एक फळभाजी. ढेमसा ही वनस्पती कुकर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव प्रीसिट्रुलस फिस्टुलॉसस असे आहे. या वर्षायू, पसरत वाढणाऱ्या वेलीचे मूलस्थान उत्तर भारत असून भारतात सर्वत्र आणि आशिया व आफ्रिकेतील उष्ण प्रदेशांत तिच्या फळांसाठी लावली जाते. इंग्रजीत या वेलीला ॲपल गोर्ड असेही म्हणतात. आपल्याकडे बाजारात टिंडा या हिंदी नावाने प्रचलित आहे.
ढेमसा वेलीचे खोड जाड असून ते केसाळ असते. खोड व पानांचे देठ पोकळ असतात. पाने हस्ताकृती असून कमी विभागलेली असतात. फळे लहान, फिकट हिरवी व चेंडूएवढी असून ती दोन्ही टोकांना दामटलेली असतात. फळे कोवळी असताना त्यांवर राठ केस असतात. पक्व फळांवरील केस राठ नसतात. फळात काळ्या बिया असतात.
फळात अ आणि क जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम व फॉस्फरस असते. कोवळ्या फळांची भाजी करतात. फळ थंडावा देणारे असून कोरड्या खोकल्यावर उपयुक्त आहे. वाळलेल्या बिया भाजून खातात.