आंतरदेहगुही प्राणिसंघाच्या हायड्रोझोआ आणि ॲक्टिनोझोआ (अँथोझोआ) या वर्गांतील काही सागरी प्राण्यांनी किंवा प्राणिसमूहांनी स्वत:भोवती निर्माण केलेल्या सांगाड्यांचे तयार झालेले निक्षेप (साठे) म्हणजे प्रवाळ. या प्राण्यांनाही सामान्यपणे प्रवाळ म्हणतात. प्रवाळास प्रवाल, पोवळे किंवा विद्रुम असेही म्हटले जाते.

आंतरदेहगुही संघातील प्राण्यांमध्ये बहुशुंडक आणि छत्रिक अशी दोन रूपे आढळतात; हायड्रोझोआ वर्गातील प्राण्यांचे बहुशुंडक व छात्रिक अशी दोन्ही रूपे असतात, तर ॲक्टिनोझोआ वर्गातील प्राण्यांचे प्रामुख्याने बहुशुंडक रूप असते. बहुशुंडकांचे शरीर दंडाकृती असून ते पाण्यात आधाराला चिकटून राहतात. हे प्राणी स्वत:भोवती एखादा चषकासारखा व त्रिज्यीय कणा असलेला सांगाडा किंवा कंकाल निर्माण करतात. हा सांगाडा या प्राण्यांच्या बाह्यस्तरापासून स्रवला जातो आणि तो मुख्यत: कॅल्शियम कार्बोनेटयुक्त असतो. समुद्रकिनाऱ्यावर बऱ्याचदा पांढरे किंवा रंगीत, हरिणाच्या शिंगाच्या तुकड्यासारखे आणि असंख्य भोके असलेले बारीक दगड सापडतात. हे दगड म्हणजे प्रवाळ सांगाड्याचे तुकडे असतात. काही प्रवाळ प्राणी एकाकी असतात. मात्र बहुतकरून त्यांच्या वसाहती असतात. काही काळानंतर प्राणी मरून जातात आणि वसाहतींच्या सांगाड्यांचे प्रवाळ दगड बनतात. अशा अनेक प्रवाळ दगडांपासून प्रवाळ खडक तयार होतात. अनेक वेळा आधीच्या पिढीतील प्रवाळांच्या खडकावर प्रवाळांची पुढची पिढी वसाहत बनविते. असे होताहोता कित्येक हजार वर्षांनंतर समुद्राचा तळ उचलला जातो आणि प्रवाळबेटे, प्रवाळमंच आणि प्रवाळभित्ती तयार होतात.

हायड्रोझोआ वर्गात मिलिपोरा, स्टायलॅस्टर, स्टायलॅंथिका इ. महत्त्वाचे प्रवाळ आहेत. मिलिपोरा  प्रवाळ उष्ण प्रदेशातील सागरात आढळतात. त्यांचा आकार वनस्पतीच्या पानासारखा असून सांगाडा ३०–६० सेंमी. उंच असतो. सांगाड्यावर असंख्य लहानमोठी छिद्रे (भोके) असतात. प्रवाळभित्तीत या प्रवाळांचे प्रमाण जास्त असते. स्टायलॅस्टर  प्रवाळात सांगाड्यांच्या अनेक शाखा आणि उपशाखा असतात.

ॲक्टिनोझोआ वर्गातील प्राण्यांच्या सांगाड्यांनुसार तसेच एकाकी अथवा वसाहती, मऊ अथवा शिंगासारखे अथवा दगडासारखे घट्ट यांवरुन प्रवाळांचे विविध प्रकार असतात. या वर्गात ट्युबिपोरा, हेलिओपोरा, गार्गोनिया, कोरॅलियम, फंगिया, फाबिया, मॅड्रेपोरा, मीअँड्रिना, रोझ कोरल, ब्लॅक कोरल इत्यादी प्रक़ार आहेत. ट्युबिपोरा म्यूझिका  किंवा लाल रंगाचे ऑर्गन पाइप कोरल या प्रवाळात कॅल्शियम कार्बोनेटच्या स्फटिकाच्या कंटिका व त्याचबरोबर लोहाचे क्षारही असतात. म्हणून त्यांचा रंग लाल असतो. सांगाड्याची रचना वाद्यातील ध्वनिनलिकांसारखी असते. या प्रवाळात मुकुलनाने प्रजनन होऊन मोठी वसाहत तयार होते. हेलिओपोरा  हा निळा प्रवाळ आहे. गॉर्गोनिया म्हणजे समुद्रव्यजन अथवा समुद्रपंखा. या प्रवाळात कॅल्शियम कार्बोनेटबरोबर गॉर्गोनिन नावाचे प्रथिन असते. कोरॅलियम रूब्रम  हे रक्त प्रवाळ किंवा लाल पोवळे म्हणून प्रसिद्ध आहे. फंगिया  हे एकाकी प्रवाळ असून ते अळंबी प्रवाळ म्हणून ओळखले जाते. ते जिवंतपणी नाजूक भूछत्रासारखे दिसते. मॅड्रेपोरा  याला खरे पोवळे म्हणतात. मीअँड्रिना  प्रकारातील प्रवाळांना ब्रेन कोरल म्हणजे मस्तिष्क प्रवाळ म्हणतात. या प्रवाळाचा व्यास २-३ मी. असून वजन काही टन असते. हे प्रवाळ दगडासारखे कठीण असून बहुशुंडकांच्या कित्येक पिढ्यांपासून सांगाड्याच्या अभिसंस्करणाने साठ्याच्या रूपात तयार होते. मानवी मेंदूवर जशा वळ्या असतात तशा वळ्या या प्रवाळांच्या पृष्ठभागावर असतात. ब्लॅक कोरल या प्रवाळावर शुल्क किंवा काटे असतात. त्याला काटेरी प्रवाळ असेही म्हणतात.

