहान आकारमानाचे असून त्यांची लांबी ६-१० मिमी. असते. डीकोपोमॉर्फा इकमेप्टेरीगीस या नावाची परीमाशी फार छोटी असून तिच्या शरीराची लांबी सु. ०.१३९ मिमी. असते. याउलट फोबीटिकस सेराटिपेस या नावाच्या यष्टि-कीटकाची लांबी सु. ५५५ मिमी. असते.
जेथे वनस्पती उगवतात अशा सर्व भूभागांवर कीटक आढळून येतात. यात बर्फाळ, वाळवंटी, दलदलीचे, अती उष्ण, अती पर्जन्यमानाचे प्रदेशही येतात. बहुतेक कीटक भूचर असून ते जमिनीवर, मातीत, निरनिराळ्या वनस्पतींवर, साठविलेल्या अन्नधान्यांत व इतर जैव पदार्थांत, तर काही इतर प्राण्यांच्या शरीरांवरही राहतात. अनेक जातींचे कीटक पाण्यात राहतात. हे जलचर कीटक गोड्या पाण्यात (नद्या, नाले, ओढे, तलाव, डबकी, विहिरी व सरोवरे यांत) तसेच खार्या पाण्यात आढळतात. सायलोपा पेट्रोली या माशीचे डिंभ खनिज तेलाच्या विहिरीत आढळतात. काही जलचर कीटकांचे संपूर्ण जीवनचक्र पाण्यातच पूर्ण होते, तर इतर काही कीटकांच्या प्रारंभिक अवस्था पाण्यात वाढतात.
कीटकांमध्ये अन्नाच्या बाबतीत विविधता आढळते. कीटक फुले, फळे, पाने असे भाग, साठविलेले धान्य, इतर खाद्यपदार्थ, लाकूड, कपडे, लोकर, चामडे, कागद, प्राण्यांचे मांस, रक्त अशा सर्व प्रकारच्या जैविक पदार्थांवर, तसेच इतर कीटकांवर आणि सूक्ष्मजीवांवर जगतात. त्यांच्या प्रत्येक जातीत अन्नाच्या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण अनुकूलन पहावयास मिळते.
कीटकांचे शरीर उपत्वचेने आच्छादलेले असते. ही उपत्वचा जलरोधी कायटीनापासून बनलेली असते. बाह्यत्वचा ठिकठिकाणी कठिण झालेली असते. कीटकांची वाढ होत असताना ते अनेक वेळा कात टाकतात. यात शरीरावरील सगळी बाह्यत्वचा निघून जाते. या क्रियेला निर्मोचन म्हणतात. टोळ पाच वेळा, झुरळ सात वेळा आणि अश्म-पतंग तीसपेक्षा जास्त वेळा कात टाकतात.
