मध्यम आकाराचा कोंबडीसारखा एक पक्षी. तितराचा समावेश कोंबडीच्या फेजिॲनिडी कुलातील फ्रँकोलायनस प्रजातीत होतो. जगभर या प्रजातीच्या सु. ४० जाती असून त्यांपैकी पाच आशियात तर उर्वरित जाती आफ्रिकेत आढळतात. भारतात करडा तितर (फ्रँकोलायनस पाँडिसेरिॲनस), काळा तितर (फ्रँकोलायनस फ्रँकोलायनस) आणि रंगीबेरंगी तितर (फ्रँकोलायनस पिक्टस) या तीन जाती आढळतात. त्यांपैकी करडा तितर ही जाती सर्वत्र आढळते. काळा तितर उत्तर प्रदेश आणि आसामात तर रंगीबेरंगी तितर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दक्षिणेकडे आढळतो.

तितर पक्ष्याची लांबी सु. २९–३४ सेंमी. असते. पाठीचा रंग करडा तपकिरी असून त्यात तांबूस रंगाची छटा असते; पोटाकडचा भाग पिवळसर असून त्यावर गडद तपकिरी नागमोडी रेघोट्या असतात. शेपूट आखूड व काळसर तांबूस रंगाची असते. हनुवटी, गळा आणि कपाळ केशरी असते. गळ्यावर चंद्रकोरीसारखा एक आडवा पट्टा असतो. चोच काळसर आणि पाय मळकट तांबडे असतात. नर व मादी दिसायला सारखे असले तरी नर आकाराने किंचित मोठा असतो आणि त्याच्या पायावर कोंबड्याप्रमाणे एक टोकदार नखी असते.
तितरांचे लहान थवे असतात. माळराने, गवताळ प्रदेश, काटेरी झुडपांची वने व शेतात त्यांचा वावर असतो. दाट वने व पाणथळ जागा अशा ठिकाणी ते क्वचितच दिसतात. हे पक्षी छोट्या थव्यात राहून कोंबड्यांप्रमाणे पायांनी माती विस्कटून वाळवी, इतर कीटक, अळ्या, धान्य व गवताची बीजे टिपत राहतात. जोडीजोडीने अन्न शोधतात. अन्न मुबलक असेल अशा ठिकाणी ते मोठ्या संख्येने असतात. माणसांची चाहूल लागताच ते वेगाने पळून गवत किंवा अन्य झुडपात लपून बसतात किंवा ‘भुर्रर’ असा आवाज करीत त्यांचा थवा कमी उंचीवरून काही अंतरापर्यंत उडून जातो. ते खूप दूर उडू शकत नाहीत. उडून जाताना ते २–३ च्या संख्येने उडतात. त्यामुळे शिकाऱ्यांच्या हातात ते सहज सापडतात. दिवसा ते जमिनीवर वावरतात, परंतु रात्र बाभळीच्या किंवा शिसवीच्या झाडावर काढतात. त्यांच्या विणीचा हंगाम ठराविक नसतो. मादी झुडपांच्या आडोशाला जमिनीत लहानसा खळगा करते. त्यात गवताचे अस्तर करून ती ६–८ फिकट पिवळी अथवा पांढरी अंडी घालते. पिले एका वर्षात प्रजननक्षम होतात. तितराचा आयु:काल सु. ८ वर्षे असतो.
तितराचे मांस रुचकर असल्यामुळे बाजारात त्याला चांगली मागणी असते. सोलून साफ केलेल्या एका पक्ष्याचे मांस त्याच्या लहान आकारामुळे जेमतेम १०० ते २०० ग्रॅ. भरते. काही शिकारी नर पक्ष्यांना पकडून पिंजऱ्यात बंद करून रानात ठेवतात. सकाळी हे नर ओरडू लागले की आसपासच्या माद्या त्यांच्या आवाजाकडे आकर्षित होऊन त्यांच्या दिशेने येतात आणि लोकांनी पसरलेल्या जाळ्यात सहजच अडकतात. कोंबड्यांप्रमाणे तितरांचे नर भांडखोर व आक्रमक असतात. ग्रामीण भागात यात्रेमध्ये व उरूसामध्ये यांच्या झुंजी लावल्या जातात.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.