लाल पोवळे आणि काळे पोवळे अत्यंत मौल्यवान आहेत. प्रवाळांचे मणी बनवून त्यांचा उपयोग गळ्यातील माळा, अंगठ्या, बांगड्या, बाजूबंद, मंगळसूत्र, साज, वस्त्रकंकण यांत करतात. राजदंड, शोभेच्या वस्तू आणि हत्यारांच्या मुठी मढविणे यांसाठी पोवळ्यांचा उपयोग करतात. प्रवाळांची पूड कॅल्शियम कार्बोनेटचा स्रोत म्हणून औषधात वापरतात.

मेड्रेपोरा  व मीअँड्रिना  या प्रवाळांपासून प्रचंड अशा प्रवाळभित्ती फ्लॉरिडा, वेस्ट इंडीज, मादागास्कर, आफ्रिकेचा पूर्व किनारा, ऑस्ट्रेलिया वगैरे ठिकाणी तयार झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यापलीकडे सु. २,००० किमी. लांबीची रोधक प्रवाळभित्ती तयार झाली आहे. ही प्रवाळभित्ती काही ठिकाणी समुद्रकिनाऱ्यापासून सु. १४५ किमी. अंतरापर्यंत सागरात पसरली आहे. तिला ग्रेट बॅरिअर रीफ म्हणतात. प्रवाळभित्तीमुळे स्पंज, कृमी, कवचधारी संधिपाद, मृदुकाय प्राणी, कंटकचर्मी प्राणी, कास्थिमत्स्य, अस्थिमत्स्य व शैवाले यांची एक वेगळीच परिसंस्था निर्माण झाली आहे. ही परिसंस्था मत्स्योद्योगात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठरते. प्रवाळभित्तीपासून मिळणारा चुरा रस्ते बांधण्यासाठी वापरतात. प्रवाळभित्तींचे अनुतट प्रवाळभित्ती, रोधक प्रवाळभित्ती आणि खाजणाभोवतालचे प्रवाळद्वीप असेही प्रकार आहेत. खारफुटी वनांप्रमाणे प्रवाळ हीसुद्धा भूवर्धक परिसंस्था आहे. भारतात ओखा, अंदमान व मालवण येथील उथळ समुद्रात प्रवाळ आहेत.

प्रवाळ बहुशुंडकांच्या शरीरात एकपेशीय झूक्झँथेली शैवाल आणि त्यांच्याच कंकालामध्ये बहुपेशीय कॉलरेपा नावाचे तंतुशैवाल असते. हे परस्परपूरक सहजीवनाचे उदाहरण आहे. शैवालांना आवश्यक असलेला नायट्रोजन आणि फॉस्फरस प्रवाळ बहुशुंडके पुरवितात, तर शैवाले कॅल्शियम कार्बोनेट तयार होण्यासाठी आवश्यक असलेला कार्बन डायऑक्साइड पुरवितात. प्रवाळबेटांमुळे शैवाले, शैवालभक्षी मृदुकाय, तसेच वलयी, भंगुरतारा, समुद्र करंडा, सागर घोडा व ईलसारखे भक्षक मासे आणि अनेक अस्थिमत्स्य यांना अधिवास उपलब्ध होतो.

This Post Has 2 Comments

  1. N.K.

    खूपच सुंदर माहिती अत्यंत उपयोगी .Thanks

प्रतिक्रिया व्यक्त करा