कुत्र्यासारखा दिसणारा एक प्राणी. तरस हा स्तनी वर्गाच्या मांसाहारी गणातील प्राणी असून त्याचा समावेश हायनिडी कुलात होतो. या कुलातील प्राण्यांना सामान्यपणे तरस म्हणतात. स्तनी वर्गातील हे कुल सर्वांत लहान असून आफ्रिका आणि आशिया खंडांतील परिसंस्थांत महत्त्वाचे घटक आहेत. हायनिडी कुलात हायना, क्रोक्यूटा आणि प्रोटिलिस या तीन प्रजाती असून हायना प्रजातीत दोन तर क्रोक्यूटा आणि प्रोटिलिस प्रजातीत प्रत्येकी एक अशा त्यांच्या चार जाती आहेत; त्यांपैकी पट्टेवाला तरस (हायना हायना) आफ्रिका आणि आशियात; तपकिरी तरस (हा. ब्रुनिया) नामिबिया, मोझँबिक आणि द. आफ्रिकेत; ठिपकेवाला तरस (क्रो. क्रोक्यूटा) आफ्रिकेतील सहारा वाळवंटात आणि पट्टेवाला लहान आकाराचा तरस (प्रो.क्रिस्टॅटा) आफ्रिकेत आढळतो. भारतात फक्त पट्टेवाला तरस (हा. हायना) आढळतो. महाराष्ट्रात सायाळ, मुंगूस, वाघ जेथे आढळतात त्या परिसरात तरस दिसून येतो.

पट्टेवाला तरस (हायना हायना)

तरस दिसायला साधारणपणे कुत्र्यासारखा असतो. मात्र त्याचे शरीर बेढब आणि बोजड असते. पूर्ण वाढलेल्या तरसाची लांबी सु. १५० सेंमी. असते; उंची सु. ९० सेंमी. असते. नराचे वजन सु. ४० किग्रॅ. तर मादीचे वजन ३०-४० किग्रॅ. असते. रंग मळकट पांढरा, उदी किंवा राखाडी असून अंगावर आणि पायांवर पट्टे असतात. हिवाळ्यात शरीरावर मोठे आणि दाट केस उगवतात. त्यामुळे शरीरावरचे पट्टे उठून दिसत नाहीत. डोके मोठे व शरीराचा पुढचा भाग रुंद (जाड) तर मागचा भाग अरुंद (निमुळता) असतो. कान टोकदार असतात. मानेवर लांब केसांची आयाळ असते. तरसाचा जबडा बळकट असून दात मोठे, तीक्ष्ण आणि मजबूत असतात. या दातांनी तो हाडे सहज फोडतो व चघळून खातो. पुढचे पाय लांब, जाड आणि मजबूत असून मागचे पाय त्यामानाने आखूड असतात. मागच्या पायांत जोर नसल्यामुळे तो शरीराचा सर्व भाग तोलू शकत नाही. त्यामुळे तो खुरडत खुरडत चालतो. तरस ओळखण्याची ही एक खूण आहे. त्याच्या शेपटीखाली गंध ग्रंथी असून तिच्यामधून तो एक प्रकारचा स्राव स्रवतो.

तरस ओढ्याजवळच्या किंवा डोंगरकपारीच्या घळीत किंवा मोठ्या खडकांच्या आड राहतो. दिवसा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून तो सायाळींनी खोदलेल्या बिळांमध्ये जाऊन राहतो, तर काही वेळा तो स्वत: बिळे किंवा गुहा खोदून राहतो. तो निशाचर असून एकटा किंवा जोडीने शिकार करतो. त्याच्या शरीराची ठेवण भक्ष्याचा पाठलाग करून, झडप घालून किंवा पकडून मारण्यासाठी अनुकूल अशी नसते. इतर प्राण्यांनी मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता अनुरूप अशी त्याच्या शरीराची ठेवण आहे. तो त्याचे खाद्य वासावरून हुडकून काढतो. त्याचे खाद्य निश्चित नाही. मिळेल त्या कुजलेल्या व सडक्या मांसावर तो गुजराण करतो. वाघसिंहांसारख्या मोठ्या प्राण्यांनी शिकार करून मारलेले प्राणी खाऊन झाल्यावर गिधाडे आणि कोल्हे ती ताब्यात घेतात व उरलेले मांस खातात. त्यानंतर उरलेली हाडे व हाडांना चिकटलेले मांस तरस खातो. मेलेल्या प्राण्यांची हाडे खात असल्यामुळे त्याची विष्ठा हाडांप्रमाणे कडक आणि पांढऱ्या गोळ्यांसारखी असते.

तरस सहसा इतर प्राण्यांबरोबर भांडण काढीत नाहीत. शिकारी कुत्र्यांनी घेरल्यावर सुटकेचा पर्याय नसल्यास तो मेल्यासारखा निपचित पडून राहतो. अशा मेलेल्या प्राण्याचा पाठलाग करण्यात काही उपयोग नाही, म्हणून कुत्री इतरत्र जातात व तरसाची सुटका होते. कधीकधी खाद्याच्या शोधात तरस गावाजवळ किंवा गावात येतात. संधी मिळाल्यास वासरू, कुत्रा, शेळी, मेंढी असे प्राणी ते पळवितात. त्यांनी मूल पळविल्याची काही उदाहरणे आहेत. आफ्रिकेतील तरस नेहमी कळपाने शिकार करतात आणि बैलासारख्या मोठया प्राण्यावर देखील हल्ला करतात. वाघ, सिंह यांसारखे प्राणी म्हातारे होताच तरसांचा कळप त्यांना जिवंतपणीच फाडून खातो.

काही वेळा तरस आपापसांत माणसांच्या रडण्याप्रमाणे तर कधी मोठयाने हसल्याप्रमाणे आवाज काढतात. ते उघडयावर पडलेले, कुजलेले, सडलेले मांस व हाडे खाऊन परिसर स्वच्छ राखतात. म्हणून त्यांना सफाई प्राणी म्हणतात. त्यांची गर्भधारणा हिवाळ्यात होते. उन्हाळ्यात पिले जन्माला येतात. एका वेळी मादी ३–४ पिलांना जन्म देते. पिले फक्त मादीसोबत फिरतात. तरसाचा आयु:काल सु. १६ वर्षे असतो.