संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या ऑरर्थाप्टेरा (ऋजू पंखी) गणातील अॅक्रिडिटी कुलातील नऊ जातींच्या कीटकांना टोळ म्हणतात. टोळाचे इंग्रजी भाषेतील ‘लोकस्ट’ हे नाव लॅटिन भाषेतून आलेले असून त्याचा अर्थ ‘जळालेली जमीन’ असा होतो. टोळधाड येऊन गेल्यावर जमीन जळून गेल्यासारखी दिसते. टोळ जगभर सर्वत्र आढळत असून आफ्रिका खंडात त्यांचा उपद्रव जास्त आहे. स्थल आणि रंगानुसार त्यांना वाळवंटी, प्रवासी, मुंबई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मोरक्की, डोंगरी, तांबडे व तपकिरी टोळ अशी नावे देण्यात आली आहेत. भारतात शिश्टोसर्का ग्रिगेरिया ही जाती मोठ्या प्रमाणावर आढळते. तिच्यामुळे वनस्पतींचे अतोनात नुकसान होते.
टोळ टोळाचे शरीर अरुंद, लांब, दंडगोलाकार आणि व्दिपार्श्वसममित असून लांबी ८ सेंमी. पर्यंत वाढू शकते. रंग पिवळा, तपकिरी, हिरवट वा राखाडी असून त्यावर वेगवेगळ्या रंगांचे ठिपके व रेषा असतात. शरीराचे डोके, वक्ष व उदर असे तीन भाग असतात. डोळे मोठे असून मुखांगे गवत व पाने चावण्यायोग्य असतात. शृंगिका आखूड असतात. वक्ष भागात पायांच्या तीन जोड्या असतात. पहिली जोडी सर्वांत लहान आणि तिसरी जोडी सर्वांत मोठी व दणकट असते. नर लहान असून उदराचा शेवटचा भाग गोल व वरच्या बाजूस वळलेला असतो. मादी मोठी असून तिच्या उदराच्या शेवटच्या भागामधून टोकदार अंडनिक्षेपक निघते. त्याला चार टोकदार अवयव असतात. अंडी घालताना अंडनिक्षेपक मातीत खुपसण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. ओलसर मातीत मादी ७.५–१५ सेंमी. भोक पाडून ३–६ महिन्यांच्या काळात ३००–५०० अंडी घालते. अंडी एकमेकाला चिकट स्रावाने जोडलेली असून शेंगेप्रमाणे दिसतात. अंड्यांतून १२–१४ दिवसांनी पंखविरहीत पिले बाहेर पडतात. पिले पाचवेळा कात टाकून चार आठवड्यांनी प्रौढावस्थेत जातात. जीवनचक्र अर्धरूपांतरण पद्धतीचे असून त्यात अंडी, उड्या मारणारी पिले व पंख असलेले टोळ असे टप्पे असतात.
टोळांमध्ये द्विरूपता दिसून येते; परिस्थितीनुसार त्यांची दोन रूपे आढळतात. एकाकी अवस्था आणि सांघिक अथवा थव्याची अवस्था. एकाकी रूपात टोळ सुस्त व निरुपद्रवी असतात. या रूपातील टोळांची पिले रंगाने हिरवी असून त्यांवर काळ्या रंगाच्या खुणा असतात. प्रौढ टोळ लहान, करड्या रंगाचे व लहान पंखांचे असतात. याउलट, सांघिक रूपातील टोळ अस्थिर व प्रक्षुब्ध असतात. या रूपातील पिले गुलाबी काळ्या रंगाची असून शरीरावर मधोमध पुसट काळी रेघ असते. प्रौढ टोळ आकारमानाने मोठे, पिवळे अगर तांबूस छटा व आणि करड्या खुणा असलेले असतात. यांचे पंख आणि पाय मोठे व मजबूत असतात. त्यांच्या एकाकी रूपाला नाकतोडा (ग्रास हॉपर) तर सांघिक रूपाला टोळ (लोकस्ट) म्हणतात. जेव्हा एकाकी टोळ मोठ्या संख्येने एकत्र येतात तेव्हा त्यांच्या रूपात बदल होतो आणि त्यांना सांघिक रूप प्राप्त होते. टोळ एकत्र आल्यावर त्यांचे मागचे पाय परस्परांना घासल्याने शरीरात ‘सेरोटोनीन’ या रसायनाचे प्रमाण वाढते. त्यामुळे टोळांचा रंग बदलतो. ते जास्त खातात व लवकर प्रजननक्षम होतात. परिणामी प्रजननाचा वेग वाढून त्यांची संख्या वाढते.
टोळांच्या सांघिक संचाराला ‘टोळधाड’ असे नाव आहे. टोळांची उड्या मारणारी पिले वाटेत मिळेल त्या झाडाझुडपांची आणि पिकांची पाने खातात. टोळधाडीचा विस्तार ५००–८०० चौ. किमी. पर्यंत असू शकतो. भारतात गेल्या शंभर वर्षांत प्रत्येक वेळी ५–७ वर्षे टिकणाऱ्या १० टोळधाडींची नोंद करण्यात आली आहे.
टोळांवर नियंत्रण राखण्यासाठी कीटकनाशके फवारतात, तसेच टोळ हाताने पकडून मारतात. जमीन नांगरल्याने टोळांची अंडी नष्ट होतात. टोळ असलेल्या ठिकाणी कवकांची सुकलेली बीजुके टाकतात. ही बीजुके टोळाच्या शरीरात जाऊन अंकुरतात. त्यामुळे टोळ मरतात. टोळधाड पिकांवर उतरू नये म्हणून काही वेळा पत्र्याचे रिकामे डबे वाजवितात. तसेच पांढरी फडकी हवेत हलवितात.
मासे पकडण्यासाठी टोळ आमिष म्हणून गळाला लावतात. कोंबड्यांना ते प्रथिन-खाद्य म्हणून देतात. अनेक देशांत टोळ खाल्ले जातात. जीवशास्त्रीय संशोधनासाठी त्यांचा वापर केला जातो. गंध-संवेदना, दृश्य-संवेदना, स्पर्श-संवेदना, हालचाल-संवेदना आणि चेतासंस्था यांवरील प्रयोगांमध्ये ते वापरले जातात.