सोलॅनेसी कुलातील निकोटियाना प्रजातीच्या वनस्पतींना सामान्यपणे तंबाखू म्हणतात. धोतरा ही वनस्पतीही सोलॅनेसी कुलातील आहे. प्राचीन काळापासून मनुष्याने तंबाखूच्या पानांचा वापर चघळण्यासाठी, तपकिरीसाठी व धूम्रपानासाठी केलेला आहे. या पानांनादेखील ‘तंबाखू’ म्हणतात. तंबाखूचा वापर औषध म्हणूनही होतो. निकोटियाना प्रजातीतील नि. टाबॅकम आणि नि. रस्टिका या जाती तंबाखूकरिता लागवडीखाली आहेत. चीन, पाकिस्तान, ब्राझील, भारत, क्यूबा आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे देश तंबाखूच्या उत्पादनात आघाडीवर असून त्या देशांसाठी ते एक नगदी पीक आहे. पुढील वनस्पतिवर्णन नि. टाबॅकम या प्रजातीचे आहे.
तंबाखू ही वर्षायू वनस्पती १-३ मी. उंच, सरळ वाढते. खोडावर एकाआड एक फांद्या येतात. या फांद्यांवर चिकट व ग्रंथियुक्त केस असतात. पाने लांबट व भाल्यासारखी किंवा अंडाकृती असून ती ६०-१०० सेंमी. लांब असतात. पानांचे देठ लहान असतात किंवा नसतात. फुलोरा परिमंजरीच्या स्वरूपात असून फुले द्विलिंगी, नियमित, नरसाळ्यासारखी व फिकट लाल किंवा पांढरी असतात. फळ (बोंड) शुष्क, लंबगोल किंवा लांबट गोलसर असून ते २ सेंमी. लांब असते. फळात गोलाकार व बारीक अनेक बिया असून त्यांचा आकार चवळीच्या बियांप्रमाणे असतो. निकोटीन आणि सुगंध यांचे प्रमाण तंबाखूच्या प्रकारांवर अवलंबून असते.
भारतात उत्पादित होणाऱ्या तंबाखूचा मोठा भाग धूम्रपानासाठी, चघळण्यासाठी व तपकिरीसाठी वापरला जातो. दात घासण्यासाठीही तंबाखू वापरतात. आयुर्वेदानुसार तंबाखू शामक, आकडीरोधक व कृमिनाशक असून पचनाच्या तक्रारींवर गुणकारी आहे. त्यानुसार तंबाखूचा वापर विविध औषधांमध्ये केला जातो. तंबाखूची पूड व अर्क यांचा वापर कीटकनाशक म्हणूनही होतो. बियांपासून तेल काढून ते रंग व व्हार्निशमध्ये वापरतात. तंबाखूमध्ये निकोटीन हे अल्कलॉइड असते. तंबाखूचे खोड, शिरा व पानांतून निकोटीन मिळवितात. निकोटीन हे सल्फेटाच्या रूपात कृषिक्षेत्रात कीटकनाशक म्हणून वापरतात. निकोटीन काढून घेतल्यानंतर तंबाखूचा वापर खतासाठी करतात. कारण त्यात पोटॅशचे प्रमाण जास्त असते. तंबाखूमध्ये १३ प्रकारची विकरे आढळून आली असून अनेक खनिजेही असतात. तसेच त्यामध्ये प्रथिने, अॅमिनो आम्ले, पॉलिफेनॉल व कॅरोटीन ही जैवरसायने आढळतात. शिवाय त्यामध्ये अनेक बाष्पनशील तेले आहेत. हे सर्व घटक उपयुक्त आहेत. तंबाखूच्या सेवनामुळे हानिकारक कर्करोग, हृदयविकार असे विकार जडतात. तंबाखूच्या धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग होतो. जगभर दरवर्षी सु. ५४ लाख व्यक्ती तंबाखूच्या अतिसेवनामुळे मृत्युमुखी पडतात. विकसित देशांत धूम्रपानाचे प्रमाण घटले असून विकसनशील देशांत ते वाढत आहे, असे आढळून आले आहे.
भारतात लागवडीखाली असलेल्या एकूण जमिनीपैकी सु. ०.२५% जमीन तंबाखूच्या लागवडीखाली आहे. तंबाखूच्या विविध उत्पादनांपासून भारत सरकारला मोठा महसूल मिळतो. उदा., २०१२ साली भारत सरकारला तंबाखूपासून अंदाजे १५,००० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तंबाखूच्या उद्योगाचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने १९७६ साली आंध्र प्रदेशामध्ये गुंतूर येथे इंडियन टोबॅको बोर्डाची स्थापना केली. देशात होणाऱ्या तंबाखूच्या उत्पन्नाचा आढावा घेणे, तंबाखूची प्रतवारी तसेच दर्जा ठरविणे, तंबाखूची आयात-निर्यात करणे आणि उत्पादक, दलाल व निर्यातदार यांना माहिती पुरविणे अशी महत्त्वपूर्ण कामे बोर्डाकडून केली जातात.