जीवनचक्र आणि विकास, बाह्यलक्षणे, मुखांगे इ. वैशिष्ट्यांवरून कीटकाच्या शरीराचे डोके, छाती आणि पोट असे तीन प्रमुख भाग पडतात. डोके सहा शरीरखंडांचे बनलेले असते. त्यावर शृंगिका, दोन संयुक्त नेत्र, दोन किंवा तीन साधे नेत्र आणि मुखांगे असतात. मुखांगात उत्तरोष्ठ, अधरोष्ठ, जंभ, जंभिका व जिव्हा हे प्रमुख भाग असतात. कीटकांच्या अन्न खाण्याच्या पद्धतीनुसार त्यांच्या मुखांगांची रचना असते. डोके लवचिक त्वचेने छातीशी जोडलेले असते. त्वचेच्या या भागाला मान म्हणतात. छातीचे अग्र, मध्य आणि पश्च असे तीन खंड असतात. प्रत्येक खंडावर पायांची एक जोडी असते. सपक्ष कीटकांमध्ये मध्य आणि प्रश्च वक्ष यांवर प्रत्येकी एक पंखांची जोडी असते. सपक्ष उपवर्गातील मुंग्या व वाळवी यांच्या वंध्य (वांझ) माद्यांमध्ये व काही अन्य कीटकांतही पंखांचा र्हास झालेला असतो. सपक्ष कीटकांना बहुधा पंखांच्या दोन जोड्या असतात. पंरतु डिप्टेरा गणातील डास व घरमाशी या कीटकांना पंखांची एकच जोडी असते. मागील पंखांच्या जोडीच्या ठिकाणी लहान गाठीसारखे संतोलक असतात. आदिम गणातील कीटकांना पंख नसतात. पोट दहा खंडांचे बनलेले असते. प्रोट्यूरा गणातील कीटकांचे पोट बारा खंडांचे असून, इतर काही कीटकांमध्ये अकरा खंडांचे असते. पोटाच्या शेवटच्या खंडावर गुदद्वार असून, काही कीटकांमध्ये याच खंडावर दोन स्पर्शग्राही शेपट्या असतात. कीटकांची जननांगे उदराच्या अधर बाजूला असतात. नराच्या नवव्या खंडावर जनन-रंध्र व बाह्य जननेंद्रिये असतात. मादीची जननांगे सातव्या व आठव्या खंडांत असून, बाह्य जननेंद्रियास अंडनिक्षेपक म्हणतात. त्यांचा उपयोग अंडी घालण्यासाठी होतो. काही कीटकांमध्ये या भागाचे इतर कार्यासाठी रूपांतर झालेले असते. कामकरी मधमाशा आणि गांधील माश्या यांत त्याचे रूपांतर डंख मारणार्या नांगीत झालेले असते.
कीटकांच्या शरीरात अनेक इंद्रिये असून ती बाह्यत्वचेच्या आवरणामुळे सुरक्षित असतात. इंद्रियांच्या संस्था बनलेल्या असून त्या पचन, श्वसन, अभिसरण, उत्सर्जन, मज्जा आणि प्रजनन या प्रकारच्या असतात. पचनसंस्थेत अन्ननलिकेच्या दोन्ही बाजूंस लाळग्रंथी असतात. अन्नाच्या पचनासाठी लाळेचा उपयोग होतो. रेशीम किडा या कीटकामध्ये या ग्रंथींच्या स्रावापासून रेशीम धागा तयार होतो. श्वसनसंस्थेत श्वासनाल आणि श्वासनलिकांचे जाळे असते, तसेच श्वासरंध्रे असतात. जलचर कीटकांमध्ये श्वसन कल्ल्यांच्या साहाय्याने होते. अभिसरण संस्थेला अनावृत अभिसरण संस्था म्हणतात. हृदय अनेक कप्प्यांचे बनलेले असते. उत्सर्जन संस्थेत उत्सर्गी नलिका असतात. त्यांची संख्या २-१५० असू शकते. चेता (मज्जा) संस्था तीन भागांची असते.
काही ठळक अपवाद वगळता कीटकांमध्ये लिंगे भिन्न असतात. पुष्कळदा आकारमान, रंग त्याचप्रमाणे गौण लैंगिक लक्षणांवरून नर व मादी ओळखता येतात. काही कीटकांत मीलनानंतर नर लवकर मरतो. मादी अंडी घालण्यासाठी काही काळ जिवंत राहते. मधमाश्यांमध्ये राणीमाशी ४-५ वर्षे जिवंत राहून अंडी घालत असते. बहुतेक माद्या फलनानंतर अंडी घालतात. या अंड्यांतून डिंभ बाहेर पडतात. जवळपास उपलब्ध असलेल्या अन्नावर डिंभांची वाढ होते. त्यानंतर निर्मोचन होते, कोश तयार होतो, कोशातून प्रौढ कीटक बाहेर पडतो. बहुतेक कीटकांमध्ये अंडी, डिंभ, कोश आणि प्रौढ अशी निश्चित स्थित्यंतरे घडून येतात. त्याला पूर्णरूपांतरण म्हणतात.
