मानवाला निसर्गातील उपयुक्त असलेल्या घटकांना किंवा पदार्थांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. नैसर्गिक संसाधनांमध्ये जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादींचा समावेश होतो. तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली खनिजे, खनिज तेल, वनस्पती यांचाही समावेश होतो. जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी या संसाधनांची गरज असते. निसर्गात उपलब्ध असलेल्या या पदार्थांचा उपयोग सजीव जगण्यासाठी करतात.

नैसर्गिक संसाधनांच्या वर्गीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यांचे (१) संसाधनांचे स्रोत, (२) संसाधनांच्या विकासाचे टप्पे व (३) नूतनीक्षम अशा बाबींनुसार वर्गीकरण केले जाते.

नूतनीक्षम नैसर्गिक संसाधने (सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलीय ऊर्जा इत्यादी)

संसाधनांचे स्रोत : यांच्या उगमावरून त्यांचे जैव आणि अजैव असे प्रकार आहेत. जैव संसाधने ही जीवावरणातील घटकांपासून (उदा., वने, प्राणी, पक्षी इत्यादींपासून) प्राप्त होतात. यात कोळसा व जीवाश्म इंधन या जैव इंधनांचादेखील समावेश होतो. ती सेंद्रिय पदार्थांच्या कुजण्यापासून तयार होतात. अजैव प्रकारात जमीन, पाणी, हवा, जड धातू (उदा., सोने, चांदी, तांबे, लोह इत्यादी) आणि वेगवेगळ्या खनिजांचा समावेश होतो.

विकासाच्या टप्प्यानुसार गट :

संभाव्य संसाधने : विशिष्ट क्षेत्रात उपलब्ध असून भविष्यात त्यांचा उपयोग होऊ शकतो. उदा., भारतात अनेक ठिकाणी खनिज तेलाचे साठे आहेत. परंतु जोपर्यंत त्यातून खनिज तेल काढले जात नाही तोपर्यंत ते संभाव्य संसाधनच असते.

प्रत्यक्ष संसाधने : ज्या संसाधनांचे सर्वेक्षण होऊन त्यांची गुणवत्ता आणि प्रमाण निश्चित केलेले आहे आणि त्यांचा सद्यस्थितीत उपयोग केला जात आहे, अशा संसाधनांना प्रत्यक्ष संसाधने म्हणतात.

आरक्षित संसाधने : प्रत्यक्ष संसाधनांचा आरक्षित केलेला भाग व त्यांचा भविष्यात लाभकारी उपयोग करता येईल, अशा संसाधनांना आरक्षित संसाधने म्हणतात.

संग्रहित संसाधने : सर्वेक्षण झालेले आहे, परंतु तंत्रज्ञान उपलब्ध नसल्यामुळे वापर करता येत नाही अशा संसाधनांना संग्रहित संसाधने म्हणतात. उदा., हायड्रोजन वायू.

काही संसाधने नूतनीक्षम किंवा अनूतनीक्षम असतात. पाणी, सूर्यप्रकाश, हवा इत्यादी संसाधने कधीही संपणारी नाहीत, म्हणून त्यांना नूतनीक्षम संसाधने म्हणतात. जी संसाधने संपुष्टात येणारी आहेत, ज्या संसाधनांची उपलब्धता मर्यादित आहे त्यांना अनूतनीक्षम संसाधने म्हणतात. उदा., खनिजे, जैवइंधने इत्यादी.

नूतनीक्षम संसाधने : नैसर्गिक रीत्या ज्या संसाधनांची पुनर्निर्मिती होऊ शकते अशा संसाधनांना नूतनीक्षम संसाधने म्हणतात. यात सौर ऊर्जा, पवन ऊर्जा इत्यादींचा समावेश होतो. ही संसाधने मुबलक प्रमाणात आणि निरंतर उपलब्ध असतात. मानवी वापरामुळे त्यांच्या प्रमाणावर होणारी घट नगण्य असते.

अनूतनीक्षम संसाधने : ज्या संसाधनांच्या निर्मितीचा वेग अतिशय मंद आहे तसेच नैसर्गिक रीत्या ज्या संसाधनांची निर्मिती होत नाही, अशा संसाधनांना अनूतनीक्षम संसाधने म्हणतात. मानवी दृष्टिकोनातून अनूतनीक्षम संसाधने म्हणजे ज्यांच्या खपाचा वेग अधिक आहे आणि त्यामानाने त्यांची पुनर्निर्मिती मंद गतीने होते, अशी संसाधने (उदा., जीवाश्म इंधन). जीवाश्म इंधनांच्या निर्मितीला कोट्यावधी वर्षे लागतात. त्यामुळे ती अनूतनीक्षम संसाधने ठरतात. धातूंची खनिजे पुनर्चक्रीकरणाने वापरता येतात. मात्र, कोळसा व पेट्रोलियमचे पुनर्चक्रीकरण करता येत नाही. अनूतनीक्षम नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता मर्यादित असते आणि मोठ्या प्रमाणावर त्यांची पुनर्निर्मिती व पुनर्वापर करता येत नाही. अशी संसाधने संपुष्टात आली की त्यांची पुनर्निर्मिती करता येत नाही. या संसाधनांच्या मागणीचा वेग हा त्यांच्या उत्पादनाच्या वेगापेक्षा नेहमीच अधिक असतो.

पृथ्वीवर उपलब्ध असलेली नैसर्गिक संसाधने मर्यादित आहेत. त्यांचा वापर ज्या वेगाने होत आहे तो पाहता पुढील काही दशकांत अनेक संसाधने संपुष्टात येऊ शकतात. त्यांच्या अतिवापरामुळे निसर्गाची अपरिमित हानी होते. तसेच प्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास, नूतनीक्षम संसाधनांच्या उपलब्धतेत घट इत्यादी परिणाम दिसून येतात. नैसर्गिक संसाधनांचा वापर उचित झाला तरच पर्यावरणाचा समतोल कायम राहील. अनेक पारिस्थितिकी तज्ज्ञांनी असे दाखवून दिले आहे की, मानवाच्या अनिर्बंध वापरामुळे नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास असाच चालू राहिला तर सजीवसृष्टीतील अनेक घटकांच्या अस्तित्वास धोका पोहोचेल, मानवाचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात येईल.