काही कीटकांत अंडी, डिंभ आणि प्रौढ अशी तीनच वाढीच्या अवस्था दिसून येतात. याला अर्धरूपांतरण म्हणतात. अर्धरूपांतरणात अंड्यातून बाहेर पडणार्या अवस्थेला अर्भक म्हणतात. अर्भकाला पंख व जननांगे नसतात. नंतर पंख आणि जननांगे विकास पावतात. आदिम गणांतील पंखहीन कीटकांत जननेंद्रिये व बाह्य जननांगे यांच्या विकासाशिवाय कोणतेही स्थित्यंतर होत नाही. याला अरूपांतरण म्हणतात. काही कीटकांमध्ये अफलित अंडजांपासूनच नवी प्रजा निर्माण होते. त्यास अनिषेकजनन म्हणतात. मावा कीटक आणि मधमाश्यांच्या वांझ माद्यांत अनिषेकजनन आढळते. काही कीटकांमध्ये कोशावस्थेचा काळ फार मोठा असतो. ग्रीष्म भुंगेर्यात तो २-४ वर्षे असतो. सिकाडाकीटकात तो १७ वर्षांपर्यंत असतो.
काजव्यासारख्या कीटकांमध्ये प्रकाश निर्माण करणारी विशिष्ट इंद्रिये असतात. नर आणि मादी मैथुनकाली परस्परांना आकर्षित करण्याकरिता या प्रकाशाचा उपयोग करतात. मानवाच्या दृष्टीने काही कीटक हानिकारक ठरतात. ते पिके, धान्य, लाकूड, रेशीम, लोकर व कागद यांच्यावर उपजीविका करून त्यांचे नुकसान करतात. ढेकूण, उवा व डास माणसांचे आणि पाळीव जनावरांचे रक्त शोषतात. डासांमुळे हिवताप व पीतज्वर, माश्यांमुळे कॉलरा व हगवण आणि पिसवांमुळे प्लेग या रोगांचा प्रसार होतो. काही कीटक वनस्पतींच्या विषाणुजन्य रोगांचा प्रसार करून फार मोठी हानी करतात.
कीटकांद्वारे परागणाचे महत्त्वपूर्ण कार्य घडून येते. प्राण्यांची विष्ठा आणि मृत शरीरे यांवर अनेक कीटक उपजीविका करतात; यामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होते. उपद्रवी कीटकांमुळे होणारी हानी टाळण्यासाठी कीटक नियंत्रणाच्या अनेक पद्धती असून त्यांत यांत्रिक नियंत्रण, संवर्धन, नियंत्रण, भौतिक नियंत्रण, रासायनिक नियंत्रण, जैव नियंत्रण आणि विलग्नवास नियंत्रण इ. पद्धती महत्त्वाच्या आहेत.
वाळवी, मुंग्या, काही गांधील माश्या आणि मधमाश्या हे सामूहिक जीवन जगणारे म्हणजे समाजप्रिय कीटक आहेत. हे कीटक समूहाने राहतात. त्यांच्या समाजात बहुसंख्येने असलेले कामकरी, मोजक्या संख्येने असलेले नर आणि केवळ एकच राणी कीटक असे तीन मुख्य घटक असतात. यांच्या समाजाचे खास वैशिष्टय म्हणजे, त्यांच्या घटकांत झालेली कामाची विभागणी. अन्न मिळविणे, संरक्षण करणे आणि स्वच्छता राखणे अशी कामे कामकरी करतात, तर प्रजननाचे कार्य नर आणि राणी यांच्यामार्फत होते. काम करताना प्रत्येक घटकाला प्रभावीपणे काम करता यावे, म्हणून त्यांच्या कृतीमध्ये योग्य तो समन्वय राखलेला असतो.